Tuesday, 10 March 2015

सहवास

कधी कधी अस होत की सामोरासमोर भेटल्यावर किव्वा ठरवून भेटल्यावरही बोलायला काही विषय सुचत नाहीत. पण म्हणून समोरच्याशी बोलायचं नाही किव्वा बोलायला काही विषयच नाहीत असा काही त्याचा अर्थ होत नाही.

माणूस माणसाशी मनाने जोडला असतो आणि दोन मनांच्या संवादाला दरवेळी शब्दांचीच गरज भासते असे नाही. काही गोष्टी शब्दान्पल्याड असतात; त्यांनाच आपण भावना म्हणतो; आणि ह्या सार्यांपलीकडे असतो तो सहवास…

संवादाच्या प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे असे अढळ स्थान आहे, स्वत:चे असे महत्व आहे. शब्द बोलायला लागतात, भावना समजायला लागतात आणि सहवास अनुभवायाला लागतो…

पाउस पडतो आहे, किंबहुना पाउस कसा आहे हे शब्दांतून सांगता येत, कधीकधी कवितेतून वर्णितादेखील येत…
पण पावसाला आपलस करण्यासाठी, त्याला जवळ करण्यासाठी मनात भावना असावी लागते,
आणि पाउस काय आहे हे कळण्यासाठी त्याच्या सहवासात भिजाव लागत…

सहवास क्षणिक असतो…सहवास क्षणांचा असतो…
सहवासाला वेळेची मर्यादा नसते…सहवासाची व्याख्या नसते…
सहवास भेद-भाव पाळत नाही…सहवास कधीही जाळत नाही…

माणसाचं अबोल अस्तित्वदेखील लाखमोलाचे असते. कारण माणसाचा सहवास ही समजावून सांगायची गोष्ट नव्हे…
सहवास ही अनुभवायाची गोष्ट आहे…

- अमोल नेरलेकर

No comments:

Post a Comment