Saturday, 12 December 2015

या जन्मावर…या जगण्यावर…

आज ऑफीसमधे सकाळी ११च्या सुमारास जयवंत आणि पंकजसोबत चहा घेत बसलो होतो. नेहमीच्याच गप्पा चालू होत्या. तेवढ्यात समोरून कॅन्टीन बॉय - अजय आला. त्याचा सहकारी 'नरेंद्र' ह्याने नोकरी सोडल्याचे आम्हाला कळले होते आणि त्यात आज अजयने येउन सांगितले की तो त्याच्या गावी - विदर्भात परत जाणार आहे.

मी सहज विचारलं, 'काय रे अजय, नरेंद्र नोकरी का सोडतोय? आणि काय करणार गावी जाऊन?'

त्यावर अजय म्हणाला, 'सर, तो आता त्याच्या आईसोबत राहील गावाला. त्याचा बाप बेवडा आणि त्याच हे तिसर लग्न. नरेंद्रच्या आईकडे त्याच जराही लक्ष नाही. त्याने ह्याला सांगितलय, मुकाट इकडे ये आणि आईला घेऊन सांभाळ. म्हणून चाललय तो…'

दोन क्षण आपण काय उत्तराव हे मला सुचेना; मन खूप विषण्ण झाले. रोज येता जाता आम्ही त्याची दिलखुलास मस्करी करायचो त्या हसर्या आणि निरागस चेहेर्याच्या नरेंद्रच आयुष्य एवढ्या अजीर्ण दु:खांनी, यातनांनी आणि नाईलाजान्नी भरलेल असेल ह्याची कणभरसुद्धा कल्पना नव्हती.

'त्याचा बापूस विहिरी बांधायचं काम करतो, तो पण तेच करेल आता… ' अजय सांगत होता.

खरच, जीवन किती निष्ठूर आहे आणि नियती किती बेलगाम! ती काहींना गंभीर करून तीच ओझं खांद्यावर झेलायला लावेल तर काहीना अगदी सुखात लोळवेल…

ह्याला खरच आईला भेटायचं का? का त्याच्या नाईलाज आहे? का आपला बाप आपल्या आईला काही करेल का ह्याची त्याला भीती वाटतेय? का हेच कारण दाखवून तो नोकरीपासून दूर पळतोय? का नियती त्याला हे करायला भाग पाडतेय? हे तो स्वत:हून करतोय का कोणाच्यातरी सांगण्यावरून? त्याला पुढचे परिणाम दिसत आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात बाजार मांडला. क्षणभर कोणाशी बोलाव आणि काय बोलाव हेच सुचेनास झाल. त्याने डोळ्यांसमोर येउच नये असे वाटत होते; ते दु:खापोटी, करूणेपोटी, रागापोटी की आणखीन कशासाठी ते माहीत नाही…

मन कितीही चांगल असल तरी रोजच्या व्यावहारिक जगात जगायची बुद्धी त्याला मिळू दे अशी मनोमन प्राथर्ना केली. त्याला त्याच जगण भिजलेल्या कापसापरी ओझ न वाटता हवेत उडणार्या रेशीमधाग्यांपरी हलक आणि मुक्तछंदाच वाटू दे असे मनापासून वाटले आणि जाता जाता पाडगांवकरांच्या 'या जन्मावर, या  जगण्यावर…शतदा प्रेम करावे…'  ह्या ओळी ओठांवर आल्या.

देव करो आणि त्यालासुद्धा ह्या ओळी गुणगुणाव्याशा वाटोत. 'आज' नाही कदाचित, पण निदान 'उद्या'तरी…


-- अमोल नेरलेकर । १२.१२.२०१५

  

Sunday, 22 November 2015

बरे नाही…

तुझे असे हे सारखे सजणे बरे नाही,                           
आरशाशी वेळ एवढे बोलणे बरे नाही… 

तूच सांग एकदा,पुनवा कधी आहे,                           
माझे हे असे रोजचे जागणे बरे नाही…                       

'भेटूनी तुला आज सांग काय मी बोलू',                      
तुझे असे स्वत:ला समजावणे बरे नाही…                   

