Saturday 30 November 2019

बहुत जनांसी आधारू – डॉ. सतीश पुराणिक


"डॉक्टर, मगनी रिप्लेसमेंट’ झाल्यावर बाबांना काय काळजी घ्यावी लागेल?" मी घाबरत घाबरत डॉक्टरांना पहिला प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी "तुझं लग्न झालं आहे का? मग जशी नवीन मुलगी घरी पहिल्यांदा आल्यावर तिला तिथे स्थिरसावर व्हायला वेळ लागतो, तसंच काहीस ह्या गुडघ्याचं होणार, पण कालांतराने एकदम सेट होईल" असं सहज उत्तर दिल आणि हा डॉक्टर हा फक्त डॉक्टर नसून रूगणांचा, त्यांच्या घरच्यांचा एक जवळचा मित्र आहे हे माझं ठाम मत झालं ते कायमच !

डॉक्टर सतीश पुराणिक, मुबंईतील अतिशय प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि त्यांच्याकडे आम्ही वडिलांची डाव्या गुडघ्याची 'नी रिप्लेसमेंट' करायचे ठरवले होते. डॉक्टर आमच्या बाबा काकांचे खूप जवळचे स्नेही! पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी झालेल्या संवादातून आणि ह्या सर्व शस्त्रक्रियेचीअगदी मनापासून त्यांनी दिलेल्या माहितीमुळे ही शस्त्रक्रिया एवढी भयावह नाही असा आम्हा सर्वांना धीर आला होता.


ठरल्याप्रमाणे शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी आम्ही रुग्णालयात दाखल झालो. रात्री ११ नंतर बाकी सर्व ठिकाणाच्या भेटी झाल्यावर इथे रुग्णांना भेटायला येणं, त्यानंतर रात्री पर्यंत रुग्णालयातील बाकीची कामे करून सकाळी च्या शस्त्रक्रियेच्या आधी आणखीन रुग्णालयाच्या भेटी करून वेळेवर हजर होणं हे सर्व ऐकल्यावर आपण नि:शब्द होतो आणि डॉक्टर मात्र रात्रभर - तास झोप झालेल्या आमच्यापेक्षाही जास्त फ्रेश आणि प्रसन्न दिसत असतात. एवढी ऊर्जा आणि प्रसन्नता त्यांच्यात कुठून येते हे आमच्यासारखाच अनेकांना नक्की पडलेल कोड असणार. त्यांची आपल्या रुग्णांविषयी असणारी आस्था, त्यांची सर्वेतोपर सोयींसाठी असणारी दक्षता आणि रुग्णाशी एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा मारून त्याचा आजार त्याच्या मनातून काढून टाकण्याची असणारी त्यांची कुशलता हे सर्व पाहिल्यावर आपल्या सभोवती ऊर्जेचा आणि सकारात्मक शक्तींचा एक स्त्रोतच फिरत आहे ह्याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. त्यांची कामावर असणारी प्रचंड निष्ठा, त्या विषयातले अद्वितीय ज्ञान आणि तितक्याच सोप्या भाषेत समोरच्याला कळेल अशा रूपात सांगण्याची तयारी आणि रूगणांची मानसिकता समजून घेऊन त्यांना आपलंस करणारी दिलदारता ह्या साऱ्यांमुळे डॉक्टर फक्त एक प्रसिद्ध डॉक्टर राहत नाहीत तर सर्वोत्तम डॉक्टर-मित्र होतात.


शस्त्रक्रिया उत्तमरीत्या पार पडली आणि त्यादरम्यान चालू असणाऱ्या गप्पांमुळे आणि मराठी भक्तीगीते-भावगीतांमुळे ती मुळात एक शस्त्रक्रिया आहे असे वाटलेच नाही. रुग्णाला कामीत कमी त्रास व्हावा आणि त्याच्या मनात त्या चाललेल्या शस्त्रक्रियेविषयी भय वाटू नये म्हणून तुम्ही योजलेला हा उपाय किती सुंदर आणि अनोखा आहे ! पुढील - दिवसात बाबांच्या गुडघ्याची हालचाल पूर्ववत होऊ लागली आणि आम्ही घरी परतलो. आज शस्त्रक्रियेला १५ दिवस झाले आणि आता खरंच एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली आहे का असा प्रश्न पडावा एवढी प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे, होत आहे.

