Tuesday, 15 December 2015

Marathi Calligraphy : एवढेतरी





एवढेतरी

एवढेतरी करून जा
हा वसंत आवरून जा…

ही न रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा…

तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा…

ये उचंबळून अंतरी
सावकाश ओसरून जा…

ह्या हवेत चंद्रगारवा
तू पहाट पांघरून जा…

ये गडे, उदास मी उभा
आसमंत मंतरून जा…

-- सुरेश भट
संग्रह : एल्गार
पृष्ठ क्र : ५७



-- अमोल नेरलेकर । १६.१२.२०१५ 

Saturday, 12 December 2015

या जन्मावर…या जगण्यावर…

आज ऑफीसमधे सकाळी ११च्या सुमारास जयवंत आणि पंकजसोबत चहा घेत बसलो होतो. नेहमीच्याच गप्पा चालू होत्या. तेवढ्यात समोरून कॅन्टीन बॉय - अजय आला. त्याचा सहकारी 'नरेंद्र' ह्याने नोकरी सोडल्याचे आम्हाला कळले होते आणि त्यात आज अजयने येउन सांगितले की तो त्याच्या गावी - विदर्भात परत जाणार आहे.

मी सहज विचारलं, 'काय रे अजय, नरेंद्र नोकरी का सोडतोय? आणि काय करणार गावी जाऊन?'

त्यावर अजय म्हणाला, 'सर, तो आता त्याच्या आईसोबत राहील गावाला. त्याचा बाप बेवडा आणि त्याच हे तिसर लग्न. नरेंद्रच्या आईकडे त्याच जराही लक्ष नाही. त्याने ह्याला सांगितलय, मुकाट इकडे ये आणि आईला घेऊन सांभाळ. म्हणून चाललय तो…'

दोन क्षण आपण काय उत्तराव हे मला सुचेना; मन खूप विषण्ण झाले. रोज येता जाता आम्ही त्याची दिलखुलास मस्करी करायचो त्या हसर्या आणि निरागस चेहेर्याच्या नरेंद्रच आयुष्य एवढ्या अजीर्ण दु:खांनी, यातनांनी आणि नाईलाजान्नी भरलेल असेल ह्याची कणभरसुद्धा कल्पना नव्हती.

'त्याचा बापूस विहिरी बांधायचं काम करतो, तो पण तेच करेल आता… ' अजय सांगत होता.

खरच, जीवन किती निष्ठूर आहे आणि नियती किती बेलगाम! ती काहींना गंभीर करून तीच ओझं खांद्यावर झेलायला लावेल तर काहीना अगदी सुखात लोळवेल…

ह्याला खरच आईला भेटायचं का? का त्याच्या नाईलाज आहे? का आपला बाप आपल्या आईला काही करेल का ह्याची त्याला भीती वाटतेय? का हेच कारण दाखवून तो नोकरीपासून दूर पळतोय? का नियती त्याला हे करायला भाग पाडतेय? हे तो स्वत:हून करतोय का कोणाच्यातरी सांगण्यावरून? त्याला पुढचे परिणाम दिसत आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात बाजार मांडला. क्षणभर कोणाशी बोलाव आणि काय बोलाव हेच सुचेनास झाल. त्याने डोळ्यांसमोर येउच नये असे वाटत होते; ते दु:खापोटी, करूणेपोटी, रागापोटी की आणखीन कशासाठी ते माहीत नाही…

मन कितीही चांगल असल तरी रोजच्या व्यावहारिक जगात जगायची बुद्धी त्याला मिळू दे अशी मनोमन प्राथर्ना केली. त्याला त्याच जगण भिजलेल्या कापसापरी ओझ न वाटता हवेत उडणार्या रेशीमधाग्यांपरी हलक आणि मुक्तछंदाच वाटू दे असे मनापासून वाटले आणि जाता जाता पाडगांवकरांच्या 'या जन्मावर, या  जगण्यावर…शतदा प्रेम करावे…'  ह्या ओळी ओठांवर आल्या.

देव करो आणि त्यालासुद्धा ह्या ओळी गुणगुणाव्याशा वाटोत. 'आज' नाही कदाचित, पण निदान 'उद्या'तरी…


-- अमोल नेरलेकर । १२.१२.२०१५

  

Sunday, 22 November 2015

बरे नाही…

तुझे असे हे सारखे सजणे बरे नाही,                           
आरशाशी वेळ एवढे बोलणे बरे नाही… 

तूच सांग एकदा,पुनवा कधी आहे,                           
माझे हे असे रोजचे जागणे बरे नाही…                       

'भेटूनी तुला आज सांग काय मी बोलू',                      
तुझे असे स्वत:ला समजावणे बरे नाही…                   

नजरेच्या धारेतून होऊ दे वार एकदाचा,                    
पापण्यांच्या लयीतून असे छळणे बरे नाही…              

कोरली गेली नक्षी माझ्या-तुझ्या आठवणींची,
मेहेंदीसम मनात माझ्या रंगणे बरे नाही…               

कालचे तुझे असणे किती बोलून गेले,                        
स्पर्शात शब्दाचे अंतर ठेवणे बरे नाही…                     



-- अमोल नेरलेकर

Sunday, 4 October 2015

Plain Tiger Butterfly

बिबळ्या कडवा

फुलपाखरांची नावे मराठीत कशी पडली असतील हे कोड मला नेहमी पडत. कोणाच्या नावात 'स्विफ्ट' तर कोणाच्या नावात 'राजा', कोणाच्या नावात अगदी 'झेब्रा' तर कोणाच्या नावात 'टायगर'. फुलपाखरे तशी स्वच्छंदी, त्यामुळे हवा, प्रदेश ह्यांसारख्या गोष्टींची सीमा फार कमी वेळा ह्यांच्या मधे येते. शिवथरघळला फिरताना मला दिसलेले हे फुलपाखरू - प्लेन टायगर अर्थात बिबळ्या कडवा.

बिबळ्या कडवा आकाराने साधारण ७ ते ८ से. मी. इतके असून रंगाने फिकट चॉकलेटी-केशरी असून पंखांची टोके काळ्या रंगांची असतात. पंखांची वरील बाजू ही खालील बाजूपेक्षा जास्त तेजस्वी असते, म्हणजेच खालील बाजूच्या पंखांचा रंग अतिशय फिकट असतो. वरील बाजूस असणार्या काळ्या टोकान्मध्ये पांढर्या रंगाचे मोठे ठिपके पहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त, बोर्डरला काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते. पंखांच्या खालील बाजूसही हे पांढरे ठिपके आणि काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते.
नर मादीपेक्षा आकाराने लहान असतो. तसेच नरांमध्ये खालील पंखांच्या बाजूला एक काळ्या- पांढर्या रंगाची एक जागा असून तिथून विशिष्ट प्रकारची संप्रेरके स्त्रवली जातात. ह्या संप्रेरकांचा उपयोग मादींना आकर्षित करण्यासाठी केला जातो.

Plain Tiger - Side View (Under Wings)
बिबळ्या कडवाचे पुनारोत्पादन वर्षभर चालू असते (अपवाद - हिमालयीन भागात हे विशिष्ट काळात होते). मादी पिवळा चित्रकाचे फूल, रुई , आक अशा झाडांच्या पानांवर अंडी घालते. ही अंडी पानांच्या खालच्या बाजूस आणि प्रती पान एक अशी घातली जातात (अळी ची उपजीविका पानांवर होत असल्याने मुबलक प्रमाणात हे पान खायला मिळावे हा त्यामागील उद्देश असतो). अंडी रंगाने पांढरट चांदेरी चमकदार असून आकाराने बुलेटसारखी असतात. अंड्यांचा आकार - व्यास ०.९ मि.मी. आणि उंचीने १.३ मि.मी. इतका असतो. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला २ ते ३ दिवस जातात. एकदा त्यातून अळी आली की तिची उपजीविका अंड्याच्या कवचापासून होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी २.२ मि.मी. इतकी असते आणि रंगाने पांढरी असते. पुढील टप्पा २ दिवसांचा असून त्यात ह्याची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवर होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी ४.५ मि.मी. इतकी असते आणि रंगाने हिरवट पिवळी असते. तिसर्या टप्प्यात ह्याचे रूपांतर सुरवंटात होते आणि हा टप्पा साधारण १.५ ते २ दिवसांचा असून तेव्हा ह्याची लांबी ९ मि.मी. इतकी होते. चौथ्या टप्प्यात आणि पाचव्या टप्प्यात ह्याची लांबी अनुक्रमे १२ मि.मी. ते २१ मि.मी. इतकी होते आणि रंगाने ते पांढरे असून त्यावर काळ्या- पिवळ्या रंगांचे पट्टे  दिसतात. पुढील टप्प्यात सुरवंट कोषात जाउन हा टप्पा साधारण ५ दिवसांचा असतो. हा कोष हिरव्या रंगाचा असून पानांच्या देठावर आधाराशिवाय मुक्तपणे लटकवलेला असतो. ५ दिवसानंतर त्यातून फुलपाखरू बाहेर येते.


Plain Tiger - UpperSide Wings

बिबळ्या कडवा संरक्षणासाठी अनेक उपाय करते. त्यात मुख्यत्वे alkaloids संप्रेराकांचा वापर होतो. alkaloids मध्ये नायट्रोजन असून हे स्त्रवल्यास त्याच्या वासामुळे मळमळल्यासारखे होते. तसेच ह्या फुलपाखराची त्वचा खूप जाड असल्याने त्याचा उपयोग त्याला वातावरणातील तापमानबदलांमुळे स्वत:ला संतुलित ठेवायला होतो.

बिबळ्या कडवाचा वावर भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका आणि आशिया खंडात आणि प्रादेशिक दृष्ट्या बाग, उघडा रानमाळ, गवत व छोट्या झाडांत आणि अगदी वाळवंटातदेखील आढळून येतो त्यामुळे 'यत्र-तत्र-सर्वत्र : बिबळ्या कडवा' असे म्हटल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही.

सर्व फोटो : अमोल नेरलेकर.

संदर्भ:
१. https://en.wikipedia.org
२. http://butterflycircle.blogspot.in
३. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे.


-- अमोल नेरलेकर । ४.१०.२०१५ 

Thursday, 1 October 2015

एकरूप

समोरी पाहता तुला, गालांत लाजूनी आले,
सारे तुझ्याचसाठी हे, स्वत:स विसरूनी आले...

नजरेतून तुझ्या किती टाळले संवाद मी तेव्हा,
स्पर्श होताच तुझा, अंगांग मोहरूनी आले...

किती धरावा धीर, त्या आरशास विचार ना,
मनात त्याच्या माझे, प्रतिबिंब ठेवूनी आले...

बघूनी रूप हे सुंदर, वळल्या त्या अनेक नजरा,
शल्य त्यांच्या उरातील, डोळ्यांत पाहूनी आले..

सारिता वैशाख मागे अन शुष्करानाची खूण,
वसंतात तुझ्या नव्याने, आतून उमलूनी आले...

सांग कशाला द्यावी दारावरी रोज मी हाक?
वर्दी द्यावया माझी हा मोगरा गंधूनी आले...

पैलतीरी गंगाकिनारी तुझी ऐकून वेणूधून,
ऐलतीरी नादवीत पैंजणे, राधा बनूनी आले...


-- अमोल नेरलेकर 

Sunday, 27 September 2015

बाप्पाची आरती...

सुरेश काकांकडला गणपती म्हणजे जणू आमच्या सोसायटीचा मुख्य गणपतीच! दरवर्षी ठरलेली ती ३ फूट उंचीची दगडूशेठ हलवाईची गणपतीची रेखीव, सुबक आणि प्रसन्न मूर्ती. आकाराने आणि दिसायला जरी सारखीच असली तरी बाजूच्या सजावटीमुळे दरवर्षीचा बाप्पा वेगळा - पण तरीही आम्हाला जवळचाच वाटतो.