नजरेच्या धारेतून होऊ दे वार एकदाचा,                    
पापण्यांच्या लयीतून असे छळणे बरे नाही…              

कोरली गेली नक्षी माझ्या-तुझ्या आठवणींची,
मेहेंदीसम मनात माझ्या रंगणे बरे नाही…               

कालचे तुझे असणे किती बोलून गेले,                        
स्पर्शात शब्दाचे अंतर ठेवणे बरे नाही…                     



-- अमोल नेरलेकर

Sunday, 4 October 2015

Plain Tiger Butterfly

बिबळ्या कडवा

फुलपाखरांची नावे मराठीत कशी पडली असतील हे कोड मला नेहमी पडत. कोणाच्या नावात 'स्विफ्ट' तर कोणाच्या नावात 'राजा', कोणाच्या नावात अगदी 'झेब्रा' तर कोणाच्या नावात 'टायगर'. फुलपाखरे तशी स्वच्छंदी, त्यामुळे हवा, प्रदेश ह्यांसारख्या गोष्टींची सीमा फार कमी वेळा ह्यांच्या मधे येते. शिवथरघळला फिरताना मला दिसलेले हे फुलपाखरू - प्लेन टायगर अर्थात बिबळ्या कडवा.

बिबळ्या कडवा आकाराने साधारण ७ ते ८ से. मी. इतके असून रंगाने फिकट चॉकलेटी-केशरी असून पंखांची टोके काळ्या रंगांची असतात. पंखांची वरील बाजू ही खालील बाजूपेक्षा जास्त तेजस्वी असते, म्हणजेच खालील बाजूच्या पंखांचा रंग अतिशय फिकट असतो. वरील बाजूस असणार्या काळ्या टोकान्मध्ये पांढर्या रंगाचे मोठे ठिपके पहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त, बोर्डरला काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते. पंखांच्या खालील बाजूसही हे पांढरे ठिपके आणि काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते.
नर मादीपेक्षा आकाराने लहान असतो. तसेच नरांमध्ये खालील पंखांच्या बाजूला एक काळ्या- पांढर्या रंगाची एक जागा असून तिथून विशिष्ट प्रकारची संप्रेरके स्त्रवली जातात. ह्या संप्रेरकांचा उपयोग मादींना आकर्षित करण्यासाठी केला जातो.

Plain Tiger - Side View (Under Wings)
बिबळ्या कडवाचे पुनारोत्पादन वर्षभर चालू असते (अपवाद - हिमालयीन भागात हे विशिष्ट काळात होते). मादी पिवळा चित्रकाचे फूल, रुई , आक अशा झाडांच्या पानांवर अंडी घालते. ही अंडी पानांच्या खालच्या बाजूस आणि प्रती पान एक अशी घातली जातात (अळी ची उपजीविका पानांवर होत असल्याने मुबलक प्रमाणात हे पान खायला मिळावे हा त्यामागील उद्देश असतो). अंडी रंगाने पांढरट चांदेरी चमकदार असून आकाराने बुलेटसारखी असतात. अंड्यांचा आकार - व्यास ०.९ मि.मी. आणि उंचीने १.३ मि.मी. इतका असतो. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला २ ते ३ दिवस जातात. एकदा त्यातून अळी आली की तिची उपजीविका अंड्याच्या कवचापासून होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी २.२ मि.मी. इतकी असते आणि रंगाने पांढरी असते. पुढील टप्पा २ दिवसांचा असून त्यात ह्याची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवर होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी ४.५ मि.मी. इतकी असते आणि रंगाने हिरवट पिवळी असते. तिसर्या टप्प्यात ह्याचे रूपांतर सुरवंटात होते आणि हा टप्पा साधारण १.५ ते २ दिवसांचा असून तेव्हा ह्याची लांबी ९ मि.मी. इतकी होते. चौथ्या टप्प्यात आणि पाचव्या टप्प्यात ह्याची लांबी अनुक्रमे १२ मि.मी. ते २१ मि.मी. इतकी होते आणि रंगाने ते पांढरे असून त्यावर काळ्या- पिवळ्या रंगांचे पट्टे  दिसतात. पुढील टप्प्यात सुरवंट कोषात जाउन हा टप्पा साधारण ५ दिवसांचा असतो. हा कोष हिरव्या रंगाचा असून पानांच्या देठावर आधाराशिवाय मुक्तपणे लटकवलेला असतो. ५ दिवसानंतर त्यातून फुलपाखरू बाहेर येते.


