'अव्ह सायब, राहू द्या की…सोडा आता…अर्धा किलो घेऊन जा हवतर पण असा पोटावर पाय नका देवू व्हो…तान्ह पोर आहे पदरात…' अस म्हणत तिन आपला वीतभर लांबीचा पदर त्या सायबासमोर मोठ्या जीवाच्या आकांताने पसरला. तेवढा लहान पदर, सुकलेली काया आणि रात्री दोन घास तरी तोंडात पडतील का अशी गर्द भीती चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येईल असे तिच्या त्या लहान, चिमुरड्याचे काळेभोर डोळे बघून मनात क्षणभर संतापाची आणि तेवढीच वेदनेची सणक सर्कन सरसरून गेली.
ती अर्तता कानांत अशी प्रत्यंचातून वेगाने सुटलेल्या बाणासारखी घुसली. 'त्या' तान्हयाचा गहिवरलेला आवाज ऐकून कानांत चालू असणार्या गाण्यातील आर्त स्वर पण फिके पडले आणि क्षणभर माझी नजर आणि काया तिथेच खिळून राहिली.
'तो' साहेब पण तेवढाच निर्दयी निघाला. समोरच्याची काहीही पर्वा न करता आपली तुंबडी कशी भरेल आणि ती भरवून घेताना समोरच्याला किती जास्तीत जास्त त्रास होईल किव्वा देता येईल ह्याचाच विचारात असलेला.
संध्याकाळचे ७, डोंबिवलीस्टेशन बाहेरचा रेल्वे पूल, भाज्या विकून कसाबसा उदरनिर्वाह चालवून देणारी तिची टोपली आणि माणसांनी खचखचून भरलेल्या गर्दीत आणि त्याच्या गोंधळातही तो प्रसंग मनाला स्तब्ध करून गेला. 'शोषण'…होय शोषणच…अधिकाराच्या जोरावर एका माणसाने दुसर्या माणसाच केलेलं 'शोषण' ! कधी पैश्यासाठी, कधी अधिकारासाठी, कधी भावनांच आणि कधी शरीराच केलेलं शोषण!
आपण सदैव समोरच्यपेक्षा सरस आहोत आणि आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक अधिकार आहेत, तेही सर्व बाबतीत हे सदैव सिध्द करण्याची सूडी प्रवृत्ती म्हणजे 'शोषण' करण! कधी ह्या नीच गोष्टी जन्मजात मिळालेल्या तर कधी पैसा आणि सत्ता ह्या बळावर विकत घेतलेल्या.
काही केल्या त्या पदर पसरणारीचा चेहरा डोळ्यासमोरून जाईना. आपल्या आजूबाजूला रोजच अशी कित्येक उदाहरण घडत असतील, घडत आहेत. त्यापैकी किती जणांकडे आपल लक्ष जात? लक्ष गेलेल्यांपैकी किती जणांना आपल्याला मदत करावीशी वाटते? मदत करावीशी वाटणाऱ्यान्पैकी किती जणांसाठी आपले हात सरसावतात आणि सरसावलेल्या हातांमध्ये किती जणांसाठी ती कायम स्वरूपी मदत ठरते?
खरच विचार करण्यासारखे प्रश्न आहेत हे!
आजही आपल्या आजूबाजूला पोटासाठी असा पदर 'पसरणारी' आहे, कुणीतरी मोठे मोठे विनाकारण आरोप करून मन दुखावल्या गेलेल्या व्यक्ती आहेत, शरीरावर झालेल्या वारांवर स्वतःच केविलवाणे उपचार करत बसलेले दु:खी जीव आहेत तर आपण जमवलेल्या चार पैशांवर फुकटचा मालकी हक्क दाखवून गेल्यामुळे व्यथित झालेलेही आहेत. आपल्या आजूबाजूला 'शोषण' अनेकवेळा, अनेक प्रकारांतून अनेक व्यक्तींवर अनेक जणांकडून घडत आहे.
चांगल-वाईट, दया-असूया, चूक-बरोबर किव्वा योग्य-अयोग्य ह्या रूढी नसून मानसिकता आहे; आपल्याला ती योग्य दिशेने वळवायलाच हवी आणि अशा मानसिकतेचा प्रसार आणि आचरण झाल्यास असहाय्यपणे त्या राक्षसी प्रवृतीसमोर नाहक पदर पसरणार्यान्च्या आयुष्यात आपल्याला सुखाचे क्षण आणता येईल हे मात्र नक्की!
-- अमोल नेरलेकर । १० जुलै २०१५
No comments:
Post a Comment