Thursday, 20 August 2015

करार...

न कळे तुझा हा कोणता आकार आहे,
मज शोधायला येथे मीच फरार आहे…

पटांवरी बघ रोज खेळ द्यूताचा चाले,
मला मारायचा तुझा डाव हुशार आहे…

अनेक राजांनी हा दरबार तुझा भरलेला,
भीक मागणारा मीच एकटा महार आहे…

उगा कशाला असावा मोह नसणार्याचा,
नशिबी माझ्या फक्त साधा नकार आहे…

नको करूस माझी तुलना भल्याभल्यांशी,
द्रोणाच्या नजरेतला मी, कर्ण सुमार आहे…

पुन्हा नको उजळवूस मार्गात दिवे माझ्या,
वार्यास न अडवणे - आपला करार आहे…

-- अमोल नेरलेकर, २०.०८.२०१५

Monday, 3 August 2015

ती म्हणाली तिला भेटताना मला बरोबर घेउन चल..

'ती' म्हणाली 'तिला' भेटताना मला बरोबर घेउन चल,
म्हण ना आम्ही होतो पुढे, 'तू' ही थोडी मागून चल..

तशी माझी काही फार फार अपेक्षा नाही,
सोबत मला नेताना खूप सजव असही म्हणत नाही..
मला माहितीये तिला भेटताना तुझे मन असते रिक्त,
म्हणून सांगते तुझासोबतची थोडी जागा दे फक्त,
तुझ्या त्या क्षणांच्या आठवणी सार्या साठवून घेइन,
तू म्हणशील तितकच आणि तेवढच फक्त लिहून घेइन..
बघ तुला पटतय का..!

मला माहितीये, ती नसताना तू माझ्याशीच तासंतास बोलत असतोस..
आणि मी ही ऐकत असते तुझ्या त्या गप्पा, स्वत:ला 'ती' बनवून..
कळतो रे मला तुझा हर्ष, विरह, दु:ख, त्रास..
म्हणूनच ती आल्याचा करून देते मी तुला थोडा भास..
आता कस बरोबर असेन तर मला थोड बर वाटेल,
तुला काही मदत लागली तर मी ही लगेच तयार असेन..
बघ तुला पटतय का..!

तुम्हा दोघांच्या नजरबंधात मी सहजतेने मावू शकते..
तुम्हा दोघांच्या स्पर्शांची अलगद मिठी बरी वाटते..
तुम्हा एकमेकांच्या सहवासात मी ही तिथेच बसलेली असते..
पण तुझ लक्ष कुठे असत माझ्याकडे?
तुझ आपल नेहमीचच..तिची नजर..तिचे डोळे..
मग मलाही येतो राग..मी ही रागावते तुझ्यावर थोडी..
पण वाटत माझ्याइतकच तिच्यावरही प्रेम करणार आहे कोणी..
तुम्हाला तस एकत्र बघून खूप खूप छान वाटत..
दुसर्याच्या सुखात आनंदी असण - जीवन आणखीन काय असत?
बघ तुला पटतय का..!!

तसा हट्ट हा नेहमीच मी तुझ्याकडे करत असते,
मला सारख बरोबर ने आग्रह नेहमी धरत असते..
तुला मी अन मला तू आपण एकमेकांचे जरी सोबती,
तरीही सांगते कुठल्याही नात्यांत करू नकोस ह्याची गणती..
नाती म्हटली की आली सारी सुख - दु:ख, इच्छा, भास,
स्वत:च्याच जगण्यावरती स्व:त करून घेतलेला त्रास..
पण खर सांगते तुझ्यामुळे ह्या कडव्यान्मधून जगता येते..
एका मूर्त कागदावरून लाख हृदयांत पोहोचता येते..अमूर्त प्रेयसी बनता येते..
बघ तुला पटतय का..!!

'ती' म्हणाली 'तिला' भेटताना मला बरोबर घेउन चल,
म्हण ना आम्ही होतो पुढे, 'तू' ही थोडी मागून चल..


-- अमोल नेरलेकर, ०२.०८.२०१५

Thursday, 30 July 2015

सारे कसे…

सारे कसे नियतीने आधीच ठरवलेले,    
मी मात्र फुकटचे अंदाज बांधलेले..        

मुक्त मनाने मी कधीचे सोडले होते शीड ,
सागराने मात्र आधीच वारे फिरवलेले..  

दारी काल होता, मोगर्याचा मंद गंध,
रोप तेच आज होते मुळातून उपटलेले..