Plain Tiger - UpperSide Wings

बिबळ्या कडवा संरक्षणासाठी अनेक उपाय करते. त्यात मुख्यत्वे alkaloids संप्रेराकांचा वापर होतो. alkaloids मध्ये नायट्रोजन असून हे स्त्रवल्यास त्याच्या वासामुळे मळमळल्यासारखे होते. तसेच ह्या फुलपाखराची त्वचा खूप जाड असल्याने त्याचा उपयोग त्याला वातावरणातील तापमानबदलांमुळे स्वत:ला संतुलित ठेवायला होतो.

बिबळ्या कडवाचा वावर भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका आणि आशिया खंडात आणि प्रादेशिक दृष्ट्या बाग, उघडा रानमाळ, गवत व छोट्या झाडांत आणि अगदी वाळवंटातदेखील आढळून येतो त्यामुळे 'यत्र-तत्र-सर्वत्र : बिबळ्या कडवा' असे म्हटल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही.

सर्व फोटो : अमोल नेरलेकर.

संदर्भ:
१. https://en.wikipedia.org
२. http://butterflycircle.blogspot.in
३. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे.


-- अमोल नेरलेकर । ४.१०.२०१५ 

Thursday, 1 October 2015

एकरूप

समोरी पाहता तुला, गालांत लाजूनी आले,
सारे तुझ्याचसाठी हे, स्वत:स विसरूनी आले...

नजरेतून तुझ्या किती टाळले संवाद मी तेव्हा,
स्पर्श होताच तुझा, अंगांग मोहरूनी आले...

किती धरावा धीर, त्या आरशास विचार ना,
मनात त्याच्या माझे, प्रतिबिंब ठेवूनी आले...

बघूनी रूप हे सुंदर, वळल्या त्या अनेक नजरा,
शल्य त्यांच्या उरातील, डोळ्यांत पाहूनी आले..

सारिता वैशाख मागे अन शुष्करानाची खूण,
वसंतात तुझ्या नव्याने, आतून उमलूनी आले...

सांग कशाला द्यावी दारावरी रोज मी हाक?
वर्दी द्यावया माझी हा मोगरा गंधूनी आले...

पैलतीरी गंगाकिनारी तुझी ऐकून वेणूधून,
ऐलतीरी नादवीत पैंजणे, राधा बनूनी आले...


-- अमोल नेरलेकर 

Sunday, 27 September 2015

बाप्पाची आरती...

सुरेश काकांकडला गणपती म्हणजे जणू आमच्या सोसायटीचा मुख्य गणपतीच! दरवर्षी ठरलेली ती ३ फूट उंचीची दगडूशेठ हलवाईची गणपतीची रेखीव, सुबक आणि प्रसन्न मूर्ती. आकाराने आणि दिसायला जरी सारखीच असली तरी बाजूच्या सजावटीमुळे दरवर्षीचा बाप्पा वेगळा - पण तरीही आम्हाला जवळचाच वाटतो.

लहानपणापासून, म्हणजे मी अगदी ६ वर्षाचा असल्यापासून आमच्या सोसायटीत तीन जणांकडे गणपती बसायचे आणि रोजची आरती म्हणजे जणू पर्वणीच! बोंगो, टाळ आणि प्रत्येकाच्या आतून येणार्या त्या आर्त स्वरांनी आरती काय सजायची तुम्हाला सांगतो…कालांतराने तीनाचे दोन गणपती झाले, आम्ही मोठे झालो, प्रत्येकाचे रुटीन बदलले, माणसाच्या आयुष्यातील दगदग वाढली आणि लहानपणापासून आम्हाला भेटणारी 'ती' आरती हळूहळू आमच्यापासून दूर जायला लागली…