लहानपणापासून, म्हणजे मी अगदी ६ वर्षाचा असल्यापासून आमच्या सोसायटीत तीन जणांकडे गणपती बसायचे आणि रोजची आरती म्हणजे जणू पर्वणीच! बोंगो, टाळ आणि प्रत्येकाच्या आतून येणार्या त्या आर्त स्वरांनी आरती काय सजायची तुम्हाला सांगतो…कालांतराने तीनाचे दोन गणपती झाले, आम्ही मोठे झालो, प्रत्येकाचे रुटीन बदलले, माणसाच्या आयुष्यातील दगदग वाढली आणि लहानपणापासून आम्हाला भेटणारी 'ती' आरती हळूहळू आमच्यापासून दूर जायला लागली…

आज कित्येक वर्षानी ती आरती पुन्हा नव्याने अनुभवायला मिळाली. ती गर्दी, तो बोंगोचा ठेका आणि त्या लांब लांब स्वरांत म्हणल्या गेलेल्या आरत्या यामुळे अगदी कस प्रसन्न वाटलं. म्हटलं, चला आपल्याकडे नवीन कॅमेरा आहे तेव्हा ह्या क्षणांना साठवून ठेवू आणि अस म्हणत आरतीचे अनेक फोटो काढले; बरेचसे मनासारखेही निघालेही - पण वाटलं फोटो हा फक्त एक नजारा आहे…हे फोटो काढताना त्या प्रत्येक फोटोमागचा तो नाद, ती तरलता, तो आवेश आणि ती प्रेरणा जर टिपता आली तर किती बर होईल नाही?

म्हणजे बघा ना, कॅमेरा एकाच समेवर होणार्या टाळ्यांचा आणि टाळांचा फोटो काढू शकेल - अगदी उत्तमरीत्या, पण त्या शेकडो माणसांमधून निर्माण होणार्या त्या टाळ्यांच्या आवाजाची एकजीवता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
गणपतीच्या आरतीपासून सुरू करत मग शंकराची, देवीची, विठ्ठलाची, ज्ञानेश्वराची, तुकारामांची, दत्ताची आणि सरतेशेवटी दशावताराची आरती होताना त्याचा हातातील तबकासाहीत बाप्पासोबत फोटो येईलही कदाचित, पण त्याची त्याच्या मनातल्या बाप्पासोबातची तल्लीनता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एरवी प्रत्येकाच रुटीन वेगळ, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, प्रोब्लेम्स वेगळे आणि त्या प्रसंगाना सामोरे जायचे मार्गही वेगळे, मग आज सगळ्यांचा एकत्र आरतीसाठी उभे असताना फोटो काढताना वाटलं की ती एकता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एखाद गाण अतिशय शांत स्वरापासून सुरू व्हाव आणि उत्तरोत्तर ती मैफील रंगत जाउन त्याचा शेवट एखाद्या उच्च स्वराशी व्हावा की बास हाच सूर शेवटी येउन भिडणार होता काळजाला अस वाटावं आणि त्यानंतरची ती प्रसन्न शांतता…तसच ह्या आरतीच…तेव्हा जाणवलं 'मंत्रपुष्पांजली' चे फोटो येतीलही कदाचित पण ती मनाच्या आतपर्यंत पोहोचलेली प्रसन्नता त्या फोटोत जाणवणार नाही…

एवढे सगळे विचार करून मी परत त्या आरतीत मिसळलो…एकरूप झालो…'त्याच्या' जयघोषात स्वत्व विसरून गेलो. कदाचित बाप्पापण त्याच्या भक्तांच्या सूरांत एवढा रममाण झाला होता की आशिर्वाद देताना त्याच्या उजव्या हाताची बोटे जरा थरथरून त्यातील दुर्वांची जुडी कधी खाली पडली हे त्याच त्यालाही कळल नाही…

…बस तेवढ फक्त त्यावेळी फोटोत 'टिपायच' माझ राहून गेल !


-- अमोल नेरलेकर

Monday, 14 September 2015

Blue OakLeaf Butterfly / शुष्कपर्ण

निसर्गाला प्रत्येक जीवाची काळजी आणि त्यामुळे 'स्वसंरक्षण'ही त्याने दिलेच प्रत्येकाला; फक्त ते आजमावण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मांजरी शेपटी फुगवून, नाग फणा काढून, प्राणी चित्कारून आणि पक्षी निरनिराळे आवाज काढून स्वत:च रक्षण करताना दिसतात, मग ह्याला फुलपाखरे तरी कशी अपवाद राहणार? काल ओवळेकर वाडी मध्ये फिरतना 'शुष्कपर्ण' फुलपाखराने लक्ष वेधून घेतले आणि मग त्याच्या अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. 

आकाशी निळ्या रंगाचे हे फुलपाखरू उडताना सहज लक्ष वेधून घेते. नर आणि मादी आकाराने सारखेच असून पंखविस्तार साधारणत: ८.५ से.मी ते १२ से.मी इतका असतो. वरील पंखांवरील निळ्या रंगाची छटा नरामाध्ये जास्त भडक असते. तसेच त्यावर मोरपंखी, निळा आणि फिकट हिरव्या रंगछटा दिसतात. ह्या फुलपाखरविषयी सगळ्यात अद्भूत गोष्ट म्हणजे त्याच्या पंखांची खालील बाजू! खालील बाजू फिकट चोकलेटी असून ती अगदी हुबेहूब एखाद्या वाळलेल्या पानासारखी दिसते आणि म्हणूनच त्याला मराठीत 'शुष्कपर्ण' असे संबोधले जाते. पानासारखी मधोमध ह्यालाही मुख, जाड देठेसारखा रंग असतो आणि त्यामुळे पंख मिटून बसले असताना आणि दुरून पाहिले की हे जणू वाळलेले पानच आहे असा भास होतो आणि हे भक्ष्य होण्यावाचून टळते. पंखांच्या खालील बाजूस छोटे छोटे पांढरे ठिपके असून महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दोन 'शुष्कपर्णांच्या' खालील पंखांची रंगसंगती (फिकट चोकलेटी रंगाचे प्रमाण, पांढर्या ठिपक्यांचे वितरण) सारखे नसते.




मादी कारवी, नारळाच्या झाडांवर अंडी घालते. ही अंडी एकेक विखुरलेली असून  रंगाने हिरवी आणि आकाराने गोल असतात. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला ५ दिवस लागतात. रंगाने चोकलेटी आणि आकाराने ०.२ से.मी इतकी असून त्यानंतर तिची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवरच होते. अळी ते सुरवन्ट हा प्रवास एकूण २४ ते ३० दिवसांचा असून त्यात ५ ते ६ टप्पे येतात. ६व्या टप्प्यानंतर त्याची लांबी ४.७ से.मी इतकी भरते. नंतर सुरवन्ट ते फुलपाखरू बनण्याचा काळ साधारणत: ९ ते ११ दिवसांचा असून ह्यासकट अंडी ते फुलपाखरू होण्याचा एकून काळ सुमारे ४० ते ४५ दिवस इतका भरतो. 



शुष्कपर्णाची उपजीविका प्रामुख्याने कारवीच्या झाडांवर आणि कुजलेल्या फळांवर होते. तसेच साधारण २३ से ते ३५ से तापमानात हे फुलपाखरू मुक्तसंचार करू शकते. शुष्कपर्णाचा वावर दक्षिण भारतात (मुंबई, नाशिक आणि त्याखालील दक्षिण प्रांत) येथे आढळून येतो आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये ह्याला Blue Oakleaf Butterfly बरोबरच South Indian Blue Oakleaf Butterfly ह्याही नावाने संबोधले जाते. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ ह्यांच्या अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. 

एकूणच, ह्या फुलपाखराला पाहिल्यावर निसर्गात किती विविधता आहे आणि प्रत्येकजण आपापले संरक्षण करायला कसा सामर्थ्यवान आहे ह्याची खात्री पटल्यावाचून रहावत नाही. 

फोटो :
१. अनंत नार्केवार
२. अमोल नेरलेकर

संदर्भ:
१. www.ncbi.nlm.nih.gov
२. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे 
३. www.google.com

-- अमोल नेरलेकर । १४.०९.२०१५  

Wednesday, 2 September 2015

स्वातंत्र्य

शनिवार, १५ ऑगस्ट. दुपारची साधारण १ वाजताची वेळ. दारावरची बेल वाजली.

सुट्टीचा दिवस असल्याने मी बर्यापैकी आळसावलेला होतो आणि त्यात आता सुस्त शरीराला १०-१२ पावलांची हालचाल करायला लागणार ह्या विचाराने चेहर्यावर आठ्या आल्याच. तसाच उठलो, दार उघडल. समोर साधारण ७० वर्षाचे आजोबा एक कुरिअर घेऊन उभे होते.

'अरुण नेरलेकर कोण इकडे? त्यांच कुरिअर आहे' अस म्हणत त्यांनी दाराच्या फटीतून ते कुरिअर आणि त्याची पावती देण्यासाठी सही करायचा असलेला कागद माझ्याकडे सरकवला. मी त्यावर सही करणार इतक्यात माझ्या मागून आवाज आला -

'या आजोबा, बसा. पाणी देऊ का? उन आहे ना बाहेर खूप. या, थोडावेळ बसा म्हणजे बर वाटेल…' बाबा त्या आजोबांशी बोलत होते.

'ते' आजोबा आत आले. बाबांनी त्यांना पाणी दिल. ते बसलेही २ मिनिट आणि नंतर बाबांना धन्यवाद देऊन निघून गेले. अवघ्या ३ ते ४ मिनिटांचा प्रसंग होता तो पण नक्कीच खूप काही विचार करायला लावणारा होता.

 नंतर जेवताना तो विषय निघाला तेव्हा बाबा मला म्हणाले -
'मगाशी आलेले आजोबा पाहिलेस? ७० वर्षांचे आहेत पण वेळ-काळ न पाहता, ऋतू कोणताही असो, त्यांना गेले अनेक महिने मी कुरिअर द्यायला येतात तेव्हा पाहतोय. त्यांच्याशी बोलतो. त्यांचही एक आयुष्य आहे. काही प्रसंग असतील, काही वेदना असतील. काही गोष्टी स्वत: आवडतात म्हणून ते करत असतील पण काही ठिकाणी त्यांचाच नाइलाज असेल म्हणूनही ते त्या करत असतील. दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते आणि प्रत्येक खरी गोष्ट दिसेलच अस नाही. पण आपल्यासमोर येणार्या प्रत्येक व्यक्तीची आपण विचारपूस करायला हवी. त्याला काय हवय-नकोय ते पहायला हव.

आमच्या तरुणपणाचा काळ खरच खूप सुंदर होता. मित्र असोत वा ओफिसमधले सहकारी आणि चाळीतले शेजारी असोत वा घरातले नातेवाइक, माणसाला माणसाविषयी आस्था होती, तळमळ होती आणि माणुसकी होती. त्यावेळी आत्ताइतकी संवादाची प्रगत साधने नसतीलही कदाचित पण माणसाला माणसाविषयी असणार्या भावना सखोल होत्या आणि त्यामुळे हृदयातल हास्य आणि चेहऱ्यावरील स्मित दोन्ही एकच होते. ते दाखवायला आम्हाला कोणत्या स्माईलीज आणि इमोजी लागल्या नाहीत.