भीक मागण्यासाठी झोळी पसरली होती,
ठिगळ्यांची झाली नक्षी, ते ही फाटलेले..

उगा कशाला करता अंधाराची चर्चा?
मार्गावरील दिवे त्यांनी आधीच विझवलेले..

माझ्यातील अनेकांसाठी प्राण वेचले मी,
माझ्यावरी ते अनेक खुशाल हासलेले..


-- अमोल नेरलेकर | २५ जुलै २०१५ 

Tuesday, 14 July 2015

चाफा

चाफा हे माझे सगळ्यात आवडत फूल! चाफ्याला गुलाबासारखा चुटूक रंग नाही…सुरेखपणे आणि व्यवस्थित रचलेल्या पाकळ्या नाहीत किव्वा गुलाबासारख ते प्रेमाच प्रतिकही नाही…पण चाफ़्याचा गंध घेऊन तर बघा! अवघा आसमंत आपल्या सुगंधाने व्यापून टाकण्याची क्षमता चाफ़्याकडे आहे आणि म्हणूनच गुलाब फुलांचा राजा असला तरी चाफा मला जास्त प्रिय आहे. 

तर त्याच झाल अस…चाफा आमच्याकडे तुम्हाला जवळपास रोजच दिसेल. पिवळा चाफा, रानचाफ़ा, हिरवा चाफा, पांढरा चाफा अशी अनेक प्रकारची चाफ्याची फुल आमचे घर सदैव गंधून टाकत असतात. ह्यामुळे चाफा कुठे चांगला मिळतो, १० रुपयाला सध्या किती चाफे मिळतात आणि अगदी त्याची कळी ते पूर्णपणे फुललेला चाफा ओळखायचा कसा आणि प्रसंगी त्यातला निवडायचा कोणता हे देखील आता तोंडपाठ झाले आहे. 

कालचीच गोष्ट…रविवार असल्यामुळे संध्याकाळी बाहेर चक्कर मारता मारता चाफ्याची फुले घ्यायला गेलो. मस्त ताजीतवानी आणि टवटवीत रानचाफ़्याची फुले मिळाली आणि ती पण चक्क १० रुपयाला ८ ! मन खूष झाले. जास्तीत जास्त कळ्या निवडून मी 'चांगल' ते पदरात पाडून घेतल आणि नंतर रविवारच्या डिनरला काहीतरी खास असाव म्हणून हॉटेलमध्ये काही डिशेश पार्सल घ्यायला गेलो. गरमागरम डिशेश पार्सल घेऊन त्यावर लवकरात लवकर कसा ताव मारता येईल ह्या विचारात मी चुकून ती चाफ्याच्या फुलांची पिशवी त्या गरमागरम पार्सलवर ठेवली आणि तसाच घरी आलो. अर्धा तासानंतर बघतो तर त्या उष्णतेमुळे ३-४ चाफ्याची फुले अगदी कोमेजून गेलेली. मन खिन्न झाले. जड मनाने मी ती फुले वेगळी केली आणि उर्वरीत फुले फ्रीजमधे ठेवली. त्या कोमेजलेल्या फुलांना आपल्यामुळे झालेल्या वेदना पाहून खूप वाईट वाटले आणि गहिवरून आले. त्याना तसच पाण्यात बुडवून मी जेवणाच्या तयारीला लागलो आणि बघतो तर काय - माझ्या दोन्ही हातांना चाफ़्याचा सुगंध येउन बिलगलेला! चटकन शाळेत शिकलेलं सुभाषित आठवले - 

'अंजलीस्थानी पुष्पाणि वासयन्ति करद्वयं,
अहो सुमनसान्म प्रीती वामदक्षिणयो समा ।।'

क्षणभर वाटले ही चाफ्याची फुले म्हणजे आपल्या आजूबाजूला असणार्या चांगल्या लोकांचे प्रतिक आहे. ती पण अशीच त्या  चाफ्यासारखी! उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कमी-जास्त ह्याच्यात भेदभाव न करता सुख आणि दु:ख दोन्हीत समान साथ देणारी! आपणच आपल्या उष्ण शब्दांनी, उष्ण वागण्याने त्यांच्यावर वार करीत आलो आहोत. त्यांना दुखावत आलो आहोत. क्षणभर ती ही मनातून दुखावली गेली असतीलही पण म्हणून त्यांनी तुमच जीवन सुगंधित करणे सोडल नाही… 