आज कित्येक वर्षानी ती आरती पुन्हा नव्याने अनुभवायला मिळाली. ती गर्दी, तो बोंगोचा ठेका आणि त्या लांब लांब स्वरांत म्हणल्या गेलेल्या आरत्या यामुळे अगदी कस प्रसन्न वाटलं. म्हटलं, चला आपल्याकडे नवीन कॅमेरा आहे तेव्हा ह्या क्षणांना साठवून ठेवू आणि अस म्हणत आरतीचे अनेक फोटो काढले; बरेचसे मनासारखेही निघालेही - पण वाटलं फोटो हा फक्त एक नजारा आहे…हे फोटो काढताना त्या प्रत्येक फोटोमागचा तो नाद, ती तरलता, तो आवेश आणि ती प्रेरणा जर टिपता आली तर किती बर होईल नाही?

म्हणजे बघा ना, कॅमेरा एकाच समेवर होणार्या टाळ्यांचा आणि टाळांचा फोटो काढू शकेल - अगदी उत्तमरीत्या, पण त्या शेकडो माणसांमधून निर्माण होणार्या त्या टाळ्यांच्या आवाजाची एकजीवता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
गणपतीच्या आरतीपासून सुरू करत मग शंकराची, देवीची, विठ्ठलाची, ज्ञानेश्वराची, तुकारामांची, दत्ताची आणि सरतेशेवटी दशावताराची आरती होताना त्याचा हातातील तबकासाहीत बाप्पासोबत फोटो येईलही कदाचित, पण त्याची त्याच्या मनातल्या बाप्पासोबातची तल्लीनता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एरवी प्रत्येकाच रुटीन वेगळ, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, प्रोब्लेम्स वेगळे आणि त्या प्रसंगाना सामोरे जायचे मार्गही वेगळे, मग आज सगळ्यांचा एकत्र आरतीसाठी उभे असताना फोटो काढताना वाटलं की ती एकता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एखाद गाण अतिशय शांत स्वरापासून सुरू व्हाव आणि उत्तरोत्तर ती मैफील रंगत जाउन त्याचा शेवट एखाद्या उच्च स्वराशी व्हावा की बास हाच सूर शेवटी येउन भिडणार होता काळजाला अस वाटावं आणि त्यानंतरची ती प्रसन्न शांतता…तसच ह्या आरतीच…तेव्हा जाणवलं 'मंत्रपुष्पांजली' चे फोटो येतीलही कदाचित पण ती मनाच्या आतपर्यंत पोहोचलेली प्रसन्नता त्या फोटोत जाणवणार नाही…

एवढे सगळे विचार करून मी परत त्या आरतीत मिसळलो…एकरूप झालो…'त्याच्या' जयघोषात स्वत्व विसरून गेलो. कदाचित बाप्पापण त्याच्या भक्तांच्या सूरांत एवढा रममाण झाला होता की आशिर्वाद देताना त्याच्या उजव्या हाताची बोटे जरा थरथरून त्यातील दुर्वांची जुडी कधी खाली पडली हे त्याच त्यालाही कळल नाही…

…बस तेवढ फक्त त्यावेळी फोटोत 'टिपायच' माझ राहून गेल !


-- अमोल नेरलेकर

Monday, 14 September 2015

Blue OakLeaf Butterfly / शुष्कपर्ण

निसर्गाला प्रत्येक जीवाची काळजी आणि त्यामुळे 'स्वसंरक्षण'ही त्याने दिलेच प्रत्येकाला; फक्त ते आजमावण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मांजरी शेपटी फुगवून, नाग फणा काढून, प्राणी चित्कारून आणि पक्षी निरनिराळे आवाज काढून स्वत:च रक्षण करताना दिसतात, मग ह्याला फुलपाखरे तरी कशी अपवाद राहणार? काल ओवळेकर वाडी मध्ये फिरतना 'शुष्कपर्ण' फुलपाखराने लक्ष वेधून घेतले आणि मग त्याच्या अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. 

