Friday 30 December 2016

कट्टा

आज ती म्हणाली 'चल कुठेतरी फिरायला जाऊयात की' आणि  बर्याच दिवसांनी आमच्या कट्ट्यावर गेलो; लग्नानंतर पहिल्यांदाच..!

ह्या काट्याचा नेमका पत्ता असा नाही, अक्षांश-रेखांश पण अचूक काढणे कठीण पण आमच्या नात जुळायच्या काळात आम्हाला एकमेकांची रेष अन रेष जाणवून देऊन आमच्या आयुष्यातला अविभाज्य अंश बनलेला हा कट्टा. अगदी सुरुवातीला 'कुठे भेटायचं' असा विचार करता दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून निवडलेला 'कट्टा' आणि आता आवर्जून जाऊन परत 'त्या' क्षणांना अनुभवून पाहण्यासाठी असलेला कट्टा - खरंतर ह्याच सर्व प्रवासाचा समक्ष साक्षीदार असलेला हा कट्टा...!

कट्टा तसा शांत ठिकाणी. फार तर फार अजून ५-७ लोक आजूबाजूला. सकाळी गेलं की सूर्याचं कोवळं ऊन अंगावर लेपत लेपत 'या बसा' म्हणायचा. तेच कधी सूर्यास्ताच्यावेळी गेलं की 'काय मग, आज इथून सूर्यास्त पाहायचाय वाटत' असं म्हणणारा आणि कधी रात्री गेलं की निघताना 'नीट जपून जा हो बाळांनो..रस्त्याला अंधार आहे खूप' असं म्हणून काळजी करणारा हा कट्टा. त्याला मुळात पाहुणचारच खूप आवडत असावा. कधी पक्ष्यांच्या गुंजनातून, कधी वार्याच्या झुळुकीतून तर कधी बासरीच्या सुरांतून त्याने पाहुणचार केल्यावर मन कस तृप्त व्हायचं!!

कट्ट्याने आमची आणि आमच्या नात्याची अनेक रूप पाहिली. आमची पहिली भेट, आमच्यातले कोवळे कोवळे संवाद, एकांतात अनुभवलेले स्पर्श, वाचलेल्या कविता, तिने गजरा माळल्यावर आलेली वाऱ्याची झुळूक, आमचं मौन आणि त्या मौनातूनही होणारा डोळ्यांचा संवाद, आमचा राग, आमची भांडण - ती करून उठून जाणं आणि ती सोडवायला परत तिथेच येणं आणि अशा सार्या गोष्टींना सर्वकाळ साक्षी असलेला हा कट्टा. 

आज बर्याच दिवसांनी पावलं तिथे वळली. गेल्या गेल्याच कट्ट्याने आमचं स्वागत केलं. खरंतर कट्टा तोच, आम्ही माणसंही तीच पण तरीही आजच तिथे जाणं खूप वेगळं वाटलं. आज कट्टा मला घरातल्या कर्त्या पुरुषासारखा वाटला - आपले बाबा किंवा आजोबा असावेत ना तसा! लग्नकार्य पार पडल्यावर दोघांकडल्या वडिलांच्या चेहर्यावर 'समाधान' यावं तस ह्याच्याही चेहर्यावर आलं आणि निघताना सहज मागे वळून 'त्याच्या' अबोल चेहर्याकडे पाहिलं तेव्हा जाणवलं की तो नजरेतून माझ्याशी बोलत होता - 'बाळांनो, सुखी रहा.  नीट जपून जा..रस्त्याला अंधार आहे खूप..'


-- अमोल नेरलेकर 
३० डिसेंबर २०१६