Wednesday, 30 April 2025

मोरपीस..

 स्पर्शानेच सांगावी मनातील शतशब्दांची कहाणी,

आठवणींच्या पानांत लपवले रे मोरपीस हे कोणी?

नानाविध रंगांनी फुलवली नेक भावनांची नक्षी,

नाजुकता वर्णिती त्याची ही ओळख खरीखुरी..

कोणी वसवी फुलदाणीत, कोणी लिहितो गाणी,

आठवणींच्या पानांत लपवले रे मोरपीस हे कोणी?

कोण्याकाठी, शांत क्षणी सहजच दृष्टीस हे पडावे,

नजरेत एका लक्ष जन्मांचे नाते बनुनी जावे..!

मनतीरावर तव नयनांची प्रतिबिंबे किती पडली,

आठवणींच्या पानांत लपवले रे मोरपीस हे कोणी?

प्रत्येकाला असा एक हक्काचा मोरपीस असावा,

डोळे मिटता मनी क्षणमयूराचा गर्द पिसारा फुलवा..!

संवादच हा अबोल, एकांत, आणि कोण रे जाणी?

आठवणींच्या पानांत लपवले रे मोरपीस हे कोणी?

-- अमोल नेरलेकर | 18.4.25 | पुणे