आकाशी निळ्या रंगाचे हे फुलपाखरू उडताना सहज लक्ष वेधून घेते. नर आणि मादी आकाराने सारखेच असून पंखविस्तार साधारणत: ८.५ से.मी ते १२ से.मी इतका असतो. वरील पंखांवरील निळ्या रंगाची छटा नरामाध्ये जास्त भडक असते. तसेच त्यावर मोरपंखी, निळा आणि फिकट हिरव्या रंगछटा दिसतात. ह्या फुलपाखरविषयी सगळ्यात अद्भूत गोष्ट म्हणजे त्याच्या पंखांची खालील बाजू! खालील बाजू फिकट चोकलेटी असून ती अगदी हुबेहूब एखाद्या वाळलेल्या पानासारखी दिसते आणि म्हणूनच त्याला मराठीत 'शुष्कपर्ण' असे संबोधले जाते. पानासारखी मधोमध ह्यालाही मुख, जाड देठेसारखा रंग असतो आणि त्यामुळे पंख मिटून बसले असताना आणि दुरून पाहिले की हे जणू वाळलेले पानच आहे असा भास होतो आणि हे भक्ष्य होण्यावाचून टळते. पंखांच्या खालील बाजूस छोटे छोटे पांढरे ठिपके असून महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दोन 'शुष्कपर्णांच्या' खालील पंखांची रंगसंगती (फिकट चोकलेटी रंगाचे प्रमाण, पांढर्या ठिपक्यांचे वितरण) सारखे नसते.




मादी कारवी, नारळाच्या झाडांवर अंडी घालते. ही अंडी एकेक विखुरलेली असून  रंगाने हिरवी आणि आकाराने गोल असतात. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला ५ दिवस लागतात. रंगाने चोकलेटी आणि आकाराने ०.२ से.मी इतकी असून त्यानंतर तिची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवरच होते. अळी ते सुरवन्ट हा प्रवास एकूण २४ ते ३० दिवसांचा असून त्यात ५ ते ६ टप्पे येतात. ६व्या टप्प्यानंतर त्याची लांबी ४.७ से.मी इतकी भरते. नंतर सुरवन्ट ते फुलपाखरू बनण्याचा काळ साधारणत: ९ ते ११ दिवसांचा असून ह्यासकट अंडी ते फुलपाखरू होण्याचा एकून काळ सुमारे ४० ते ४५ दिवस इतका भरतो. 



शुष्कपर्णाची उपजीविका प्रामुख्याने कारवीच्या झाडांवर आणि कुजलेल्या फळांवर होते. तसेच साधारण २३ से ते ३५ से तापमानात हे फुलपाखरू मुक्तसंचार करू शकते. शुष्कपर्णाचा वावर दक्षिण भारतात (मुंबई, नाशिक आणि त्याखालील दक्षिण प्रांत) येथे आढळून येतो आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये ह्याला Blue Oakleaf Butterfly बरोबरच South Indian Blue Oakleaf Butterfly ह्याही नावाने संबोधले जाते. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ ह्यांच्या अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. 

एकूणच, ह्या फुलपाखराला पाहिल्यावर निसर्गात किती विविधता आहे आणि प्रत्येकजण आपापले संरक्षण करायला कसा सामर्थ्यवान आहे ह्याची खात्री पटल्यावाचून रहावत नाही. 

फोटो :
१. अनंत नार्केवार
२. अमोल नेरलेकर

संदर्भ:
१. www.ncbi.nlm.nih.gov
२. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे 
३. www.google.com

-- अमोल नेरलेकर । १४.०९.२०१५  

Wednesday, 2 September 2015

स्वातंत्र्य

शनिवार, १५ ऑगस्ट. दुपारची साधारण १ वाजताची वेळ. दारावरची बेल वाजली.

सुट्टीचा दिवस असल्याने मी बर्यापैकी आळसावलेला होतो आणि त्यात आता सुस्त शरीराला १०-१२ पावलांची हालचाल करायला लागणार ह्या विचाराने चेहर्यावर आठ्या आल्याच. तसाच उठलो, दार उघडल. समोर साधारण ७० वर्षाचे आजोबा एक कुरिअर घेऊन उभे होते.