असं म्हणतात की डॉक्टर हा देव असतो आणि त्यामुळेच कदाचित आत्तापर्यंत अनेक देवळांतून देव फक्त बघितला पण आज खऱ्या अर्थाने देवाचे दर्शन झाले, भेटणे झाले. डॉक्टर तुम्ही फक्त शस्त्रक्रिया केली नाहीत तर अनेक रुग्णांना त्यांच्या पायावर परत एकदा 'उभं' केल आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धात 'ताठ मानेसोबत ताठ गुडघ्यानेही' जगणे किती सोपे आणि सुंदर आहे हे दाखवले आहे. आम्ही सर्व आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभावाने अत्यंत लहान आहोत परंतु आम्हालाही भविष्यात तुमच्याकडून उपचार घेण्याचे भाग्य लाभो अशी आम्हा सर्वांची इचछा आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुम्ही दिर्घायुषी होवो अशी त्या परमेश्वराकडे सदिच्छा व्यक्त करतो.

जीवेत् शरद: शतम् ! अनेक अनेक धन्यवाद !!

                                                                                                                                                                    
-- अमोल अरुण नेरलेकर 
३० नोव्हेंबर २०१९

Sunday 27 October 2019

हॅप्पी दिवाळी, भाऊ !


बायकोला पाडव्याला भेट म्हणून तिला आवडेल अशी उत्तमातील उत्तम साडी खरेदी करून बाहेर पडलो आणि त्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला शहराच्या अगदी मोक्याच्या रस्त्यांमधून कसाबसा जागा करत परतीची वाट धरली. तेवढ्यात आठवल की उद्यासाठी पणती घ्यायची राहिली आणि जाता जाता घेऊ अस ठरवलं. अनेक दुकाने दिवाळीच्या अनेक गोष्टी विकायला घेऊन बसले होते, तेवढ्यात नजर त्यातील एका दुकानाबाहेर पणत्या आणि सुगड घेऊन बसलेल्या ताईंकडे गेली.

'काय ताई, कशा दिल्या पणत्या ह्या?' त्या सांगतील त्या दराने पणत्या घ्यायच्या अशा उद्देशाने त्यांना मी विचारल. '६० ला डझन आणि ३० ला सहा' त्यांनी लागलीकच सांगितलं. उघड्या जमीनवर बसून आणि अगदी मोजक्याच जागेत आपलं पोट भरण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीशी दरावरून कधीच घासाघीस करू नये हे माझं स्पष्ट मत आहे.

'हं ताई, ह्या सहा द्या आणि ह्या रंगीत पणत्या, किती झाले?', 'पंचावन्न भाऊ, सुट्टे द्या काय जरा!' ताईंनी आपला हिशोब सांगितला. मी ठरलं त्याप्रमाणे देऊन मोकळंही होणार तेवढ्यात त्या म्हणाल्या 'आज संध्याकाळपासून एवढीच विक्री झाली भाऊ, आज तुम्ही पणत्या घेतल्या म्हणून आता माझ्या घरी उद्या पणती लागेल हो..'

त्यांनी सुट्टे का मागितले ह्याची प्रचिती मला त्या क्षणाला आली आणि क्षणार्धात त्या शुभ सणाच्या पूर्वसंध्येला त्या भर वस्तीतील गजबजलेल्या रस्त्यावरही मन सुन्न झालं. एकीकडे मी होतो जो एवढ्या हजारोंचीही खरेदी करून असमाधानी होतो तर दुसरीकडे त्या ताई - ज्या माझ्या किरकोळ खरेदीमध्येही त्यांचा सण साजरा करणार होत्या. मनाची श्रीमंती पैश्यात मोजता येत नाही, हेच खरं !

आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात आपण सारेच पैसे वाचवायचा विचार करतो हे अगदी सत्य आणि बरोबरसुद्धा. पण आजही आपण बर्याच लहान लहान गोष्टींसाठी ऑनलाईन शॉपिंगवरच अवलंबून राहतो हे कितपत बरोबर? ह्या पणत्यांसारखे अनेक असे छोटे छोटे व्यवसाय आहेत की ज्यांची आणि ज्यांच्या घरच्यांची पोट ही आपण स्वतः त्यांच्या दुकानात जाऊन आणि जरी चार पैश्यांनी एखादी गोष्ट महाग मिळाली तरी ती घेण्यावर अवलंबून आहेत. आज दिवाळीसारखा सण आहे पण एरवीही त्या दुकानदारांच्या घरात अनेक असे शुभ प्रसंग आहेत की ज्यांचे खुशाली ही आपण दिलखुलास होऊन त्यांच्या दुकानांत जाऊन शॉपिंग करण्यामध्ये आहे. उद्या आपण जो उद्योग-धंदा करतो त्याची जागा ऑनलाईन सॉफ्टवेअरने घेतली तर आपल्या जगण्यातील सुखाला किती मोठा तडा जाऊ शकतो ह्याची कल्पना केलेलीच बरी.

