कधीतरी सांजवेळी क्षितिजाच्या बाजूनी,
फेरफटका मारून येतो आठवणींना घेऊनी..
कोण कुठला चंद्र शीतल आणिक उष्ण भास्कर,
मावळणार इथेच अन उगवणार पुन्हा येथुनी..
कधीतरी सांजवेळी क्षितिजापल्याड मी,
रियाजाला बसतो एकटा सूर कोवळे घेऊनी..
कोण कुठला ताल, सम, खर्ज आणि मध्य हा,
षड्ज आणि निषादामध्ये समैकरूप होऊनी..
कधीतरी सांजवेळी क्षितिजा-अल्याड मी,
नजर कोरडी लावतो त्या सागराच्या किनारी..
कोण आपले, कोण परके, नातीही अन मैत्रीही,
प्रेम आणि वैर यांस एकाच पारड्यात तोलुनी..
-- अमोल नेरलेकर
Khupach sundar
ReplyDelete