Monday, 23 March 2015

पाणी..

थेंब थेंब पाण्यासाठी,
चालतो मैले किती दूर..
आज हिच नदी शुष्क,
जीस गतवर्षी आला पूर..

आधीच सुकली ही काया,
त्यात सुकलेली जमीन..
ना दोन वेळेची भाकर,
कुठे गुरां 'चारा' नवीन?

रडून थकले 'भुकेले',
'तहानलेले' मूल लहान.. 
डोळ्यांतील आसवांनी,
मी भागवतो ही 'तहान'..

--अमोल नेरलेकर

Sunday, 22 March 2015

नाती

माणसासाठी माणूस आहे ही जाणिवच खूप आधार देणारी आहे..
मुळात 'नाते' ह्याचा अर्थच आधार असा असावा ..

नाती ही परत 'असलेली' आणि 'मानलेली'…
'असलेली' नाती सक्तीची आणि पर्याय नसलेली ..त्यांचा आधार वाटला तर दुसरे सुख नाही पण जाच वाटला तर त्याहून मोठी वेदनादेखील नाही…
ह्याउलट मानलेली नाती…त्यांचा कधीच जाच वाटत नाही कारण ती मनापासून स्वीकारलेली असतात…त्यांच्यात एक आपुलकी असते…आपलेपणा असतो..विश्वास असतो..

माणसाच आयुष्य अनेक नात्यांनी फुलल आहे..प्रत्येक माणसाला आणि प्रसंगाला स्वत:चा सुवास आहे..
इथे दरवेळी गुलाब श्रेष्ठ ठरेलच अस नाही कारण फुलाचा सुवास ही तुलनेची गोष्ट नव्हे..

-- अमोल नेरलेकर

Saturday, 21 March 2015

कसलं काय..

अशीच एक संध्याकाळ तेव्हा पण पडली होती..
वाटलं होत चला..लाही लाही करणारी दुपार टळून गेली..
आता सुखद चांदण पडणार थोड्याच वेळात..
पण कसलं काय..

समुद्रकिनारी बसलो होतो आपण..पक्ष्यांचे थवे निरखीत..
वाटलं आता तरी बंधनाचा पिंजरा तोडून ह्यांच्यासारख मुक्तछंदात जगता येईल..
पण कसलं काय..

माझ प्रेम मला सागराच्या खोलीची जाणीव करून देत होत..
आणि मला वाटल तुझही असेल तेवढंच अथांग..क्षितिजापर्यंत साथ देणार..
कदाचित मला त्याची चव तेव्हा कळली नव्हती..
आणि  वाळूवर लिहिलेली अक्षरे पण तुझ्या शपथेसारखी..
क्षणिक..आणि काळाच्या लाटेमध्ये विरून जाणारी..
मी त्यांना धरून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..
पण कसलं  काय..

हल्ली मी मधून मधून जातो तिथे..
सूर्यास्त पाहतो आणि पक्ष्यांचे थवेही..
पण वाळूतल्या अक्षरांपेक्षा दूरवर फिरणारे गलबत बरे वाटते..
निदान क्षणात अस्तित्व संपवण्यापेक्षा सदैव दूर राहण्याच्या निर्णयाशी ते प्रामाणिक असते..

--अमोल नेरलेकर  

Wednesday, 18 March 2015

पारिजात

न कळे मजला हा आज गंध कोठोनी आला,
खरच आला वाऱ्यासंगे का भास फक्त तयाचा..
मिटले डोळे अलगद मी अन आठवण तुझी येता,
हाती माझ्या तव स्पर्शाचा पारिजात फुललेला..

--अमोल नेरलेकर 

हॉर्न..

मला आठवतंय, अगदी परवापर्यंत मी मोठ्या ट्रकच्या मागे लिहिलेल वाचायचो…'देवीची कृपा', 'आई-बाबांचा आशिर्वाद', 'बुरी नजरवाले तेरा मुह काला' आणि 'Horn Please'…

शेवटची ओळ जरा विचारात पाडणारी आहे. खरच, हॉर्न्सची सतत वाजवण्याची एवढी गरज असते का हो? मला आठवतंय मी कामानिमित्त काही दिवस परदेशी गेलो होतो आणि तेथे तेवढे दिवस मी एकही होर्न ऐकला नाही…त्याचं कुठे अडलं का? नक्कीच नाही… 

आज त्याची मी तुलना आपल्याकडील रस्त्यांवर करतो…किती कर्कश आणि कानठळ्या बसवणारे होर्न्स…आणि ते ही विनाकारण. 

ह्याचे मानसिक आणि शारीरिक किती आणि कोणते परिणाम होतात ते वेगळ सांगायला नको. आज आपण तरुण आहोत, ह्या साऱ्याचा मारा आपल्याला जास्त जाणवणार नाही पण आपल्या आजूबाजूला कुठेतरी नवीन जन्मलेल अर्भक आहे, शाळेत जाणारी मुलं आहेत, आई-वडिलांच्या वयाचे समवयस्क आहेत आणि आयुष्याच्या संध्याकाळी चार क्षण मोकळ्या हवेत फिरून यायची इच्छा बाळगणारे आजी-आजोबा आहेत. आपल्याला ह्या सर्वाची काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच ह्या साऱ्याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे… 

उद्या हातात काठी धरून फिरताना सप्त्सुरांनी रंगलेल्या गाण्याचे श्रवण चांगले करता यावे असे वाटले तर त्यात गैर काय?