'हे सुगड पण देऊ का? वीस रुपये फक्त !' असा त्यांनी विचारलं तेव्हा मी भानावर आलो. एव्हाना त्या नवीन खरेदीच नवचैतन्य पार निघून गेलं होत आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड पाहून पार हतबल झालो होतो. खरंतर आमच्या घरी सुगड वापरत नाहीत, पण माझ्या एक सुगड घेण्याने जर त्यांच्या दारी आणखी एक पणती लागणार असेल तर मला घरी सुगड आणण मान्य आहे.

'चला ताई, येतो, आणि तुमच्या पणत्यांची आणखीन विक्री नक्की होईल' अशी आशा त्यांना देऊन निघालो. दोन पावले चालतोच नाही तेवढ्यात त्यांचा समाधानी आवाज आला - 'हॅप्पी दिवाळी भाऊ!'. मनाची थोर श्रीमंती बाळगणार्या त्यांना काही प्रतिक्रिया द्यायची माझी हिम्मत झाली नाही, मी हलकेच हसलो आणि पुढे निघालो. 'पणती घ्या हो पणती, ६० ला डझन..' अस म्हणत त्या ताई परत त्या गर्दीत मिसळून गेल्या; दीपावलीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मनात आशेची एक पणती तेवली होती हे मात्र नक्की !

शुभ दीपावली !!

-- अमोल नेरलेकर, २७ ऑक्टोबर २०१९

Tuesday 1 October 2019

बारामोटेची विहीर

सह्याद्रीत फिरताना जाणवत की ह्याच्या पोटात अशा असंख्य वास्तू लपलेल्या आहेत आणि त्याची अजून म्हणावी तशी आणि म्हणावी तेवढी माहिती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही. हेच नेमक जाणवलं साताराजवळील लिंब गावातील बारामोटांची विहीर बघताना. सामान्य जमिनीच्या पातळीखाली एखादी एवढी असामान्य आणि विशाल ऐतिहासिक वास्तू असू शकते हे कळल्यावर आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.



सातारा शहरापासून मुंबई-पुण्याकडे यायला लागल्यावर साधारण १२ कि.मी वर आपल्याला लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर कि.मी. वर लिंब गाव लागते. ह्या गावाच्या दक्षिणेला कि.मी. अंतरावर बारामोटेची विहीर वसलेली आहे.
(लिंब फाट्याच्या आधी लागणाऱ्या नागेवाडी  गावातून पण येथे जाता येते).




या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीत श्रीमंत सौ. विरुबाई भोसले ह्यांनी केले. विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती असून ह्या विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावता येऊ शकायच्या आणि त्यामुळे ह्याचे नाव बारा मोटा असलेली विहीर म्हणजेच 'बारामोटेची विहीर' असे पडले. विहिरीतून उपसलेले पाणी मुख्य: आजूबाजूच्या आमराईसाठी वापरण्यात येत असे.



जमिनीपातळीखाली उभारलेल्या महालात ही विहीर आहे.खाली उतरायला चालू करताना समोरच एक शिलालेख दिसतो. काही पायर्या उतरून खाली आले की आपल्याला महालाचा मुख्य दरवाजा बघायला मिळतो. ह्या दरवाज्यावर चक्र लावलेली दिसतात. ह्या दरवाज्याच्या आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती नजरेस पडते. तिकडून पुढे आल्यावर आपण महालात प्रवेश करतो. महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बसवलेली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. सातारचे राजे श्रीमंत . प्रतापसिंह महाराज ह्यांची विहिरीच्या महालात खलबते चालत असा उल्लेख आहे.



बारामोटेची विहीर ही एक अप्रतिम कलाकृती आहे. महालाचे दगडी बांधकाम त्यावेळेच्या स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच लिंब सारख्या लहानश्या गावातही ही ऐतिहासिक विहीर आजही आपले अढळ स्थान टिकवून आहे.

 -- अमोल नेरलेकर