हा विचार येउन गेल्यावर त्या 'चाफ्याच्या' फुलांकडे बघायची दृष्टी बदलून गेली. बाजूला पाण्यात बुडवून ठेवलेल्या 'त्या' फुलांना मी परत जवळ केले आणि माझ्या उशाशी अलगद नेउन ठेवले. मुळातच चाफ्याच फूल नसलेला 'मी' त्यांचा सुगंध घेऊन आणि त्यालाच परावर्तित करून त्यांचाच एक लहान भाग बनू पाहात होतो… 


-- अमोल नेरलेकर । १३.०७.२०१५ 

Friday, 10 July 2015

शोषण

'अव्ह सायब, राहू द्या की…सोडा आता…अर्धा किलो घेऊन जा हवतर पण असा पोटावर पाय नका देवू व्हो…तान्ह पोर आहे पदरात…' अस म्हणत तिन आपला वीतभर लांबीचा पदर त्या सायबासमोर मोठ्या जीवाच्या आकांताने पसरला. तेवढा लहान पदर, सुकलेली काया आणि रात्री दोन घास तरी तोंडात पडतील  का अशी गर्द भीती चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येईल असे तिच्या त्या लहान, चिमुरड्याचे काळेभोर डोळे बघून मनात क्षणभर संतापाची आणि तेवढीच वेदनेची सणक सर्कन सरसरून गेली. 

ती अर्तता कानांत अशी प्रत्यंचातून वेगाने सुटलेल्या बाणासारखी घुसली. 'त्या' तान्हयाचा गहिवरलेला आवाज ऐकून कानांत चालू असणार्या गाण्यातील आर्त स्वर पण फिके पडले आणि क्षणभर माझी नजर आणि काया तिथेच खिळून राहिली. 
'तो' साहेब पण तेवढाच निर्दयी निघाला. समोरच्याची काहीही पर्वा न करता आपली तुंबडी कशी भरेल आणि ती भरवून घेताना समोरच्याला किती जास्तीत जास्त त्रास होईल किव्वा देता येईल ह्याचाच विचारात असलेला. 

संध्याकाळचे ७, डोंबिवलीस्टेशन बाहेरचा रेल्वे पूल, भाज्या विकून कसाबसा उदरनिर्वाह चालवून देणारी तिची टोपली आणि माणसांनी खचखचून भरलेल्या गर्दीत आणि त्याच्या गोंधळातही तो प्रसंग मनाला स्तब्ध करून गेला. 'शोषण'…होय शोषणच…अधिकाराच्या जोरावर एका माणसाने दुसर्या माणसाच केलेलं 'शोषण' ! कधी पैश्यासाठी, कधी अधिकारासाठी, कधी भावनांच आणि कधी शरीराच केलेलं शोषण!
आपण सदैव समोरच्यपेक्षा सरस आहोत आणि आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक अधिकार आहेत, तेही सर्व बाबतीत हे सदैव सिध्द करण्याची सूडी प्रवृत्ती  म्हणजे 'शोषण' करण! कधी ह्या नीच गोष्टी जन्मजात मिळालेल्या तर कधी पैसा आणि सत्ता ह्या बळावर विकत घेतलेल्या. 

काही केल्या त्या पदर पसरणारीचा चेहरा डोळ्यासमोरून जाईना. आपल्या आजूबाजूला रोजच अशी कित्येक उदाहरण घडत असतील, घडत आहेत. त्यापैकी किती जणांकडे आपल लक्ष जात? लक्ष गेलेल्यांपैकी किती जणांना आपल्याला मदत करावीशी वाटते? मदत करावीशी वाटणाऱ्यान्पैकी किती जणांसाठी आपले हात सरसावतात आणि सरसावलेल्या हातांमध्ये किती जणांसाठी ती कायम स्वरूपी मदत ठरते?
खरच विचार करण्यासारखे प्रश्न आहेत हे!

आजही आपल्या आजूबाजूला पोटासाठी असा पदर 'पसरणारी' आहे, कुणीतरी मोठे मोठे विनाकारण आरोप करून मन दुखावल्या गेलेल्या व्यक्ती आहेत, शरीरावर झालेल्या वारांवर स्वतःच केविलवाणे उपचार करत बसलेले दु:खी जीव आहेत तर आपण जमवलेल्या चार पैशांवर फुकटचा मालकी हक्क दाखवून गेल्यामुळे व्यथित झालेलेही आहेत. आपल्या आजूबाजूला 'शोषण' अनेकवेळा, अनेक प्रकारांतून अनेक व्यक्तींवर अनेक जणांकडून घडत आहे. 