--अमोल नेरलेकर 

Monday, 16 March 2015

कधीतरी सांजवेळी...

कधीतरी सांजवेळी क्षितिजाच्या बाजूनी,
फेरफटका मारून येतो आठवणींना घेऊनी..
कोण कुठला चंद्र शीतल आणिक उष्ण भास्कर,
मावळणार इथेच अन उगवणार पुन्हा येथुनी..
 
कधीतरी सांजवेळी क्षितिजापल्याड मी,
रियाजाला बसतो एकटा सूर कोवळे घेऊनी..
कोण कुठला ताल, सम, खर्ज आणि मध्य हा,
षड्ज आणि निषादामध्ये समैकरूप होऊनी..
 
कधीतरी सांजवेळी क्षितिजा-अल्याड मी,
नजर कोरडी लावतो त्या सागराच्या किनारी..
कोण आपले, कोण परके, नातीही अन मैत्रीही,
प्रेम आणि वैर यांस एकाच पारड्यात तोलुनी..

-- अमोल नेरलेकर 

Sunday, 15 March 2015

हिशोब

आणखीन एक दिवस मावळला..

असे आत्तापर्यंत अनेक उगवले आणि मावळले..पण प्रत्येकाचा हिशोब ठेवला नाही..परंतु..
आज मात्र हिशोब लिहायला बसावस वाटतय..काय करायच ते ठाव आहे पण कस ते मात्र माहित नाही..

म्हणजे बघा ना, हिशोब लिहायच तर ठरवल आहे..पण त्यात नक्की जमा काय आणि खर्च काय तेच उमजेनास झालय..

आणखीन एक दिवस मावळला..

सुख-दु:ख ह्यांची balance sheet बनवून पाहिली..पण बाकिच्यांशी तुलना करता करता काही नीट जमली नाही..
चांगल-वाईट ह्यांची बनवायला लागलो तर त्याचा न्याय देण्यावरून मनात वाद सुरू झाला..
पाप-पुण्य..छे! आवाक्या पलीकडच्या गोष्टी..
शेवटी विचार करता करता आपल आणि परक ह्यावर हिशोब मांडायचा ठरवल..परिमाण बर्यापैकी योग्यही वाटल..

गोष्टी लिहायला सुरूवात केली..credits..debits..

जास्तीत जास्त credits आपल्या balance sheet मध्ये हवी असा अट्टाहास होता..
पण नकळतपणे आणि नाईलाजास्तव काही खर्च हे करावेच लागतात..

Balance sheet लिहून झाली..छान वाटली..पण मन मात्र समाधानी होईना..

कारण जो तो आपली balance sheet दुसर्याशी तुलना करायचा प्रयत्न करत असतो..

आणखीन एक दिवस मावळला...

- अमोल नेरलेकर 

Friday, 13 March 2015

अंतर

काल संध्याकाळी फिरताना दोन आजोबांमधील संवाद कानावर आला. 

"मी मोठ्याकडून काही अपेक्षा करत नाही. धाकट्याने सांभाळले तर ठीक नाहीतर वृद्धाश्रम आहेच. "

"हो ना. माझ्याकडेपण लहान आणि त्याच्या येणार्या बायकोने विचारले तर ठीक. जोवर हात-पाय चालत आहेत तोवर ठीक. नाहीतर वृद्धाश्रम आहेच."

"हो ना. वृद्धाश्रम आहेच."

क्षणभर मन खूप विषण्ण झाले. ५० वर्षांपूर्वी किव्वा दोन पिढ्यांपूर्वी पालकांना आपल्या मुलाविषयी वाटणारा विश्वास आज असा अचानक का ढासळला? आणि तो ढासळला असेल तर कोणामुळे? माझ्यामुळे का माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे?

मुळात मनच जर नापीक असेल तर काही भावना नसतात. पण सुपीक आणि संवेदनशील मनाची स्थिती अशावेळी चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी होते; चोहोबाजूंनी कोंडी झाल्यासारखी… 

जगातील सर्वात छोट आणि मोठ अंतर हे दोन मनांमध्येच असू शकत. ते कोणत्याही एककात मापता येत नाही. 

-- अमोल नेरलेकर 

Wednesday, 11 March 2015

संक्रमण

एखाद्याच असण किव्वा एखाद्याच नसण कधी कधी इतक मनाला का लागत? 
त्यात त्या व्यक्तीचा प्रभाव का आपल्या मनाची कमकुवतता?

माणूस म्हटला की सर्व भावना आल्या; सर्व बंधने आली…
बंधने परत स्वीकारलेली किव्वा लादलेली; म्हणजेच स्वेच्छा किव्वा परेच्छा. मी जसा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तसाच समोरच्यानेपण करावा असे जरूरीचे नाही. पण संवादात सुसूत्रता नसली की भांड्याला भांडे भिडणारच हे वेगळे सांगायला नको !

