चाफा हे माझे सगळ्यात आवडत फूल! चाफ्याला गुलाबासारखा चुटूक रंग नाही…सुरेखपणे आणि व्यवस्थित रचलेल्या पाकळ्या नाहीत किव्वा गुलाबासारख ते प्रेमाच प्रतिकही नाही…पण चाफ़्याचा गंध घेऊन तर बघा! अवघा आसमंत आपल्या सुगंधाने व्यापून टाकण्याची क्षमता चाफ़्याकडे आहे आणि म्हणूनच गुलाब फुलांचा राजा असला तरी चाफा मला जास्त प्रिय आहे.
तर त्याच झाल अस…चाफा आमच्याकडे तुम्हाला जवळपास रोजच दिसेल. पिवळा चाफा, रानचाफ़ा, हिरवा चाफा, पांढरा चाफा अशी अनेक प्रकारची चाफ्याची फुल आमचे घर सदैव गंधून टाकत असतात. ह्यामुळे चाफा कुठे चांगला मिळतो, १० रुपयाला सध्या किती चाफे मिळतात आणि अगदी त्याची कळी ते पूर्णपणे फुललेला चाफा ओळखायचा कसा आणि प्रसंगी त्यातला निवडायचा कोणता हे देखील आता तोंडपाठ झाले आहे.
कालचीच गोष्ट…रविवार असल्यामुळे संध्याकाळी बाहेर चक्कर मारता मारता चाफ्याची फुले घ्यायला गेलो. मस्त ताजीतवानी आणि टवटवीत रानचाफ़्याची फुले मिळाली आणि ती पण चक्क १० रुपयाला ८ ! मन खूष झाले. जास्तीत जास्त कळ्या निवडून मी 'चांगल' ते पदरात पाडून घेतल आणि नंतर रविवारच्या डिनरला काहीतरी खास असाव म्हणून हॉटेलमध्ये काही डिशेश पार्सल घ्यायला गेलो. गरमागरम डिशेश पार्सल घेऊन त्यावर लवकरात लवकर कसा ताव मारता येईल ह्या विचारात मी चुकून ती चाफ्याच्या फुलांची पिशवी त्या गरमागरम पार्सलवर ठेवली आणि तसाच घरी आलो. अर्धा तासानंतर बघतो तर त्या उष्णतेमुळे ३-४ चाफ्याची फुले अगदी कोमेजून गेलेली. मन खिन्न झाले. जड मनाने मी ती फुले वेगळी केली आणि उर्वरीत फुले फ्रीजमधे ठेवली. त्या कोमेजलेल्या फुलांना आपल्यामुळे झालेल्या वेदना पाहून खूप वाईट वाटले आणि गहिवरून आले. त्याना तसच पाण्यात बुडवून मी जेवणाच्या तयारीला लागलो आणि बघतो तर काय - माझ्या दोन्ही हातांना चाफ़्याचा सुगंध येउन बिलगलेला! चटकन शाळेत शिकलेलं सुभाषित आठवले -
'अंजलीस्थानी पुष्पाणि वासयन्ति करद्वयं,
अहो सुमनसान्म प्रीती वामदक्षिणयो समा ।।'
क्षणभर वाटले ही चाफ्याची फुले म्हणजे आपल्या आजूबाजूला असणार्या चांगल्या लोकांचे प्रतिक आहे. ती पण अशीच त्या चाफ्यासारखी! उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कमी-जास्त ह्याच्यात भेदभाव न करता सुख आणि दु:ख दोन्हीत समान साथ देणारी! आपणच आपल्या उष्ण शब्दांनी, उष्ण वागण्याने त्यांच्यावर वार करीत आलो आहोत. त्यांना दुखावत आलो आहोत. क्षणभर ती ही मनातून दुखावली गेली असतीलही पण म्हणून त्यांनी तुमच जीवन सुगंधित करणे सोडल नाही…
हा विचार येउन गेल्यावर त्या 'चाफ्याच्या' फुलांकडे बघायची दृष्टी बदलून गेली. बाजूला पाण्यात बुडवून ठेवलेल्या 'त्या' फुलांना मी परत जवळ केले आणि माझ्या उशाशी अलगद नेउन ठेवले. मुळातच चाफ्याच फूल नसलेला 'मी' त्यांचा सुगंध घेऊन आणि त्यालाच परावर्तित करून त्यांचाच एक लहान भाग बनू पाहात होतो…
-- अमोल नेरलेकर । १३.०७.२०१५