Wednesday, 17 February 2016

चिमूट

मित्राला फोन करायचा म्हणून मी सीटवरून उठून बाहेर आलो. रिसेप्शनपाशी बसलेल्या रमेशने खुणेनेच मला 'हाय' केले. मी बाहेर आलो.

तसा मी ह्या कंपनीमध्ये नवीनच आणि त्यामुळे गेल्या १५-२० दिवसांत झालेल्या ओळखीही मर्यादित ! पण पहिल्याचदिवशी झालेली पहिलीच ओळख म्हणजे 'रमेश'ची. रमेश आमच्याइथे उपहारगृह सांभाळणारा कारकून. साधारण माझ्याच वयाचा असलेला, उंचीने बुटका, थोडासा सावळा, जीभेवर विदर्भाची मराठी असलेला आणि ऑफिसपासून जवळच आपल्या बायको आणि वर्षभराच्या मुलासोबत राहणारा रमेश माझ्याशी चहा, कॉफी, ऑफिस, ए.सी पासून चिकन, पाणीकपात आणि सरकार अशा अनेक विषयांपर्यंत माझ्याशी गप्पा मारत असे.

माझा बाहेर फोन चालू असताना रमेश बाजूला येउन उभा राहिला आणि माझा फोन संपण्याची वाट पाहू लागला. मला वाटले त्याला नेहमीप्रमाणेच माझ्याशी काहीतरी बोलायचे असेल आणि म्हणूनच थोडके बोलून मी फोन ठेवला.

"बोल रे, काय झाल? आज काय विशेष?" मी रमेशला विचारल. त्याने आपली तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी काढली.

"काय नाय साहेब. घरमालक आलेला काल परत. भाडे वाढवायचं म्हणतो. इथे पगार नाही वाढत, एक पोर आहे, बायकोची कटकट असतेच मग ह्याला कुठून देणार ज्यादा भाड?" त्याने चुन्यामध्ये तंबाखू चोळत आपली समस्या मांडली. तोच तळहात दाखवत मला म्हणाला, "घेणार का थोडा?"

मी त्याच्याकडे दोन क्षण पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर समस्येचे गांभीर्य स्पष्ट दिसत होते परंतू त्यासाठी काही करायची त्याची तयारी मात्र नव्हती. आयुष्यात आलेल्या नैरश्येचा राग तो तंबाखू मळण्यावर काढत होता.

"अरे रमेश, अस काय करतोस!" मी त्याला शक्य तेवढ्या प्रेमाने समजावू लागलो.
"हा तंबाखू खाउन तुला प्रोब्लेम सुटेल अस वाटत का? आणि शिवाय काय मिळत हे खाउन? क्षणभर समाधानच ना? आपण कशाला अशी व्यसन लावून घ्यायची? ह्यातून तुला फायदा तर काहीच नाही उलट तुझ्या तब्येतीवर ह्याचे उलटे परिणाम होत आहेत. कितीतरी पैसे तुझे ह्यात वाया चालले आहेत. आणि उद्या हाच तंबाखू तुला बराच वेळ, दिवस मिळाला नाही तर अस्वस्थ होशील कारण तुला त्याची चटक लागली असेल आणि असे करत करतच तू त्याच्या व्यसनाच्या विळख्यात ओढला जाशील. वेळीच सावध हो"

रमेश 'सावधान' सारखा उभ राहून माझ सगळ बोलण ऐकत होता. काही उलट बोलला नाही ह्यावरून त्याला माझ थोडतरी पटल असाव असा अंदाज मी बांधला.

"अरे हेच पैसे वाचवून त्यातून मुलासाठी एखादा खाऊ किव्वा खेळण घेऊन जा; बायकोसाठी एखादी भेटवस्तू घेऊन जा. बघ त्यांचे चेहरे हर्षाने कसे फुलून येतील आणि त्यांना तसे पाहून तुलाच किती बर वाटेल. तुझ्या जगण्याला नवीन उमेद येईल आणि मग त्या घरमालकाला बघून तुझा असा त्रागा होणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे रे आणि आपल्या लोकांसोबत मिळून-मिसळून जगण्यातच तर खरी मजा आहे. कधीही काही लागल तर हक्काने सांग."

माझ एवढ बोलण होईस्तोवर त्याच्या हातातला तो तंबाखू वाळला होता. रमेशने माझ्याकडे पाहिलं; त्याचे डोळे बरच काही सांगत होते. त्या वाळलेल्या तंबाखूची चिमूट भरून घ्यायच्या ऐवजी त्याने तो तसाच कचरापेटीत टाकला आणि म्हणाला,

"साहेब आत्तापर्यंत बापाने आणि मित्रांनी खूप सांगितलं - तंबाखू सोड पण तुमच्यासारख समजावलं नाही कोणी. प्रत्येकजण ओरडायचा पण विश्वासात घेऊन समजावणारे तुम्हीच. बाप्पाची शपथ साहेब, पुन्हा पुडीला हात लावणार नाही." असे म्हणून त्याने खिशातील पुडी आणि चुन्याची डबी दोन्ही कचरापेटीत टाकून दिले.

" आज जाताना मुलासाठी खाऊ घेऊन जाईन आणि तिच्यासाठी वांगी. भाजी खूप छान करते ती. साहेब, गरम गरम चहा घेणार का?"
मी खुणेनेच होकार दिला. तो चहा बनवण्यासाठी निघून गेला. आपल्या चिमूटभर प्रयत्नांनी त्याची 'चिमूट' सोडवून त्याच्या आयुष्यात फारकाइतुका बदल घडवल्याचे समाधान मला मिळाले.

ह्या क्षणाचा आनंद कोणाला सांगावा मला सुचेना. 'त्या' मित्राचा फोन परत एकदा खणखणला. चहा मस्त झाला होता!


-- अमोल नेरलेकर । १७ फेब्रुवारी २०१६   

No comments:

Post a Comment