तुमचा काळ वेगळा, गरजा वेगळ्या. पर्यायाने जगाशी संपर्कही वाढला तुमचा. पण न जाणे त्या वाढणार्या माणसांच्या संख्येसोबत तुमच्या मनातील राग, द्वेष, असूया, चीड, अहंकार, स्पर्धात्मक भावना ह्या सार्या गोष्टी पण वाढायला लागल्या आहेत आणि ह्याच गोष्टी तुमच्या मूळच्या मनाला आणि त्यातील माणुसकीला पारतंत्र्यात ठेवत आहेत, नेत आहेत. माणसालाच माणसापासून दूर नेत आहेत.

आज स्वतंत्र दिन. आजच्या दिवशीच देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण तुमची मन न जाणे कित्येक वर्षांपासून पारतंत्रात अडकलेली आहेत. त्यांना कधी  मिळणार स्वातंत्र्य? त्यांच्या हक्कासाठी कधी होणार लढाया, मोर्चे आणि सत्याग्रह? एकदा तुमच्या मनाला त्या पारतंत्र्यातून बाहेर काढून तर बघा म्हणजे सोनेरी सूर्यकिरणात फडकणार्या त्या शुभ्र, तेजस्वी ध्वजाची शान म्हणजे नक्की काय असते हे तुम्हाला वेगळ सांगायची आवश्यकता राहणार नाही…'

बाबांच हे बोलण ऐकल्यावर मनात एक वेगळ्याच विचारांची लाट आली जिचा प्रवाह ह्या पारतंत्रात अडकलेल्या मनाला मुक्त करू पाहत होता, त्याला स्वातंत्र्यसूर्य दाखवू पाहत होता…


-- अमोल नेरलेकर । ३१ ऑगस्ट २०१५ 

Thursday, 20 August 2015

करार...

न कळे तुझा हा कोणता आकार आहे,
मज शोधायला येथे मीच फरार आहे…

पटांवरी बघ रोज खेळ द्यूताचा चाले,
मला मारायचा तुझा डाव हुशार आहे…

अनेक राजांनी हा दरबार तुझा भरलेला,
भीक मागणारा मीच एकटा महार आहे…

उगा कशाला असावा मोह नसणार्याचा,
नशिबी माझ्या फक्त साधा नकार आहे…

नको करूस माझी तुलना भल्याभल्यांशी,
द्रोणाच्या नजरेतला मी, कर्ण सुमार आहे…

पुन्हा नको उजळवूस मार्गात दिवे माझ्या,
वार्यास न अडवणे - आपला करार आहे…

-- अमोल नेरलेकर, २०.०८.२०१५

Monday, 3 August 2015

ती म्हणाली तिला भेटताना मला बरोबर घेउन चल..

'ती' म्हणाली 'तिला' भेटताना मला बरोबर घेउन चल,
म्हण ना आम्ही होतो पुढे, 'तू' ही थोडी मागून चल..

तशी माझी काही फार फार अपेक्षा नाही,
सोबत मला नेताना खूप सजव असही म्हणत नाही..
मला माहितीये तिला भेटताना तुझे मन असते रिक्त,
म्हणून सांगते तुझासोबतची थोडी जागा दे फक्त,
तुझ्या त्या क्षणांच्या आठवणी सार्या साठवून घेइन,
तू म्हणशील तितकच आणि तेवढच फक्त लिहून घेइन..
बघ तुला पटतय का..!

मला माहितीये, ती नसताना तू माझ्याशीच तासंतास बोलत असतोस..
आणि मी ही ऐकत असते तुझ्या त्या गप्पा, स्वत:ला 'ती' बनवून..
कळतो रे मला तुझा हर्ष, विरह, दु:ख, त्रास..
म्हणूनच ती आल्याचा करून देते मी तुला थोडा भास..
आता कस बरोबर असेन तर मला थोड बर वाटेल,
तुला काही मदत लागली तर मी ही लगेच तयार असेन..
बघ तुला पटतय का..!

तुम्हा दोघांच्या नजरबंधात मी सहजतेने मावू शकते..
तुम्हा दोघांच्या स्पर्शांची अलगद मिठी बरी वाटते..
तुम्हा एकमेकांच्या सहवासात मी ही तिथेच बसलेली असते..
पण तुझ लक्ष कुठे असत माझ्याकडे?
तुझ आपल नेहमीचच..तिची नजर..तिचे डोळे..
मग मलाही येतो राग..मी ही रागावते तुझ्यावर थोडी..
पण वाटत माझ्याइतकच तिच्यावरही प्रेम करणार आहे कोणी..
तुम्हाला तस एकत्र बघून खूप खूप छान वाटत..
दुसर्याच्या सुखात आनंदी असण - जीवन आणखीन काय असत?
बघ तुला पटतय का..!!

तसा हट्ट हा नेहमीच मी तुझ्याकडे करत असते,
मला सारख बरोबर ने आग्रह नेहमी धरत असते..
तुला मी अन मला तू आपण एकमेकांचे जरी सोबती,
तरीही सांगते कुठल्याही नात्यांत करू नकोस ह्याची गणती..
नाती म्हटली की आली सारी सुख - दु:ख, इच्छा, भास,
स्वत:च्याच जगण्यावरती स्व:त करून घेतलेला त्रास..
पण खर सांगते तुझ्यामुळे ह्या कडव्यान्मधून जगता येते..
एका मूर्त कागदावरून लाख हृदयांत पोहोचता येते..अमूर्त प्रेयसी बनता येते..
बघ तुला पटतय का..!!

'ती' म्हणाली 'तिला' भेटताना मला बरोबर घेउन चल,
म्हण ना आम्ही होतो पुढे, 'तू' ही थोडी मागून चल..


-- अमोल नेरलेकर, ०२.०८.२०१५

Thursday, 30 July 2015

सारे कसे…

सारे कसे नियतीने आधीच ठरवलेले,    
मी मात्र फुकटचे अंदाज बांधलेले..        

मुक्त मनाने मी कधीचे सोडले होते शीड ,
सागराने मात्र आधीच वारे फिरवलेले..  

दारी काल होता, मोगर्याचा मंद गंध,
रोप तेच आज होते मुळातून उपटलेले..

भीक मागण्यासाठी झोळी पसरली होती,
ठिगळ्यांची झाली नक्षी, ते ही फाटलेले..

उगा कशाला करता अंधाराची चर्चा?
मार्गावरील दिवे त्यांनी आधीच विझवलेले..

माझ्यातील अनेकांसाठी प्राण वेचले मी,
माझ्यावरी ते अनेक खुशाल हासलेले..


-- अमोल नेरलेकर | २५ जुलै २०१५ 

Tuesday, 14 July 2015

चाफा

चाफा हे माझे सगळ्यात आवडत फूल! चाफ्याला गुलाबासारखा चुटूक रंग नाही…सुरेखपणे आणि व्यवस्थित रचलेल्या पाकळ्या नाहीत किव्वा गुलाबासारख ते प्रेमाच प्रतिकही नाही…पण चाफ़्याचा गंध घेऊन तर बघा! अवघा आसमंत आपल्या सुगंधाने व्यापून टाकण्याची क्षमता चाफ़्याकडे आहे आणि म्हणूनच गुलाब फुलांचा राजा असला तरी चाफा मला जास्त प्रिय आहे. 

तर त्याच झाल अस…चाफा आमच्याकडे तुम्हाला जवळपास रोजच दिसेल. पिवळा चाफा, रानचाफ़ा, हिरवा चाफा, पांढरा चाफा अशी अनेक प्रकारची चाफ्याची फुल आमचे घर सदैव गंधून टाकत असतात. ह्यामुळे चाफा कुठे चांगला मिळतो, १० रुपयाला सध्या किती चाफे मिळतात आणि अगदी त्याची कळी ते पूर्णपणे फुललेला चाफा ओळखायचा कसा आणि प्रसंगी त्यातला निवडायचा कोणता हे देखील आता तोंडपाठ झाले आहे. 

कालचीच गोष्ट…रविवार असल्यामुळे संध्याकाळी बाहेर चक्कर मारता मारता चाफ्याची फुले घ्यायला गेलो. मस्त ताजीतवानी आणि टवटवीत रानचाफ़्याची फुले मिळाली आणि ती पण चक्क १० रुपयाला ८ ! मन खूष झाले. जास्तीत जास्त कळ्या निवडून मी 'चांगल' ते पदरात पाडून घेतल आणि नंतर रविवारच्या डिनरला काहीतरी खास असाव म्हणून हॉटेलमध्ये काही डिशेश पार्सल घ्यायला गेलो. गरमागरम डिशेश पार्सल घेऊन त्यावर लवकरात लवकर कसा ताव मारता येईल ह्या विचारात मी चुकून ती चाफ्याच्या फुलांची पिशवी त्या गरमागरम पार्सलवर ठेवली आणि तसाच घरी आलो. अर्धा तासानंतर बघतो तर त्या उष्णतेमुळे ३-४ चाफ्याची फुले अगदी कोमेजून गेलेली. मन खिन्न झाले. जड मनाने मी ती फुले वेगळी केली आणि उर्वरीत फुले फ्रीजमधे ठेवली. त्या कोमेजलेल्या फुलांना आपल्यामुळे झालेल्या वेदना पाहून खूप वाईट वाटले आणि गहिवरून आले. त्याना तसच पाण्यात बुडवून मी जेवणाच्या तयारीला लागलो आणि बघतो तर काय - माझ्या दोन्ही हातांना चाफ़्याचा सुगंध येउन बिलगलेला! चटकन शाळेत शिकलेलं सुभाषित आठवले - 

'अंजलीस्थानी पुष्पाणि वासयन्ति करद्वयं,
अहो सुमनसान्म प्रीती वामदक्षिणयो समा ।।'

क्षणभर वाटले ही चाफ्याची फुले म्हणजे आपल्या आजूबाजूला असणार्या चांगल्या लोकांचे प्रतिक आहे. ती पण अशीच त्या  चाफ्यासारखी! उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कमी-जास्त ह्याच्यात भेदभाव न करता सुख आणि दु:ख दोन्हीत समान साथ देणारी! आपणच आपल्या उष्ण शब्दांनी, उष्ण वागण्याने त्यांच्यावर वार करीत आलो आहोत. त्यांना दुखावत आलो आहोत. क्षणभर ती ही मनातून दुखावली गेली असतीलही पण म्हणून त्यांनी तुमच जीवन सुगंधित करणे सोडल नाही… 

हा विचार येउन गेल्यावर त्या 'चाफ्याच्या' फुलांकडे बघायची दृष्टी बदलून गेली. बाजूला पाण्यात बुडवून ठेवलेल्या 'त्या' फुलांना मी परत जवळ केले आणि माझ्या उशाशी अलगद नेउन ठेवले. मुळातच चाफ्याच फूल नसलेला 'मी' त्यांचा सुगंध घेऊन आणि त्यालाच परावर्तित करून त्यांचाच एक लहान भाग बनू पाहात होतो… 


-- अमोल नेरलेकर । १३.०७.२०१५ 

Friday, 10 July 2015

शोषण

'अव्ह सायब, राहू द्या की…सोडा आता…अर्धा किलो घेऊन जा हवतर पण असा पोटावर पाय नका देवू व्हो…तान्ह पोर आहे पदरात…' अस म्हणत तिन आपला वीतभर लांबीचा पदर त्या सायबासमोर मोठ्या जीवाच्या आकांताने पसरला. तेवढा लहान पदर, सुकलेली काया आणि रात्री दोन घास तरी तोंडात पडतील  का अशी गर्द भीती चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येईल असे तिच्या त्या लहान, चिमुरड्याचे काळेभोर डोळे बघून मनात क्षणभर संतापाची आणि तेवढीच वेदनेची सणक सर्कन सरसरून गेली. 