चांगल-वाईट, दया-असूया, चूक-बरोबर किव्वा योग्य-अयोग्य ह्या रूढी नसून मानसिकता आहे; आपल्याला ती योग्य दिशेने वळवायलाच हवी आणि अशा मानसिकतेचा प्रसार आणि आचरण झाल्यास असहाय्यपणे त्या राक्षसी प्रवृतीसमोर नाहक पदर पसरणार्यान्च्या आयुष्यात आपल्याला सुखाचे क्षण आणता येईल हे मात्र नक्की!

-- अमोल नेरलेकर । १० जुलै २०१५

Wednesday, 24 June 2015

Oriental Garden Lizard / सरडा

'इच्छा असतात रंगान्सारख्या, 'सरड्यासारखे' मन…'  हि संदीप खरेची कविता वाचत असताना माणसातल्या अनेक रंगांची जाणीव झालीच आणि मस्त गरम गरम चहा करून घ्यायला उठलो तर नजर सहज खिडकीबाहेर गेली तर समोर खरच 'सरडा' बसलेला आणि अतिशय शांत व स्तब्ध स्थानात. त्याचे काही फोटो काढून आल्यावर 'कवितेतल्या' सरड्याला बाजूला ठेवून ह्या फोटोतल्या सरड्याचा अभ्यास सुरू झाला.


Oriental Garden Lizard/ Eastern Garden Lizard/ Changeable Lizard  किव्वा मराठीत आपण ज्याला बाग सरडा किव्वा 'सरडा' म्हणतो हा अगदी शहरातसुद्धा सहजपणे आढळून येणारा सरपटणारा प्राणी आहे. शरीराने साधारणत: ~१० सेमी (आणि शेपटीची लांबी पकडून ~४० सेमी) असणारा हा प्राणी त्याच्या रंग बदलण्याच्या गुणधर्मामुळे सर्वद्नात आहे. नर आणि मादी दोघेही लांबीला सारखे असून शरीराचा जमिनीलगतचा भाग विरळ चॉकलेटी रंगाचा असून वरील भाग हा पिवळसर चॉकलेटी रंगाचा असतो. प्रजननाच्या काळात (विणीच्या हंगामात)  नर मादीला आकर्षित करण्यासाठी अनेक रंगबदल करतो. हे रंगबदल डोक्यापासून पुढील दोन पायांच्या भागापर्यंत (गळयाचा भाग पकडून) अधिक असून हा बदल मुख्य पिवळसर चॉकलेटी पासून भडक लाल, काळा किव्वा मिश्रित स्वरूपात असतो. हा रंगबदल उर्वरीत शरीरावर आणि शेपटीनजीक सुद्धा दिसून येतो. तसेच विशेष म्हणजे सरड्यांची मान वळत नाही आणि म्हणूनच दोन्ही डोळ्यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेला पूर्णत : १८० अंशांपर्यंत बघण्याचे वरदान ह्यांना लाभले आहे.



सरड्याची उपजीविका मुख्यत्वे किडे आणि लहान प्राणी (नाकतोडे, माश्या, ई.) ह्यांवर असते. कधी कधी हे सरडे लहान सरड्यांनासुद्धा आपले भक्ष्य बनवतात आणि कधी कधी भाज्यासुद्धा खाताना दिसतात! दात असले तरी त्यांचा मुख्य वापर हा भक्ष्याला पकडण्यासाठी केला जातो.

प्रजनन कालावधी मे-जून मधे असून मादीला आकर्षित करण्यासाठी नर आपले रंग बदलतो आणि अशाप्रकारे जास्तीत जास्त चांगले रंग खुलवण्यासाठी चढाओढ चालू राहते. मादी एकावेळी ५ ते २० अंडी घालते आणि ही अंडी झुडूपी भागात ओलसर मातीखाली पुरली जातात. अंडी आकाराला लंबाकृती असून आकाराला ०.७ सेमी इतकी असतात. ६ ते ७ आठवड्यात अंडी उबतात आणि नवजात पिल्लांची लांबी १ - १.२५ सेमी इतकी भरते. साधारणपणे पहिले १ वर्षभर ह्या नवजात पिल्लांचा सांभाळ केला जातो. सरड्याचे एकूण आयुष्यमान ५ वर्षांपर्यंत असते.