'अरुण नेरलेकर कोण इकडे? त्यांच कुरिअर आहे' अस म्हणत त्यांनी दाराच्या फटीतून ते कुरिअर आणि त्याची पावती देण्यासाठी सही करायचा असलेला कागद माझ्याकडे सरकवला. मी त्यावर सही करणार इतक्यात माझ्या मागून आवाज आला -

'या आजोबा, बसा. पाणी देऊ का? उन आहे ना बाहेर खूप. या, थोडावेळ बसा म्हणजे बर वाटेल…' बाबा त्या आजोबांशी बोलत होते.

'ते' आजोबा आत आले. बाबांनी त्यांना पाणी दिल. ते बसलेही २ मिनिट आणि नंतर बाबांना धन्यवाद देऊन निघून गेले. अवघ्या ३ ते ४ मिनिटांचा प्रसंग होता तो पण नक्कीच खूप काही विचार करायला लावणारा होता.

 नंतर जेवताना तो विषय निघाला तेव्हा बाबा मला म्हणाले -
'मगाशी आलेले आजोबा पाहिलेस? ७० वर्षांचे आहेत पण वेळ-काळ न पाहता, ऋतू कोणताही असो, त्यांना गेले अनेक महिने मी कुरिअर द्यायला येतात तेव्हा पाहतोय. त्यांच्याशी बोलतो. त्यांचही एक आयुष्य आहे. काही प्रसंग असतील, काही वेदना असतील. काही गोष्टी स्वत: आवडतात म्हणून ते करत असतील पण काही ठिकाणी त्यांचाच नाइलाज असेल म्हणूनही ते त्या करत असतील. दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते आणि प्रत्येक खरी गोष्ट दिसेलच अस नाही. पण आपल्यासमोर येणार्या प्रत्येक व्यक्तीची आपण विचारपूस करायला हवी. त्याला काय हवय-नकोय ते पहायला हव.

आमच्या तरुणपणाचा काळ खरच खूप सुंदर होता. मित्र असोत वा ओफिसमधले सहकारी आणि चाळीतले शेजारी असोत वा घरातले नातेवाइक, माणसाला माणसाविषयी आस्था होती, तळमळ होती आणि माणुसकी होती. त्यावेळी आत्ताइतकी संवादाची प्रगत साधने नसतीलही कदाचित पण माणसाला माणसाविषयी असणार्या भावना सखोल होत्या आणि त्यामुळे हृदयातल हास्य आणि चेहऱ्यावरील स्मित दोन्ही एकच होते. ते दाखवायला आम्हाला कोणत्या स्माईलीज आणि इमोजी लागल्या नाहीत.

तुमचा काळ वेगळा, गरजा वेगळ्या. पर्यायाने जगाशी संपर्कही वाढला तुमचा. पण न जाणे त्या वाढणार्या माणसांच्या संख्येसोबत तुमच्या मनातील राग, द्वेष, असूया, चीड, अहंकार, स्पर्धात्मक भावना ह्या सार्या गोष्टी पण वाढायला लागल्या आहेत आणि ह्याच गोष्टी तुमच्या मूळच्या मनाला आणि त्यातील माणुसकीला पारतंत्र्यात ठेवत आहेत, नेत आहेत. माणसालाच माणसापासून दूर नेत आहेत.

आज स्वतंत्र दिन. आजच्या दिवशीच देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण तुमची मन न जाणे कित्येक वर्षांपासून पारतंत्रात अडकलेली आहेत. त्यांना कधी  मिळणार स्वातंत्र्य? त्यांच्या हक्कासाठी कधी होणार लढाया, मोर्चे आणि सत्याग्रह? एकदा तुमच्या मनाला त्या पारतंत्र्यातून बाहेर काढून तर बघा म्हणजे सोनेरी सूर्यकिरणात फडकणार्या त्या शुभ्र, तेजस्वी ध्वजाची शान म्हणजे नक्की काय असते हे तुम्हाला वेगळ सांगायची आवश्यकता राहणार नाही…'

बाबांच हे बोलण ऐकल्यावर मनात एक वेगळ्याच विचारांची लाट आली जिचा प्रवाह ह्या पारतंत्रात अडकलेल्या मनाला मुक्त करू पाहत होता, त्याला स्वातंत्र्यसूर्य दाखवू पाहत होता…


-- अमोल नेरलेकर । ३१ ऑगस्ट २०१५