ती अर्तता कानांत अशी प्रत्यंचातून वेगाने सुटलेल्या बाणासारखी घुसली. 'त्या' तान्हयाचा गहिवरलेला आवाज ऐकून कानांत चालू असणार्या गाण्यातील आर्त स्वर पण फिके पडले आणि क्षणभर माझी नजर आणि काया तिथेच खिळून राहिली. 
'तो' साहेब पण तेवढाच निर्दयी निघाला. समोरच्याची काहीही पर्वा न करता आपली तुंबडी कशी भरेल आणि ती भरवून घेताना समोरच्याला किती जास्तीत जास्त त्रास होईल किव्वा देता येईल ह्याचाच विचारात असलेला. 

संध्याकाळचे ७, डोंबिवलीस्टेशन बाहेरचा रेल्वे पूल, भाज्या विकून कसाबसा उदरनिर्वाह चालवून देणारी तिची टोपली आणि माणसांनी खचखचून भरलेल्या गर्दीत आणि त्याच्या गोंधळातही तो प्रसंग मनाला स्तब्ध करून गेला. 'शोषण'…होय शोषणच…अधिकाराच्या जोरावर एका माणसाने दुसर्या माणसाच केलेलं 'शोषण' ! कधी पैश्यासाठी, कधी अधिकारासाठी, कधी भावनांच आणि कधी शरीराच केलेलं शोषण!
आपण सदैव समोरच्यपेक्षा सरस आहोत आणि आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक अधिकार आहेत, तेही सर्व बाबतीत हे सदैव सिध्द करण्याची सूडी प्रवृत्ती  म्हणजे 'शोषण' करण! कधी ह्या नीच गोष्टी जन्मजात मिळालेल्या तर कधी पैसा आणि सत्ता ह्या बळावर विकत घेतलेल्या. 

काही केल्या त्या पदर पसरणारीचा चेहरा डोळ्यासमोरून जाईना. आपल्या आजूबाजूला रोजच अशी कित्येक उदाहरण घडत असतील, घडत आहेत. त्यापैकी किती जणांकडे आपल लक्ष जात? लक्ष गेलेल्यांपैकी किती जणांना आपल्याला मदत करावीशी वाटते? मदत करावीशी वाटणाऱ्यान्पैकी किती जणांसाठी आपले हात सरसावतात आणि सरसावलेल्या हातांमध्ये किती जणांसाठी ती कायम स्वरूपी मदत ठरते?
खरच विचार करण्यासारखे प्रश्न आहेत हे!

आजही आपल्या आजूबाजूला पोटासाठी असा पदर 'पसरणारी' आहे, कुणीतरी मोठे मोठे विनाकारण आरोप करून मन दुखावल्या गेलेल्या व्यक्ती आहेत, शरीरावर झालेल्या वारांवर स्वतःच केविलवाणे उपचार करत बसलेले दु:खी जीव आहेत तर आपण जमवलेल्या चार पैशांवर फुकटचा मालकी हक्क दाखवून गेल्यामुळे व्यथित झालेलेही आहेत. आपल्या आजूबाजूला 'शोषण' अनेकवेळा, अनेक प्रकारांतून अनेक व्यक्तींवर अनेक जणांकडून घडत आहे. 

चांगल-वाईट, दया-असूया, चूक-बरोबर किव्वा योग्य-अयोग्य ह्या रूढी नसून मानसिकता आहे; आपल्याला ती योग्य दिशेने वळवायलाच हवी आणि अशा मानसिकतेचा प्रसार आणि आचरण झाल्यास असहाय्यपणे त्या राक्षसी प्रवृतीसमोर नाहक पदर पसरणार्यान्च्या आयुष्यात आपल्याला सुखाचे क्षण आणता येईल हे मात्र नक्की!

-- अमोल नेरलेकर । १० जुलै २०१५

Wednesday, 24 June 2015

Oriental Garden Lizard / सरडा

'इच्छा असतात रंगान्सारख्या, 'सरड्यासारखे' मन…'  हि संदीप खरेची कविता वाचत असताना माणसातल्या अनेक रंगांची जाणीव झालीच आणि मस्त गरम गरम चहा करून घ्यायला उठलो तर नजर सहज खिडकीबाहेर गेली तर समोर खरच 'सरडा' बसलेला आणि अतिशय शांत व स्तब्ध स्थानात. त्याचे काही फोटो काढून आल्यावर 'कवितेतल्या' सरड्याला बाजूला ठेवून ह्या फोटोतल्या सरड्याचा अभ्यास सुरू झाला.


Oriental Garden Lizard/ Eastern Garden Lizard/ Changeable Lizard  किव्वा मराठीत आपण ज्याला बाग सरडा किव्वा 'सरडा' म्हणतो हा अगदी शहरातसुद्धा सहजपणे आढळून येणारा सरपटणारा प्राणी आहे. शरीराने साधारणत: ~१० सेमी (आणि शेपटीची लांबी पकडून ~४० सेमी) असणारा हा प्राणी त्याच्या रंग बदलण्याच्या गुणधर्मामुळे सर्वद्नात आहे. नर आणि मादी दोघेही लांबीला सारखे असून शरीराचा जमिनीलगतचा भाग विरळ चॉकलेटी रंगाचा असून वरील भाग हा पिवळसर चॉकलेटी रंगाचा असतो. प्रजननाच्या काळात (विणीच्या हंगामात)  नर मादीला आकर्षित करण्यासाठी अनेक रंगबदल करतो. हे रंगबदल डोक्यापासून पुढील दोन पायांच्या भागापर्यंत (गळयाचा भाग पकडून) अधिक असून हा बदल मुख्य पिवळसर चॉकलेटी पासून भडक लाल, काळा किव्वा मिश्रित स्वरूपात असतो. हा रंगबदल उर्वरीत शरीरावर आणि शेपटीनजीक सुद्धा दिसून येतो. तसेच विशेष म्हणजे सरड्यांची मान वळत नाही आणि म्हणूनच दोन्ही डोळ्यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेला पूर्णत : १८० अंशांपर्यंत बघण्याचे वरदान ह्यांना लाभले आहे.



सरड्याची उपजीविका मुख्यत्वे किडे आणि लहान प्राणी (नाकतोडे, माश्या, ई.) ह्यांवर असते. कधी कधी हे सरडे लहान सरड्यांनासुद्धा आपले भक्ष्य बनवतात आणि कधी कधी भाज्यासुद्धा खाताना दिसतात! दात असले तरी त्यांचा मुख्य वापर हा भक्ष्याला पकडण्यासाठी केला जातो.

प्रजनन कालावधी मे-जून मधे असून मादीला आकर्षित करण्यासाठी नर आपले रंग बदलतो आणि अशाप्रकारे जास्तीत जास्त चांगले रंग खुलवण्यासाठी चढाओढ चालू राहते. मादी एकावेळी ५ ते २० अंडी घालते आणि ही अंडी झुडूपी भागात ओलसर मातीखाली पुरली जातात. अंडी आकाराला लंबाकृती असून आकाराला ०.७ सेमी इतकी असतात. ६ ते ७ आठवड्यात अंडी उबतात आणि नवजात पिल्लांची लांबी १ - १.२५ सेमी इतकी भरते. साधारणपणे पहिले १ वर्षभर ह्या नवजात पिल्लांचा सांभाळ केला जातो. सरड्याचे एकूण आयुष्यमान ५ वर्षांपर्यंत असते.




 Oriental Garden Lizard मुख्यत: इराणमधले. पण त्यांचे वितरण आणि वावर आशियाखंडातील बहुतांश देशांमध्ये (भारत, अफगाणिस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, व्हिएतनाम, मलेशिया आणि सिंगापूर) आढळून येते. सिंगापूरमध्ये ह्यांचे अस्तित्व तिकडल्या Green-Crested Lizard जातीला धोक्याचे ठरत आहे. नुकतीच ही जात ओमान आणि अमेरिकामध्ये १९८० च्या दशकापासून दिसून आल्याचे नोंदले गेले आहे.



सरडा ही प्राणिजात आपल्याकडे पहिल्यापासूनच दुर्लक्षित आणि दुय्यमप्रकारात गणली गेली आहे. परंतू माणसासोबत ह्या शहरी वातावरणात अगदी मिळून -मिसळून राहून आणि अनेक प्रकारचे किडे-प्राणी खाउन ते निसर्गाचे जैवचक्र संतुलित ठेवायला मदत करत असतात. त्यामुळे त्यांच्या बदलणार्या रंगाप्रमाणे आपली त्यांच्याकडे पहायची दृष्टीदेखील बदलेल अशी आशा करूयात !

संदर्भ - www.गुगल.com

फोटो :
अमोल नेरलेकर :
1. Oriental Garden Lizard (male in non-breeding season)
3. Oriental Garden Lizard (male in breeding season)
4. Oriental Garden Lizard (male with Prey)

Nireekshit:
2. Oriental Garden Lizard - Female

-- अमोल नेरलेकर । २४.०६.२०१५

Friday, 19 June 2015

पाउस, कविता आणि…

'अचानक' हा शब्द जेव्हा 'पावसाळी सुट्टी' ह्याला जोडून येतो तेव्हा 'हायस वाटण' म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ कळतो. एखाद्या पावसाळी दिवसात तुम्ही आवरून तयार होता आणि 'अचानक' उमगत की पावसाने आज तुम्हाला सुट्टी मिळवून दिली आहे आणि मग अशा दिवसाच मोल बाकीच्यांपेक्षा काही औरच, नाही का?

आणि मग ह्या 'अचानक' मिळालेल्या सुट्टीच्या दिवसात काय काय करायचं ह्याचा बेत आखण सुरु होत. कुणी घरातली राहिलेली काम करत, कुणी मस्त 'ताणून' देतात, कुठे एखाद्या कट्ट्यावर किव्वा एखाद्याच्या घरी भजी आणि चहासंगे मैत्रीतल्या गप्पा रंगतात तर कुठे कुणीतरी बर्याच दिवसांपासून परत परत वाचायची राहिलेली 'कविता' घेऊन बसत…

'बारिश आती है तो पानी को भी लग जाते है पाँव,
दरोदीवार से टकरा के गुजरता है गली से,
और उछलता है छपाको में,
किसी मैच में जीते हुए लडकोन्की तरह…'  *
पाउस, कविता आणि 'गुलजार' साब म्हटलं की आठवत ते ह्या कवितेत वर्णिलेल बालपण! सुख, आनंद, विजय आणि उत्सव ह्या सगळ्याच्या व्याख्या किती वेगळ्या होत्या नाही त्या वयात? एखाद साध, छोटस चोकलेट पण मनाला तृप्त करून जायचं. कोसळता पाउस पडत असताना भिजून आलो म्हणून आईकडून वेखंड लावून घेण्यात आणि तिच्या हातचा गरम गरम तूप-लिंबू-वरण-भात खाण्यातपण एक वेगळीच खासियत होती, वेगळीच चव होती ! जगातल्या कोणत्याही सर्वोत्तम डिशसोबत त्याची तुलना होऊच शकत नाही. अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'दूर, इथून फार-फार दूर,
माझ एक गाव आहे…
आज ह्या शहरात पाउस उतरलाय आणि
मला त्याची फार फार आठवण येतेय…' **
पाउस, कविता आणि सौमित्र म्हटलं की आठवते ती ही कविता. माझ बालपण संपल आणि पुढे शिक्षण आणि नोकरी-चाकरीसाठी मी शहरात आलो, गावाला खूप खूप मागे टाकत. हे शहर आहे तस अगदी जवळ, बाजूलाच…पण माझ्या मनाला मी त्या निरागस, मुक्त गावापासून आणून ठेवलं ह्या औपचारिक आणि कपटी इमारतीन्नी वेढलेल्या शहरात. स्पर्धा, घाई ह्यांनी माझ आयुष्य अगदी वेढून टाकलय आणि मी ही अडकून गेलोय ह्या चक्रव्रूहात…अभिमन्यूसारखा. ह्या सगळ्यात माझ्या बालपणाची मला आठवण येते, अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'इवल्याश्या स्पर्शांनीच रान शहारले,
मंद गारव्यात पान-पान थरारले…
पांघरून आभाळाचे गीत ओलेचिंब,
वळवून कूस थवे फुलांचे झोपले…' ^
पाउस, कविता आणि सुरेश भट हे तिघे एकत्र आले की ही कविता. गझलांखेरीज अशा अनेक सुंदर कविता त्यांनी लिहिल्या. ह्या शहराच्या दाटीवाटीतपण निसर्गात गेल्याचा भास झाला आणि परत गावाकडचे (निर्मळ बालपणाचे) दिवस आठवले! शेते फुलली आहेत, सर्वत्र हिरवाई नटली आहे, उन-पावसाच्या खेळामध्ये सप्तरंगी इंद्रधनू खुलले आहे…अहाहा! असा मनसोक्त बहरलेला निसर्ग पाहिला की अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'पाउस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा थेंबांच्या संथ लयींचा…
पाउस असा रूणझूणता पैंजणे सखीची स्मरली,
पाउल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली…' ^^
पाउस, कविता आणि संदीप खरे ! पाउस हा असा प्रेमात पडायला लावणारा. तशी माझी अन तिची ओळख खूप जुनी, अगदी बालपणापासूनची. पण वयानुसार वाढताना बदलत गेलेली ओळख आणि कळत गेलेला माणूस नात्याला नवीन अर्थ देऊन जातो. पाउस असा गुंजायला लागला की तिची खूप आठवण येते…सोबत घालवलेले क्षण, अगदी बालपणापासूनचे ! तिची आठवण आली की अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