 Oriental Garden Lizard मुख्यत: इराणमधले. पण त्यांचे वितरण आणि वावर आशियाखंडातील बहुतांश देशांमध्ये (भारत, अफगाणिस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, व्हिएतनाम, मलेशिया आणि सिंगापूर) आढळून येते. सिंगापूरमध्ये ह्यांचे अस्तित्व तिकडल्या Green-Crested Lizard जातीला धोक्याचे ठरत आहे. नुकतीच ही जात ओमान आणि अमेरिकामध्ये १९८० च्या दशकापासून दिसून आल्याचे नोंदले गेले आहे.



सरडा ही प्राणिजात आपल्याकडे पहिल्यापासूनच दुर्लक्षित आणि दुय्यमप्रकारात गणली गेली आहे. परंतू माणसासोबत ह्या शहरी वातावरणात अगदी मिळून -मिसळून राहून आणि अनेक प्रकारचे किडे-प्राणी खाउन ते निसर्गाचे जैवचक्र संतुलित ठेवायला मदत करत असतात. त्यामुळे त्यांच्या बदलणार्या रंगाप्रमाणे आपली त्यांच्याकडे पहायची दृष्टीदेखील बदलेल अशी आशा करूयात !

संदर्भ - www.गुगल.com

फोटो :
अमोल नेरलेकर :
1. Oriental Garden Lizard (male in non-breeding season)
3. Oriental Garden Lizard (male in breeding season)
4. Oriental Garden Lizard (male with Prey)

Nireekshit:
2. Oriental Garden Lizard - Female

-- अमोल नेरलेकर । २४.०६.२०१५

Friday, 19 June 2015

पाउस, कविता आणि…

'अचानक' हा शब्द जेव्हा 'पावसाळी सुट्टी' ह्याला जोडून येतो तेव्हा 'हायस वाटण' म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ कळतो. एखाद्या पावसाळी दिवसात तुम्ही आवरून तयार होता आणि 'अचानक' उमगत की पावसाने आज तुम्हाला सुट्टी मिळवून दिली आहे आणि मग अशा दिवसाच मोल बाकीच्यांपेक्षा काही औरच, नाही का?

आणि मग ह्या 'अचानक' मिळालेल्या सुट्टीच्या दिवसात काय काय करायचं ह्याचा बेत आखण सुरु होत. कुणी घरातली राहिलेली काम करत, कुणी मस्त 'ताणून' देतात, कुठे एखाद्या कट्ट्यावर किव्वा एखाद्याच्या घरी भजी आणि चहासंगे मैत्रीतल्या गप्पा रंगतात तर कुठे कुणीतरी बर्याच दिवसांपासून परत परत वाचायची राहिलेली 'कविता' घेऊन बसत…

'बारिश आती है तो पानी को भी लग जाते है पाँव,
दरोदीवार से टकरा के गुजरता है गली से,
और उछलता है छपाको में,
किसी मैच में जीते हुए लडकोन्की तरह…'  *
पाउस, कविता आणि 'गुलजार' साब म्हटलं की आठवत ते ह्या कवितेत वर्णिलेल बालपण! सुख, आनंद, विजय आणि उत्सव ह्या सगळ्याच्या व्याख्या किती वेगळ्या होत्या नाही त्या वयात? एखाद साध, छोटस चोकलेट पण मनाला तृप्त करून जायचं. कोसळता पाउस पडत असताना भिजून आलो म्हणून आईकडून वेखंड लावून घेण्यात आणि तिच्या हातचा गरम गरम तूप-लिंबू-वरण-भात खाण्यातपण एक वेगळीच खासियत होती, वेगळीच चव होती ! जगातल्या कोणत्याही सर्वोत्तम डिशसोबत त्याची तुलना होऊच शकत नाही. अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'दूर, इथून फार-फार दूर,
माझ एक गाव आहे…
आज ह्या शहरात पाउस उतरलाय आणि
मला त्याची फार फार आठवण येतेय…' **
पाउस, कविता आणि सौमित्र म्हटलं की आठवते ती ही कविता. माझ बालपण संपल आणि पुढे शिक्षण आणि नोकरी-चाकरीसाठी मी शहरात आलो, गावाला खूप खूप मागे टाकत. हे शहर आहे तस अगदी जवळ, बाजूलाच…पण माझ्या मनाला मी त्या निरागस, मुक्त गावापासून आणून ठेवलं ह्या औपचारिक आणि कपटी इमारतीन्नी वेढलेल्या शहरात. स्पर्धा, घाई ह्यांनी माझ आयुष्य अगदी वेढून टाकलय आणि मी ही अडकून गेलोय ह्या चक्रव्रूहात…अभिमन्यूसारखा. ह्या सगळ्यात माझ्या बालपणाची मला आठवण येते, अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'इवल्याश्या स्पर्शांनीच रान शहारले,
मंद गारव्यात पान-पान थरारले…
पांघरून आभाळाचे गीत ओलेचिंब,
वळवून कूस थवे फुलांचे झोपले…' ^
पाउस, कविता आणि सुरेश भट हे तिघे एकत्र आले की ही कविता. गझलांखेरीज अशा अनेक सुंदर कविता त्यांनी लिहिल्या. ह्या शहराच्या दाटीवाटीतपण निसर्गात गेल्याचा भास झाला आणि परत गावाकडचे (निर्मळ बालपणाचे) दिवस आठवले! शेते फुलली आहेत, सर्वत्र हिरवाई नटली आहे, उन-पावसाच्या खेळामध्ये सप्तरंगी इंद्रधनू खुलले आहे…अहाहा! असा मनसोक्त बहरलेला निसर्ग पाहिला की अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