काळाच्या ओघात माणसे, ऋतू, वेळ आणि इच्छा सार्या बदलत असतात. काहींमध्ये नकळत बदल होत असतो तर काहींत बदल करावा लागतो.
तिन्ही सांजेला दिवस ढऴल्याचे आणि येणार्या गर्द रात्रीचे भय दाटून येते कारण संक्रमण हे माणसाला नेहमीच वेदनादायक ठरले आहे. स्वेच्छेने आणि सुविचाराने केलेले संक्रमण खूप पुढे घेऊन जातेच पण परेच्छेने केलेल्या संक्रमणाचे काय? 

प्रत्येक इच्छेला पर्याय नसावेत. काही इच्छा अपर्यायी असाव्यात. 
काही इच्छांना तुलना नसावी, कारण आयुष्यात काही माणसे आणि त्यांना आपल्याशी घट्ट बांधून ठेवण्याच्या असलेल्या इच्छा अतुलनीय असतात...


-- अमोल नेरलेकर 

Tuesday, 10 March 2015

संवाद

कधी कधी अस का होत की कालपर्यंत जे आवडत होत किव्वा उद्याही जे आवडणार आहे ते आज अचानक आवडेनास होत? कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टींत लक्ष लागेनास होत…
मग आज नक्की काय बदलल आहे? त्या गोष्टीतली आवड का मनाशी त्या गोष्टीविषयी चालू असलेला संवाद? 

संवादाला दरवेळी शब्दांची गरज नसते…काही संवाद शब्दांपलीकडचे आणि स्पर्शातून व्यक्त होणारे असावेत…

संवाद परत दोन प्रकारचे…मनाचे जगाशी चालणारे आणि मनाचे मनाशीच चालणारे…
जगाशी चालणार्या संवादात जास्त नियम नसतात, जास्त अवघडपणा नसतो…जे वाटत ते बोलायचं; जे पटत ते करायचं…इथे माणसांना मनवता येत, समजवता येत, प्रसंगी रागावता पण येत आणि रागावून परत जवळ करता येत…
मनाचा मनाशी चालणार्या संवादात मात्र अनेक चढ-उतार असतात….कारण येथे एक मन सदैव दुसर्यावर हुकुम गाजवायला बघत असत…इथे मनवण, रागावण आणि जवळ करण तितकस सोप्प नाही कारण इथे अर्जुन पण तेच आणि सारथी कृष्ण पण तेच… 

मन कोडी घालत असत..मन कोडी सोडवत असत…खरतर आपल्याच दोन मनातील फरक हे आपल जगण असत…
मन प्रश्न विचारत असत…त्याची उत्तरेपण स्वत:च शोधत असत…आणि त्या मिळालेल्या उत्तरातून पुन्हा नवीन प्रश्न शोधत असत… 

मनाच्या server शी चालणारा हा संवाद नेहमी जिवित ठेवला पाहिजे. कारण ह्या संवादाचा down time खूप त्रासदायक असतो; ह्या server शी कोणतीही back-up लिंक नसते…  

-- अमोल नेरलेकर 

सहवास

कधी कधी अस होत की सामोरासमोर भेटल्यावर किव्वा ठरवून भेटल्यावरही बोलायला काही विषय सुचत नाहीत. पण म्हणून समोरच्याशी बोलायचं नाही किव्वा बोलायला काही विषयच नाहीत असा काही त्याचा अर्थ होत नाही.

माणूस माणसाशी मनाने जोडला असतो आणि दोन मनांच्या संवादाला दरवेळी शब्दांचीच गरज भासते असे नाही. काही गोष्टी शब्दान्पल्याड असतात; त्यांनाच आपण भावना म्हणतो; आणि ह्या सार्यांपलीकडे असतो तो सहवास…

संवादाच्या प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे असे अढळ स्थान आहे, स्वत:चे असे महत्व आहे. शब्द बोलायला लागतात, भावना समजायला लागतात आणि सहवास अनुभवायाला लागतो…

पाउस पडतो आहे, किंबहुना पाउस कसा आहे हे शब्दांतून सांगता येत, कधीकधी कवितेतून वर्णितादेखील येत…
पण पावसाला आपलस करण्यासाठी, त्याला जवळ करण्यासाठी मनात भावना असावी लागते,
आणि पाउस काय आहे हे कळण्यासाठी त्याच्या सहवासात भिजाव लागत…

सहवास क्षणिक असतो…सहवास क्षणांचा असतो…
सहवासाला वेळेची मर्यादा नसते…सहवासाची व्याख्या नसते…
सहवास भेद-भाव पाळत नाही…सहवास कधीही जाळत नाही…

माणसाचं अबोल अस्तित्वदेखील लाखमोलाचे असते. कारण माणसाचा सहवास ही समजावून सांगायची गोष्ट नव्हे…
सहवास ही अनुभवायाची गोष्ट आहे…

- अमोल नेरलेकर