पाउस हा असाच वेगवेगळी रूप घेऊन आपल्या सभोवती वावरत असतो. प्रत्येक पाउस वेगळा, प्रत्येकाचा पाउस वेगळा आणि म्हणूनच प्रत्येकाच्या कवितेतून व्यक्त होणारा प्रत्येकवेळीचा पाउस वेगळा !

पाउस हा एखाद्या व्यक्तीसारखा असतो अस मला वाटत. पाउस कधी कधी खूप आवडतो, कधी कधी खूप जीव लावतो, कधी त्याचा खूप राग येतो आणि कधी कधी तो नकोसा वाटतो. पाउस बरच काही सांगत असतो, पाउस बर्याच जणांच ऐकत असतो. पाउस कधी कधी खूप बोलका असतो, असावासा वाटतो तर कधी नुसताच खिडकीबाहेर पडणारा तो त्रयस्तासारखा भासतो. कधी डोळ्यांसमोरपण नकोसा होतो तर कधी त्याच नुसत अस्तित्वपण बरच काही बोलून जाते, देऊन जाते…पाउस हा तसाच असतो, सगळ्यांसाठीच सारखा, खरतर तुम्ही जस संबोधाल त्याला, पाउस तसा असतो!

'पाउस, कविता आणि…' लिहिताना ती मला 'चल भिजायला जाऊ म्हणाली'…
'मला पाउस नुसता बघायलाच आवडतो…भिजण-बिजण कशाला उगाच' अस म्हटल्यावर रुसून बसली, आणि मग -

'आज पुन्हा बरसला तुला आवडणारा पाउस,
आज पुन्हा कोसळतो नावडणारा पाउस…

रागारागाने मी तयासी हजार नावे देता,
पापण्यांत तुझ्या कसा दाटला पाउस…

माझ्या नेक नियमांत साचेबध्द राहताना,
मुक्तछंदात तुझ्या कसा झुलला पाउस !'

अस लिहिल्यावर तिचापण रुसवा कधी निघून गेला कळलच नाही आणि ते ही भिजायला न मिळूनदेखील! 'पाउस' हा अशाप्रकारे दुरावलेली नातीपण जवळ आणतो हे उमगल्यावर त्याचे मनोमनी आभार मानल्याशिवाय रहावले नाही…!


कविता संकलन -
*   : 'रात पश्मिने की' - गुलजार.
** : 'आणि तरीही मी…' - सौमित्र.
^  : 'एल्गार' - सुरेश भट.
^^ : 'सांग सख्या रे - अल्बम' - संदीप खरे.


-- अमोल नेरलेकर । १९.०६.२०१५  

Sunday, 14 June 2015

षड्ज

काल बोलता बोलता सहज विषय निघाला आणि ती मला म्हणाली, 'तुझ्या आयुष्यात एवढ्या व्यक्ती आहेत, एवढी नाती आहेत मग त्यात माझ अस वेगळेपण काय?'

क्षणभर मी काय बोलायच ह्याचा विचार करत होतो कारण सगळ्याच भावना व्यक्त करता येतातच अस नाही आणि  व्यक्त करता आल्या तरी शब्दांत मांडता येतीलच असही नाही.
मी तिला म्हणालो,

'माणसाच आयुष्य अनेक माणसांनी आणि नात्यांनी फुलल आहे, बहरलं आहे आणि ही नाती किव्वा माणस पण बघ ना कशी संगीतातल्या स्वरांसारखी! षड्जापासून निषादापर्यंत अनेक रूपांतून सजलेली आणि प्रत्येकजण स्वतःची अशी स्वतंत्र ओळख पाळणारा. कोणाचा तरी भाऊ, मुलगा, मित्र, सहकारी, प्रियकर, नवरा, बाप आणि अगदी काका-मामापर्यंतसुद्धा ! ह्यातलं प्रत्येक नात एखाद्या स्वरासारख आहे आणि त्यातपण परत अनेक प्रकार. 'मित्र', 'सहकारी', 'भाऊ' आणि 'काका'-'मामा' म्हणजे ऋषभ, गांधार, धैवत आणि निषादासारखे; शुध्द पण आणि कोमल पण…म्हणजे एकाच स्वराची - एकाच नात्याची दोन रूप !  'बाप' हे मध्यमात बसणार; कधी सामान्य तर कधी त्या नात्याची तीव्र भावना घेऊन जगणार…आणि 'मुलगा' म्हणजे पंचमासारख - संपूर्ण सप्तकाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर अविरत पण तितक्याच सहजतेने आणि संयमाने पाळणार! अशा अनेक स्वरांच्या मिश्रणानेच तर माणसाच्या आयुष्यात अनेक 'राग' भरले आहेत आणि असे अनेक 'राग' गाउन जगण हीच तर खरी मजा आहे…!'

'मग ह्या सगळ्यात मी कुठे आले?' तिने विचारलं.

'तुझ्याशी असलेल नात षड्जासारख आहे, अटळ आणि प्रत्येक सप्तकाची सुरेल सुरुवात करणार. कोणताही 'राग' असो, त्यात कोणतेही 'सूर' असोत, गायकाला षड्जाचाच आधार लागतो आणि षड्ज कळल्याशिवाय कुठलच संगीत उमजू शकत नाही! 'भूप' असो वा 'देस' आणि 'मारवा' असो वा 'भैरवी' कोणत्याही रागात आणि त्याच्या प्रहरात षड्जाला तितकच अढळ आणि मानाच स्थान आहे. 'षड्जा'शिवाय संगीत अपूर्ण आहे...'

क्षणभर तिला रागांची नावे कळली नाहीत पण ह्या सगळ्या चर्चेतून एक खूप छान मैफिल सजल्याचे समाधान मात्र मला मिळाले…!


-- अमोल नेरलेकर । १४.०६.२०१५

Tuesday, 2 June 2015

Red Pierrot Butterfly / लाल कवडी

'आतून एक आणि बाहेरून एक' अस आपल्याकडे थट्टा करताना म्हणण्याची पद्धत आहे. पण हेच जेव्हा फुलपाखरांच्या रंगान्बाबतीत दिसून येत तेव्हा नवल वाटल्यावाचून रहात नाही.  सातार्याजवळील चंदन-वंदन ह्या जोड-किल्ल्यांवर फिरताना मला भेटलेले हे फुलपाखरू : Red Pierrot अर्थात लाल कवडी.

नर आणि मादी दिसायला सारखे असून पंखांची आतील बाजू (upper-wings) काळ्या आणि नारिंगी रंगाची असते. ह्यात काळ्या रंगाचे प्रमाण जास्त असून पंखांची खालिल बाजू नारिंगी रंगाची असते. पंखांच्या बाहेरील बाजू (lower-wings) पांढर्या रंगाची असून त्यावर काळे ठिपके दिसतात. वरच्या बाजूस मात्र पंख काळे असून केवळ मागील पंखांची खालची बाजू नारिंगी रंगाची असते. पंखांच्या वरील आणि खालिल बाजूंच्या कडांवर काळ्या-पांढर्या रंगाची बॉर्डर दिसते. पंखविस्तार ३ ते ३. ६ से.मी. इतका असतो.




लाल कवडीचा वावर मुख्य:त करंज, तामण आणि पानफुटीसारख्या वनस्पतींवर आढळतो. मादी प्रामुख्याने पानफुटीच्या पानांच्या खालील बाजूस अंडी घालते. ही अंडी पांढरट-पोपटी रंगाची असून एकाजागी एकच अंडे घातले जाते. अंडे उबल्यावर त्यातून सुरवंट बाहेर पडते आणि त्याची उपजीविका पानफुटीच्या पानांवर चालते. ह्या सुरवंटाचा रंग फिकट पिवळा ते पांढरा असा असतो आणि पूर्णांग पाढर्या केसांनी अच्छादिलेले असते. सुरवंटाची पुढे वाढ किद्यात होते आणि त्याचा रंग पिवळट असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात आणि लांबी साधारण १ से.मी इतकी असते. ह्या किड्याचे रूपांतर पुढे फुलपाखरात होते.



लाल कवडी हे जमिनीलगत अत्यंत संथ गतीने उडणारे फुलपाखरू आहे. सूर्यस्नान आवडत असल्यामुळे दुपरच्यावेळेसच ह्याचा उघड्या पंखांचा फोटो घेणे शक्य होते, एरवी हे पंख बंद करून बसते. ह्याचा वावर संपूर्ण भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात आढळतो. लाल कवडी हे निर्भय फुलपाखरू असल्याने पुढील वेळी दिसल्यास त्याचे फोटो काढायला नक्की विसरू नका…!

Scientific name : Talicada nyseus
Class/ Family : Insecta / Lycaenidae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com. 

(फोटो : १. हनीश के. एम. , २. अमोल नेरलेकर)


-- अमोल नेरलेकर

Monday, 1 June 2015

Yellow Pansy Butterfly / हळदी भिरभिरी

निसर्ग म्हणजे नानाविध रंगांची उधळण. त्याच्यातील अनेक घटकांमधून रंगांची विलोभनियता अगदी सहज दृष्टीस पडते. मग ह्या विविधतेला फुलपाखर तरी कशी अपवाद राहणार? कण्हेरगडावर फिरताना मला भेटलेले पिवळ्याधमक रंगाचे फुलपाखरू : हळदी भिरभिरी




नराच्या पंखांवरील रंग हा मादीपेक्षा जास्त ठळक असतो. दोघांच्या पंखांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे मोठे ठिपके आढळतात. ह्या ठिपक्यांचा आकार नरामध्ये मादीपेक्षा मोठा आणि ठळक असतो. निळ्या ठिपक्यांच्या भोवती असणार्या काळ्या रंगाचे प्रमाण नरामध्ये जास्त असते. मादीच्या पंखांवर निळ्या-काळ्या रंगाचे दोन छोटे 'डोळे' नजरेस पडतात. दोघांच्याही पंखांच्या वरील बाजूस पांढर्या-काळ्या रंगाची झालर दिसते. पंखांची खालेल बाजू निळ्या-राखाडी रंगाचे असते. पंखविस्तार ४.५ ते ६ से.मी. पर्यंत असतो. 