'पाउस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा थेंबांच्या संथ लयींचा…
पाउस असा रूणझूणता पैंजणे सखीची स्मरली,
पाउल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली…' ^^
पाउस, कविता आणि संदीप खरे ! पाउस हा असा प्रेमात पडायला लावणारा. तशी माझी अन तिची ओळख खूप जुनी, अगदी बालपणापासूनची. पण वयानुसार वाढताना बदलत गेलेली ओळख आणि कळत गेलेला माणूस नात्याला नवीन अर्थ देऊन जातो. पाउस असा गुंजायला लागला की तिची खूप आठवण येते…सोबत घालवलेले क्षण, अगदी बालपणापासूनचे ! तिची आठवण आली की अजूनही ते बालपण माझ्या डोळ्यांसमोर येत !

पाउस हा असाच वेगवेगळी रूप घेऊन आपल्या सभोवती वावरत असतो. प्रत्येक पाउस वेगळा, प्रत्येकाचा पाउस वेगळा आणि म्हणूनच प्रत्येकाच्या कवितेतून व्यक्त होणारा प्रत्येकवेळीचा पाउस वेगळा !

पाउस हा एखाद्या व्यक्तीसारखा असतो अस मला वाटत. पाउस कधी कधी खूप आवडतो, कधी कधी खूप जीव लावतो, कधी त्याचा खूप राग येतो आणि कधी कधी तो नकोसा वाटतो. पाउस बरच काही सांगत असतो, पाउस बर्याच जणांच ऐकत असतो. पाउस कधी कधी खूप बोलका असतो, असावासा वाटतो तर कधी नुसताच खिडकीबाहेर पडणारा तो त्रयस्तासारखा भासतो. कधी डोळ्यांसमोरपण नकोसा होतो तर कधी त्याच नुसत अस्तित्वपण बरच काही बोलून जाते, देऊन जाते…पाउस हा तसाच असतो, सगळ्यांसाठीच सारखा, खरतर तुम्ही जस संबोधाल त्याला, पाउस तसा असतो!

'पाउस, कविता आणि…' लिहिताना ती मला 'चल भिजायला जाऊ म्हणाली'…
'मला पाउस नुसता बघायलाच आवडतो…भिजण-बिजण कशाला उगाच' अस म्हटल्यावर रुसून बसली, आणि मग -

'आज पुन्हा बरसला तुला आवडणारा पाउस,
आज पुन्हा कोसळतो नावडणारा पाउस…

रागारागाने मी तयासी हजार नावे देता,
पापण्यांत तुझ्या कसा दाटला पाउस…

माझ्या नेक नियमांत साचेबध्द राहताना,
मुक्तछंदात तुझ्या कसा झुलला पाउस !'

अस लिहिल्यावर तिचापण रुसवा कधी निघून गेला कळलच नाही आणि ते ही भिजायला न मिळूनदेखील! 'पाउस' हा अशाप्रकारे दुरावलेली नातीपण जवळ आणतो हे उमगल्यावर त्याचे मनोमनी आभार मानल्याशिवाय रहावले नाही…!


कविता संकलन -
*   : 'रात पश्मिने की' - गुलजार.
** : 'आणि तरीही मी…' - सौमित्र.
^  : 'एल्गार' - सुरेश भट.
^^ : 'सांग सख्या रे - अल्बम' - संदीप खरे.


-- अमोल नेरलेकर । १९.०६.२०१५