हळदी भिरभिरीचा वावर कोरांटी वनस्पतीवर जास्त प्रमाणात आढळून येतो. अंडी साधारण हिरव्या रंगाची असून आकार ०.६ ते ०.७ मि.मी. असतो. साधारणत: २ ते ३ दिवसात अंडी उबून त्यातून सुरवंट बाहेर येते. सुरवंटाची लांबी १.३ मि.मी. पर्यंत असते. सुरुवातीचे काही दिवस सुरवंटाची उपजीविका अंड्याच्या कवचावर होते. २२ दिवसांमध्ये अनेक टप्प्यातून ह्याची वाढ होत लांबी ४ से.मी. पर्यंत वाढते. त्याचा रंग फिकट लाल रंगाचा असतो. 




Yellow Pansy म्हणजेच हळदी भिरभिरी आफ्रिका, दक्षिण आशिया, भारतात आणि पर्यायाने सह्याद्रीत सर्वत्र आढळणारे फुलपाखरू आहे. ह्याच्या पिवळ्याधमक रंगामुळे ते सहज दृष्टीस पडते परंतू ह्याच रंगामुळे ह्याला स्वसंरक्षण करणेदेखील तितकेच कठीण जाते. 

Scientific name : Junonia hierta
Class/ Family : Insecta / Nymphalinae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com.

फ़ोटो : १. हळदी भिरभिरी : नर (D. Momaya) ; २. हळदी भिरभिरी : मादी (अमोल नेरलेकर).

-- अमोल नेरलेकर

Saturday, 30 May 2015

Painted Lady / पेंटेड लेडी

एखादे फुलपाखरू बर्याच वेळा पाहिलेले असते परंतू तरीदेखील प्रत्येकवेळी बघताना त्याची मिळणारी नवनवीन माहिती ज्ञानात भर घालत असते. सह्याद्रीत फिरताना अशी अनेक फुलपाखरे आपले लक्ष वेधून घेतात. लोहगड, सज्जनगड, तिकोना, राजगड, त्रिंगलवाडी आणि काल कण्हेरगडावर फिरताना मला भेटलेले हे फुलपाखरू.

पेंटेड लेडी हे त्याच्या रंगामुळे दुरूनही सहज ओळखता येण्यासारखे आहे. ह्याच्या लालसर-गुलाबी रंगाच्या पंखांवर कोपर्यात काळ्या-पांढर्या ठिपक्यांची झालार दिसते. पंखांच्या वरील बाजूस ही नक्षी अधिक उठावदार असते.पंखांवर छोटे-मोठे काळे ठिपके दृष्टीस पडतात. पंखांची पुढील बाजू पांढरट तपकिरी रंगाची असून त्यावर पांढरे आणि फिकट काळे ठिपके दिसतात. तपकिरी रंगामुळे पंख मिटून बसले असताना हे फ़ुलपाखरू लगेच दृष्टीस पडत नाही. ह्याच्या पंखांचा विस्तार साधारण:त ६ ते ७ से.मी. पर्यंत असतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असून ह्यांचा वावर गवताळ प्रदेश आणि कोरांटी वनस्पतीवर आढळतो.




कोरांटी वनस्पतीवर मादीने अंडी घातल्यावर ५ ते ७ दिवसांत त्यातून सुरवंट बाहेर येते. ह्या वनस्पतीच्या पानांवरच हे आपली उपजीविका करते आणि त्याच्या डोक्यावरील चिकट स्त्रावामुळे हे तेथे चिकटून राहते. पुढील ७ ते १० दिवसात ह्या सुरवंटाची वाढ पूर्ण होते आणि त्याच्या पंखविस्ताराला सुरुवात होते. साधारण पुढील १० दिवसात ही वाढ पूर्ण होते आणि ते उडण्यासाठी तयार होते. 

पंखविस्तार झाल्यावर पेंटेड लेडीचे आयुष्यमान अवघे १५-२० दिवसांचे असते. ह्या काळात त्यांचा भर अधिकाधिक पुनरुत्पादन करून ही प्रक्रिया जीवित ठेवण्यावर असतो. 

जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे फुलपाखरू म्हणून पेंटेड लेडी सर्वज्ञात आहे. भारतात देखील हे सर्वत्र आढळते. अत्यंत चंचल असे हे फुलपाखरू खूप वेगाने उडते आणि त्यामुळे ह्याचे फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असायला हवा हे मात्र नक्की !




Scientific name : Vanessa cardui
Class/ Family : Insecta / Nymphalinae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे) 

--अमोल नेरलेकर

Common Sailor Butterfly / भटके तांडेल

'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी आपल्याकडे मराठीत म्हण आहे; परंतु ट्रेक करताना किव्वा निसर्गात फिरताना आपल्याला 'व्यक्ती तितक्या आवडी' असे म्हणावे लागेल. सह्याद्रीत फिरताना कुणाला आवडतो तो त्याचा इतिहास, कुणाला भौगोलिक रचना, कुणाला प्राणी जीवनाचे वैविध्य तर कुणाला अगदी सहजपणे लक्ष वेधून घेणारे 'भटके तांडेल' सारखे फुलपाखरू…




कोवळ्या उन्हात पंख पसरून शांतपणे बसलेले 'भटके तांडेल' (Common Sailor) आपले लक्ष वेधून घेते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून त्यांचा पंखविस्तार अंदाजे ५ ते ६ से.मी. पर्यंत असतो. पंखांचा रंग काळा असून त्यावर पांढर्या ठिपक्यांनी मिळून तयार झालेले तीन पट्टे असतात. पंखांचा खालिल भाग बदामी रंगाचा असतो. पंखांच्या कोपर्यावर असणारी काळ्या-पांढर्या रंगाची बारीक झालार त्याच्या रूपात सौंदर्य भरवते. 




हयाचा वावर शेवरी आणि मुरुडशेंग ह्या वनस्पतींवर प्रामुख्याने आढळतो. अंडी ०.९ मि.मी. आकाराची असून गोलाकृती असतात. अंडी उबायला साधारणत: ३ ते ४ दिवस लागतात आणि त्यानंतर बाहेर पडणारे सुरवंट लांबीला २.२ मि.मी. आणि रंगाने हिरवट असून त्यावर फिकट तपकिरी ठिपके असतात. पुढील साधारण २२ दिवसात ह्याची वाढ पूर्ण होते आणि त्याची लांबी २५ मि.मी. इतकी होते. पुढील २ दिवसात सुरवंटाचे फुलपाखरू होऊन ते उडण्यासाठी तयार होते.

भटके तांडेल अलगद आणि हळुवार उडते आणि म्हणून कदाचित त्याला 'sailor' असे म्हणले जात असावे. Common Sailor दक्षिण आशिया आणि भारतात सर्वत्र आढळते. बाकी काही फुलपाखरान्प्रमाणेच ह्याचा पंखांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होतो.

Scientific name : Neptis hylas
Class/ Family : Insecta / Nymphalidae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे)

-- अमोल नेरलेकर

Thursday, 28 May 2015

Lemon Pansy Butterfly / लिंबाळी


सह्याद्रीमध्ये जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे. एखादा किल्ला किव्वा गड चढायला चालू केल्यावर त्याच्या पायथ्यावरील गावापासून ते वरती गडावर पोहोचेपर्यंत ह्या जैवविविधतेत खूप फरक जाणवतो. हा फरक मुख्य:त उंची, बदलणारी हवा आणि वातावरणाची अनुकुलता ह्यावर अवलंबून असतो. सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावात मुक्तपणे संचार करताना दिसणारे हे फुलपाखरू. 




लेमन पॅन्सी / लिंबाळीचा वावर मुख्य:त जमिनीलगत आढळतो. अत्यंत चंचल असे हे फुलपाखरू जरा जरी धोका वाटल्यास दूर उडत जाते. परंतू तरीदेखील ते फिरून त्याच ठिकाणी येते आणि म्हणून त्याचा वावर एकाच ठिकाणी जास्त असल्याचे आढळून आले आहे. गोधडी व ताग अशा वनस्पतींवर आणि झेंडू, राईमुनिया व केतकीच्या फुलांवर ह्याचा वावर दिसतो. 



मादी ताग, मारंडी, जास्वंद अशा वनस्पतींवर पानांच्या खालील बाजूला अंडी घालते. ही अंडी हिरव्या रंगाची आणि आकाराला नळाकृती असतात. साधारण ३ दिवसांमध्ये अंडी उबतात आणि त्यातून सुरवंट बाहेर येते. साधारण १२ ते १५ दिवसात ह्याची वाढ पूर्ण होते. ह्या दरम्यान ते त्या वनस्पतींची पाने आणि अंड्याचे कवच ह्यावर उपजीविका करते. त्यानंतर ते आळीत (Pupal) मध्ये प्रवेश करते. हा टप्पा साधारण ५ ते ७ दिवसांचा असतो. अशाप्रकारे अंड्यापासून ते पूर्ण वाढ होईपर्यंत ह्याला २२ ते २५ दिवस लागतात.

                                                  

नर आणि मादी दिसायला सारखे असून त्यांचा रंग तपकिरी असतो. पावसाळा आणि हिवाळ्यात (wet season) मध्ये हा रंग जास्त ठळक असल्याचे जाणवते. पंखांवर चार ठळक 'डोळे' असून त्याव्यतिरिक्त अनेक काळे पिवळे ठिपके आणि कडांना  काळ्या-पिवळ्या रंगाची झालर असते. पंखाविस्तार ४ ते ६ से. मी. पर्यंत असतो. पंखांची खालची बाजू फिकट तपकिरी रंगाची असते आणि त्यामुळे पेंटेड लेडीसारखेच हे पंख मिटून बसले असता लगेच दृष्टीस पडत नाही. 
                             

    


दक्षिण आशिया आणि भारतात ह्याचा वावर सर्वत्र आढळतो. साधारण २० ते ३५ अंश तापमानात हे फुलपाखरू जिवित राहू शकते आणि त्यामुळे सातत्याने तापमानात होणारी वाढ ह्यांच्या अस्तित्वासाठी मोठे आव्हान ठरत आहे. 

Scientific name : Junonia lemonias
Class/ Family : Insecta / Nymphalinae

संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे) 

--अमोल नेरलेकर 

Wednesday, 29 April 2015

'हॅण्डीक्राफ्ट' आणि बरच काही…

बालगंधर्वांच्या भूमिका पाहिल्या की त्यान्नी साकारलेल्या स्त्री भूमिकांचे कौतुक तर वाटतेच; परंतु एखादी पुरुष व्यक्ती तितक्याच उत्तमपणे स्त्री भूमिकाही साकारू शकते ह्याचे जास्त अप्रूप वाटते. कुठलीही भूमिका, कला तिचे मूळ स्वरूप सोडून दुसर्या रूपात तितक्याच प्रभावीपणे सादर करता येणे ह्यात खरी प्रतिभा आणि कलाकृती आहे. हेच नेमक जाणवत 'कॉफी आणि बरच काही..' मधला कॉफी कॅफे बघताना जे मुळात आहे एक उत्कृष्ट असे हॅण्डीक्राफ्टचे स्टोर !



'संस्कृती लाईफस्टाईल' हे पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधे आणि मध्यवर्ती शहरापासून साधारण:त १० किलेमीटरवर आहे. कोरेगाव पार्क सारख्या अलिशान आणि पाश्चिमात्य संस्कृतीने वसलेल्या ह्या भागात हिरवाईने नटलेली आणि अत्यंत साधेपणाने सजलेली अशी पण 'संस्कृती' उभारलेली आहे ह्याचे आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. नानाविध हॅण्डीक्राफ्टच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकाशयोजनान्मुळे अधिक उठावदार झालेला स्टोर आणि आजूबाजूचा परिसर, शांत आणि प्रसन्न वातावरण, भरपूर मनीमाउ आणि तिकडचा पाळलेला 'शार्डो', माझ्या म्हणण्यावर लगेच तयार झालेला माझा मित्र महेंद्र आणि 'संस्कृती'चे मॅनेजर धनंजय गायकवाड ह्यांच्याशी झालेल्या मनसोक्त आणि माहितीपर गप्पा ह्यान्मुळे 'संस्कृती'ला दिलेली भेट अविस्मरणीय ठरली.

"कोरेगाव ही मुळात पूर्वीची शेतजमीन. गेल्या १५ वर्षांपासून त्याचा विकास सुरू झाला" धनंजय सांगत होते. " १० वर्षांपूर्वी 'संस्कृती' सुरू झाली आणि त्यानंतर त्यात वेगवेगळे बदल करून आणि नवनवीन संकल्पना वापरून त्याला आत्ताचे रूप आले आहे. लवकरच ही 'संस्कृती' आणखीन विस्तारण्याचा विचार आहे.."



मुख्य स्टोरच्या अवतीभवती फिरताना आणि त्याच्या व्हरांड्यात डोकावताना चटकन आठवले ते 'कॉफी आणि बरच काही..' मधले सुरूवातीचे दृष्य - निषाद जाईची वाट बघत गुलाबाचा गुच्छ घेउन थांबला आहे. तो कॅफे पण इतका सुंदर सजवलेला की आपण पण एकदा तरी आपल्या खास मैत्रीणीला घेउन नक्की तिथे जाव अस वाटायला लावणारा !
'माझ्या मना..आता पुन्हा..' गाण चालू असताना दाखवलेल निषादच एकटेपण,  जाईला पहिल्यांदा कॅफे मधे घेउन आल्यावर बोलताना धास्तावलेला निषाद आणि तेवढ्याच खूळपणे त्याच्या बोलण्याची वाट बघणारी जाई, 'गाडी चुकली का रे माझी..'  असा प्रश्न विचारताना जाणवलेल निषादच खिन्न रितेपण, 'नाहक है गिला हमसे, भेजा है शिकायत भी...हम लौटके आ जाते, आपने आवाज तो दी होती..' अस सांगून निषादची जागवलेली आशा किव्वा शेवटी शेवटी दाखवलेला आज्जी - आजोबांच्या ५० व्या लग्नवाढदिवसाचा सोहळा..सारे प्रसंग उत्तम आणि अचूकपणे टिपण्यात ह्या 'कॅफे'ने फार मोलाची साथ दिली आहे !



"कॉफी आणि बरच काहीच कॅफे मधल चित्रिकरण ४ दिवस सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत सुरू होत. त्यान्ना चित्रिकरणासाठी व्हरांडा, समोरची जागा आणि डावीकडची जागा देण्यात आली होती. ह्या चित्रिकरणाच्या निमित्ताने त्यातल्या सगळ्या अभिनेत्यान्ना भेटता आले. ह्यापूर्वीही सिध्दार्थ जाधवच्या 'उलाढाल'चे काही चित्रिकरण येथे झाले होते. तो पण चांगला अनुभव होता." अस सांगताना धनंजयान्नी तिथे आलेल्या काही कलाकारांचे फोटो दाखवले.



व्हरांड्यातून आतमधे डोकावल की हॅण्डीक्राफ्ट स्टोरचे सौंदर्य नजरेस पडते. लाकडाच्या, काचेच्या आणि कागदाच्या निरनिराळ्या वस्तून्नी आणि शिल्पान्नी स्टोर मोहरून टाकले आहे. अगदी पेरभर लांबीच्या उद्बत्ती घरापासून ते 5 फूटी करकोचाच्या लाकडी शिल्पापर्यंत आणि टेबल-खुर्चीच्या सेटपासून पक्ष्यांच्या पिसांपासून बनवलेल्या नाजूक लेखणींपर्यंत सार्या प्रकारच्या विविध वस्तून्नी भरलेले स्टोर बघून आचंबित व्हायला होते. कौलारू छप्पर, जुन्या पद्धतीची लाकडी खिडक्या आणि दारे आणि साजिशी प्रकाशयोजना ह्यांमुळे त्याचे सौंदर्य आणखीन उठून दिसत होते.

"मी मूळचा वाणिज्य शाखेतला, पण पहिल्यापासून असणारी आवड मला ह्या क्षेत्राकडे घेऊन आली. तस म्हटले तर वाणिज्य आणि ह्याचा काही संबंध नाही पण मुळात असणारी आवड मला ह्यासाठी प्रेरणा देते आणि म्हणूनच रोजचे १२ तासांपेक्षा जास्त वेळ आणि आठवड्यातले सर्व दिवस मी ह्यासाठी देऊ शकतो" गायकवाड सांगत होते. "आपल्या भारतात हॅण्डीक्राफ्टमधे खूप वैविध्य असले तरी त्याचे मूळ हे राजस्थानी महाराजांकडेच! आजही भारतातल्या वेगवेगळ्या कोपर्यात वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती बघायला मिळते."



एवढ्या छान गप्पा रंगात येउनही आम्ही कुठली मोठी किव्वा महागडी वस्तू खरेदी करावीच असा त्यांचा आग्रह नव्हता. "येणार्या ग्राहकांचे मुख्यत: दोन प्रकार असतात. आमच्याकडील वस्तू तसा उच्च प्रतीच्या आणि किंमतीला जास्त. त्यामुळे एकीकडे पैसे आहेत म्हणून विकत घेणारा वर्ग दिसतो परंतू तितकाच एखाद्या वस्तूविषयी जिज्ञासा आणि तीच घेण्याचा आग्रह धरणारा वर्गपण दिसतो. ह्या स्टोरची कुठे जाहिरात होत नाही. ह्याचा दर्जा टिकून आहे तो लोकांच्या mouth-to-mouth पब्लिसिटीमुळेच! " ते सांगत होते. दीड तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही स्टोरमधे होतो आणि तितका वेळ धनंजय आमच्याशी दिलखुलास आणि मोकळेपणाने गप्पा मारत होते.

"कलेला वय नसते, कला अजरामर असते. तसेच कलेचा ओघ कुणी ओळखू शकत नाही. इथे अशा अनेक वस्तू आहेत की ज्या २०० वर्षांपासून, अगदी इंग्रजांच्या काळापासून आहेत. ह्या लाकडी खिडकीचच उदाहरण घ्या ना ! पूर्वी जुन्या घरांत असणारी ही खिडकी आज ह्या दुकानात आहे, उद्या कदाचित दुसरीकडे कुठेतरी असेल. कला अजरामर असते" अस तिकडच्या जुन्या पध्दतीच्या खिडकीकडे बोट दाखवून सांगताना त्यांच कलेविषयीच प्रेम आणि आदर जाणवत होता.



एव्हाना निघायची वेळ झाली होती. एक आठवण म्हणून आणि संग्रही राहील म्हणून काचेचा दिवा घेतला आणि सोबत 'पुढीलवेळी  नक्की या' असे त्यांच्याकडून आमंत्रणही ! गप्पांच्या नादात दीड तास कसा निघून गेला ते कळलच नाही; परंतू इतके मात्र कळले होते की आज आपल्या पदरी काहीतरी खास पडले आहे जिची गोडी मैफिलीतल्या 'भैरवी'प्रमाणे आहे - सदैव स्मरणात राहील अशी !

पुढे जेव्हा केव्हा पुण्याला जाल तेव्हा (आणि पुणेकरांनो - आळस न करता) ह्या आगळ्यावेगळ्या हॅण्डीक्राफ्टच्या  'कॅफे'ला भेट द्यायला विसरू नका…!

सर्व फोटो : अमोल नेरलेकर
विशेष आभार : श्री. धनंजय गायकवाड - संस्कृती लाईफसटाईल, पुणे.


-- अमोल नेरलेकर । २९.०४.२०१५ 

Wednesday, 22 April 2015

दाटून आले..

आज पुन्हा अवकाळी नभ दाटून आले,
आज पुन्हा स्वत:वरती मन दाटून आले..

मनाने जरी अजून तरूण मी कालचा,
श्रांत चेहर्यावरती आज वय दाटून आले..

डोळ्यांत आसवांचा सागर खोल उभा,
अस्वस्थ किनार्यावरती उर दाटून आले..

असण्यावरी जरी मी, नाही केली सक्ती,
नसण्यावरी तयांच्या भय दाटून आले..

सुन्या सांजवेळी तुज चाचपडते नजर,
धूसर क्षितिजावरती रंग दाटून आले..

मैफिलीत तुझ्या जरी श्रोता मी आगळा,
समेवरी इथे अजाण सूर दाटून आले..

- अमोल नेरलेकर 

Friday, 10 April 2015

बुरखा

हा तोच का? नाही, नाही..हा तो नाही!
पण हा तोच आहे...अं हं..नाही!

चेहऱ्यावरून तरी तोच वाटतोय...पण मग अचानक आज हा बदल का जाणवतोय?
आणि बदल जाणवतोय तर मग फक्त मलाच? का त्याला पण? का सगळ्यांनाच? आणि मग जर बदल सगळ्यांनाच जाणवत असेल, तर आज काय बदलल नक्की? 'तो' का त्याच्याकडे बघायची दृष्टी?

विचार...कोडी..न उलगडणारी..

माणूस तोच असतो..अगदी रोज जसा दिसतो तसाच..फार तर फार उंची, जाडी आणि डोक्यावरील काळ्या केसांची किंबहुना केसांचीच संख्या बदलत असते फक्त...आणि आपण ज्याला सुसंकृत भाषेत 'नीटनेटके कपडे' म्हणतो..तस काहीतरी..

तुम्ही माणूस मनातून ओळखलात का हो कधी? त्याआधी स्वत:च मन तरी कधी?
आपल्या मनासारखीच बाकीची मने इथे-तिथे आपल्याला सभोवती फिरताना दिसतात... 

मुळात माणसाच्या मनाच विवस्त्र रूप खूप सालस आणि निर्मळ आहे..आपणच त्याला राग, मत्सर, अहंकार आणि तणाव ह्यांच्या बुर्ख्यांनी पार गुंडाळून टाकलय...इतक की शेवटी आपलच मन आपल्याला ओळखता येत नाही...
आज-काल अशी बुरखे घालूनच फिरणारी माणस खूप दिसतात..त्याचा फार त्रास होतो...


--अमोल नेरलेकर

Thursday, 9 April 2015

बावरी..

नाजुक इतुकी, इतुकी कोमल,
जशी बहरली रातराणी..
सांजवेळची हूरहूर ती,
ती रात पुनवेची..
स्मितरेषा त्या लपवीत चंचल,
लाजली जशी ती..
गालावरील खळी सांगते,
मी झाले तुझात बावरी.. 

Wednesday, 8 April 2015

पहाट

मला सांग आज ती सांज कोणती होती?
हीच काल तुझावर का इतुकी रुसली होती?

मनाचाच मनाशी व्यर्थ संवाद चालू होता..
उत्तरे का प्रश्नांपाशी तशीच खिळली होती?

नको काही सांगू..नको काही बोलू..
दोघान्मधली शांतताच ते सारे बोलत होती..

दरवळला दारी पुन्हा, मोहोर चैत्रातला,
सडा पारिजाताचा, ती अंगणे मुक्त होती..!

उष्ण अबोल्यानंतर चांद रात पडली होती,
आशेच्या किरणान्नीही पहाट पांघरली होती..


- अमोल नेरलेकर

Wednesday, 1 April 2015

स्वप्न

स्वप्नात निजला प्राण,
स्वप्नात सजे श्रावण…
स्वप्नात सत्य दडलेले,
स्वप्न मनात फुललेले…

स्वप्नी प्राण कोवळा,
स्वप्न विरहाचा सोहळा…
स्वप्न मावळलेली सांजवेळ,
स्वप्न प्राजक्त भाबडा…

स्वप्नी खुलले विश्व,
स्वप्नी बहरले दृष्य…
स्वप्न मोहात भुलवण,
स्वप्नी 'तुझी' आठवण…


- अमोल नेरलेकर 

Monday, 23 March 2015

पाणी..

थेंब थेंब पाण्यासाठी,
चालतो मैले किती दूर..
आज हिच नदी शुष्क,
जीस गतवर्षी आला पूर..

आधीच सुकली ही काया,
त्यात सुकलेली जमीन..
ना दोन वेळेची भाकर,
कुठे गुरां 'चारा' नवीन?

रडून थकले 'भुकेले',
'तहानलेले' मूल लहान.. 
डोळ्यांतील आसवांनी,
मी भागवतो ही 'तहान'..

--अमोल नेरलेकर

Sunday, 22 March 2015

नाती

माणसासाठी माणूस आहे ही जाणिवच खूप आधार देणारी आहे..
मुळात 'नाते' ह्याचा अर्थच आधार असा असावा ..

नाती ही परत 'असलेली' आणि 'मानलेली'…
'असलेली' नाती सक्तीची आणि पर्याय नसलेली ..त्यांचा आधार वाटला तर दुसरे सुख नाही पण जाच वाटला तर त्याहून मोठी वेदनादेखील नाही…
ह्याउलट मानलेली नाती…त्यांचा कधीच जाच वाटत नाही कारण ती मनापासून स्वीकारलेली असतात…त्यांच्यात एक आपुलकी असते…आपलेपणा असतो..विश्वास असतो..

माणसाच आयुष्य अनेक नात्यांनी फुलल आहे..प्रत्येक माणसाला आणि प्रसंगाला स्वत:चा सुवास आहे..
इथे दरवेळी गुलाब श्रेष्ठ ठरेलच अस नाही कारण फुलाचा सुवास ही तुलनेची गोष्ट नव्हे..

-- अमोल नेरलेकर

Saturday, 21 March 2015

कसलं काय..

अशीच एक संध्याकाळ तेव्हा पण पडली होती..
वाटलं होत चला..लाही लाही करणारी दुपार टळून गेली..
आता सुखद चांदण पडणार थोड्याच वेळात..
पण कसलं काय..

समुद्रकिनारी बसलो होतो आपण..पक्ष्यांचे थवे निरखीत..
वाटलं आता तरी बंधनाचा पिंजरा तोडून ह्यांच्यासारख मुक्तछंदात जगता येईल..
पण कसलं काय..

माझ प्रेम मला सागराच्या खोलीची जाणीव करून देत होत..
आणि मला वाटल तुझही असेल तेवढंच अथांग..क्षितिजापर्यंत साथ देणार..
कदाचित मला त्याची चव तेव्हा कळली नव्हती..
आणि  वाळूवर लिहिलेली अक्षरे पण तुझ्या शपथेसारखी..
क्षणिक..आणि काळाच्या लाटेमध्ये विरून जाणारी..
मी त्यांना धरून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..
पण कसलं  काय..

हल्ली मी मधून मधून जातो तिथे..
सूर्यास्त पाहतो आणि पक्ष्यांचे थवेही..
पण वाळूतल्या अक्षरांपेक्षा दूरवर फिरणारे गलबत बरे वाटते..
निदान क्षणात अस्तित्व संपवण्यापेक्षा सदैव दूर राहण्याच्या निर्णयाशी ते प्रामाणिक असते..

--अमोल नेरलेकर  

Wednesday, 18 March 2015

पारिजात

न कळे मजला हा आज गंध कोठोनी आला,
खरच आला वाऱ्यासंगे का भास फक्त तयाचा..
मिटले डोळे अलगद मी अन आठवण तुझी येता,
हाती माझ्या तव स्पर्शाचा पारिजात फुललेला..

--अमोल नेरलेकर 

हॉर्न..

मला आठवतंय, अगदी परवापर्यंत मी मोठ्या ट्रकच्या मागे लिहिलेल वाचायचो…'देवीची कृपा', 'आई-बाबांचा आशिर्वाद', 'बुरी नजरवाले तेरा मुह काला' आणि 'Horn Please'…

शेवटची ओळ जरा विचारात पाडणारी आहे. खरच, हॉर्न्सची सतत वाजवण्याची एवढी गरज असते का हो? मला आठवतंय मी कामानिमित्त काही दिवस परदेशी गेलो होतो आणि तेथे तेवढे दिवस मी एकही होर्न ऐकला नाही…त्याचं कुठे अडलं का? नक्कीच नाही… 

आज त्याची मी तुलना आपल्याकडील रस्त्यांवर करतो…किती कर्कश आणि कानठळ्या बसवणारे होर्न्स…आणि ते ही विनाकारण. 

ह्याचे मानसिक आणि शारीरिक किती आणि कोणते परिणाम होतात ते वेगळ सांगायला नको. आज आपण तरुण आहोत, ह्या साऱ्याचा मारा आपल्याला जास्त जाणवणार नाही पण आपल्या आजूबाजूला कुठेतरी नवीन जन्मलेल अर्भक आहे, शाळेत जाणारी मुलं आहेत, आई-वडिलांच्या वयाचे समवयस्क आहेत आणि आयुष्याच्या संध्याकाळी चार क्षण मोकळ्या हवेत फिरून यायची इच्छा बाळगणारे आजी-आजोबा आहेत. आपल्याला ह्या सर्वाची काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच ह्या साऱ्याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे… 

उद्या हातात काठी धरून फिरताना सप्त्सुरांनी रंगलेल्या गाण्याचे श्रवण चांगले करता यावे असे वाटले तर त्यात गैर काय?


--अमोल नेरलेकर 

Monday, 16 March 2015

कधीतरी सांजवेळी...

कधीतरी सांजवेळी क्षितिजाच्या बाजूनी,
फेरफटका मारून येतो आठवणींना घेऊनी..
कोण कुठला चंद्र शीतल आणिक उष्ण भास्कर,
मावळणार इथेच अन उगवणार पुन्हा येथुनी..
 
कधीतरी सांजवेळी क्षितिजापल्याड मी,
रियाजाला बसतो एकटा सूर कोवळे घेऊनी..
कोण कुठला ताल, सम, खर्ज आणि मध्य हा,
षड्ज आणि निषादामध्ये समैकरूप होऊनी..
 
कधीतरी सांजवेळी क्षितिजा-अल्याड मी,
नजर कोरडी लावतो त्या सागराच्या किनारी..
कोण आपले, कोण परके, नातीही अन मैत्रीही,
प्रेम आणि वैर यांस एकाच पारड्यात तोलुनी..

-- अमोल नेरलेकर 

Sunday, 15 March 2015

हिशोब

आणखीन एक दिवस मावळला..

असे आत्तापर्यंत अनेक उगवले आणि मावळले..पण प्रत्येकाचा हिशोब ठेवला नाही..परंतु..
आज मात्र हिशोब लिहायला बसावस वाटतय..काय करायच ते ठाव आहे पण कस ते मात्र माहित नाही..

म्हणजे बघा ना, हिशोब लिहायच तर ठरवल आहे..पण त्यात नक्की जमा काय आणि खर्च काय तेच उमजेनास झालय..

आणखीन एक दिवस मावळला..

सुख-दु:ख ह्यांची balance sheet बनवून पाहिली..पण बाकिच्यांशी तुलना करता करता काही नीट जमली नाही..
चांगल-वाईट ह्यांची बनवायला लागलो तर त्याचा न्याय देण्यावरून मनात वाद सुरू झाला..
पाप-पुण्य..छे! आवाक्या पलीकडच्या गोष्टी..
शेवटी विचार करता करता आपल आणि परक ह्यावर हिशोब मांडायचा ठरवल..परिमाण बर्यापैकी योग्यही वाटल..

गोष्टी लिहायला सुरूवात केली..credits..debits..

जास्तीत जास्त credits आपल्या balance sheet मध्ये हवी असा अट्टाहास होता..
पण नकळतपणे आणि नाईलाजास्तव काही खर्च हे करावेच लागतात..

Balance sheet लिहून झाली..छान वाटली..पण मन मात्र समाधानी होईना..

कारण जो तो आपली balance sheet दुसर्याशी तुलना करायचा प्रयत्न करत असतो..

आणखीन एक दिवस मावळला...

- अमोल नेरलेकर 

Friday, 13 March 2015

अंतर

काल संध्याकाळी फिरताना दोन आजोबांमधील संवाद कानावर आला. 

"मी मोठ्याकडून काही अपेक्षा करत नाही. धाकट्याने सांभाळले तर ठीक नाहीतर वृद्धाश्रम आहेच. "

"हो ना. माझ्याकडेपण लहान आणि त्याच्या येणार्या बायकोने विचारले तर ठीक. जोवर हात-पाय चालत आहेत तोवर ठीक. नाहीतर वृद्धाश्रम आहेच."

"हो ना. वृद्धाश्रम आहेच."

क्षणभर मन खूप विषण्ण झाले. ५० वर्षांपूर्वी किव्वा दोन पिढ्यांपूर्वी पालकांना आपल्या मुलाविषयी वाटणारा विश्वास आज असा अचानक का ढासळला? आणि तो ढासळला असेल तर कोणामुळे? माझ्यामुळे का माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे?

मुळात मनच जर नापीक असेल तर काही भावना नसतात. पण सुपीक आणि संवेदनशील मनाची स्थिती अशावेळी चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी होते; चोहोबाजूंनी कोंडी झाल्यासारखी… 

जगातील सर्वात छोट आणि मोठ अंतर हे दोन मनांमध्येच असू शकत. ते कोणत्याही एककात मापता येत नाही. 

-- अमोल नेरलेकर 

Wednesday, 11 March 2015

संक्रमण

एखाद्याच असण किव्वा एखाद्याच नसण कधी कधी इतक मनाला का लागत? 
त्यात त्या व्यक्तीचा प्रभाव का आपल्या मनाची कमकुवतता?

माणूस म्हटला की सर्व भावना आल्या; सर्व बंधने आली…
बंधने परत स्वीकारलेली किव्वा लादलेली; म्हणजेच स्वेच्छा किव्वा परेच्छा. मी जसा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तसाच समोरच्यानेपण करावा असे जरूरीचे नाही. पण संवादात सुसूत्रता नसली की भांड्याला भांडे भिडणारच हे वेगळे सांगायला नको !

काळाच्या ओघात माणसे, ऋतू, वेळ आणि इच्छा सार्या बदलत असतात. काहींमध्ये नकळत बदल होत असतो तर काहींत बदल करावा लागतो.
तिन्ही सांजेला दिवस ढऴल्याचे आणि येणार्या गर्द रात्रीचे भय दाटून येते कारण संक्रमण हे माणसाला नेहमीच वेदनादायक ठरले आहे. स्वेच्छेने आणि सुविचाराने केलेले संक्रमण खूप पुढे घेऊन जातेच पण परेच्छेने केलेल्या संक्रमणाचे काय? 

प्रत्येक इच्छेला पर्याय नसावेत. काही इच्छा अपर्यायी असाव्यात. 
काही इच्छांना तुलना नसावी, कारण आयुष्यात काही माणसे आणि त्यांना आपल्याशी घट्ट बांधून ठेवण्याच्या असलेल्या इच्छा अतुलनीय असतात...


-- अमोल नेरलेकर