'म्यांsssव'…मागून हलकाच पण भेदरलेला आवाज आला. मी आणि माझा मित्र नेहमीप्रमाणे शनिवारच्या प्रसन्न सकाळी फोटोग्राफी करण्यासाठी टेकडीवर गेलो होतो. मानवाच्या सहजतेने आणि प्रेमाने जवळ जाणार्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांविषयी मला आस्था आहे आणि त्यामुळेच कदाचित ज्याप्रमाणे एकदा अस्पष्ट आवाज ऐकल्यावरही मांजराचे कान टवकारले जातात त्याप्रमाणे माझे कान त्या आवाजाच्या दिशेने ओढले गेले.
'म्यांsssव…म्यांsssव' अजून आवाज येतच होता पण पिल्लू नेमके कुठे आहे ते दिसेना. थोडे पुढे जाउन वळसा घेतला तर आमच्या वाटेत बरोबर मधे ते पांढरेशुभ्र पिल्लू बसले होते. आम्ही त्याच्या समोर जाउन बसलो खरे पण भीतीने घाबलेल्या त्याची आमच्या नजरेला नजर मिळवण्याची बहुतेक हिम्मत होत नव्हती. मला आठवतंय, लहानपणी शाळेत रिझल्ट लागला की घराच्यान्सामोर माझी अशीच गत व्हायची.
खर सांगायचं तर जगातले बहुतांश प्राणी हे तुम्हाला वासाने आणि तुम्ही त्याला कसा स्पर्श करता ह्यावरून तुम्हाला ओळखतात. मी त्या पिल्लाला जवळ घेतले; आधी त्याच्या गळ्याखाली आणि नंतर डोके, पाठ आणि संपूर्ण अंगावरून कुरवाळले. कदाचित त्याला माझा हा स्पर्श आवडला असावा आणि म्हणूनच परिणामी त्याच्या पोटातून भीतीपोटी येणारे कंप कमी झाले, स्व-संरक्षणासाठी विस्फ़ारलेली नखे जवळ आली, फुगवलेली शेपटी हळूहळू पूर्वपदावर आली आणि आपल्या पुढील दोन पायांनी माझ्या डाव्या अंगठ्याला मिठी मारून त्याने बोटांना चाटायला सुरुवात केली. पोपटी घारे डोळे, दूरवरचे आवाजही टिपता येता येतील असे मोठे कान, जन्मजातच भाळी असलेला 'कृष्ण-टिळा' आणि शुभ्रवर्ण ह्या साऱ्यांमुळे त्या तळहाताएवढ्या जीवाने माझ्या मनात मोठे घर निर्माण केले.
आजूबाजूला खूप चौकशी करूनही मला ह्या पिल्लाची माय किव्वा भावंडे सापडली नाहीत. त्याउलट, एकटे सोडले असताना तिकडील दोन मांजरे ह्याच्यावर धावून आली. ते पिल्लू परत मला येउन बिलगले. ह्यावेळी मात्र नैसर्गिक आव्हानांमुळे दाटलेली भीती त्याच्या डोळ्यांत, बराच वेळ पाणी न मिळाल्यामुळे लागलेली तहान त्याच्या कोरड्या जीभेतून, काही दिवसांपासून खायला न मिळाल्याने पोटात उगवलेली भूक आणि ह्यासार्यांमुळे आपल्या अवघ्या अस्तित्वावर पडलेले प्रश्नचिन्ह त्याच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होते; जाणवत होते! हे सारे बघून मी 'त्या' पिल्लाला घरी न्यायचे ठरवले आणि अशाप्रकारे 'जुई'ची आमच्या घरी एन्ट्री झाली.
'जुई' हे माझ खूप आवडत नाव आहे आणि सापडलेल हे पिल्लूदेखील पांढर शुभ्र त्यामुळे 'त्या' नावाला सार्थ ठरेल असच! जुईला घरी आणले तो शनिवार होता आणि त्यामुळे सलग दोन दिवस तिच्याकडे नीट लक्ष द्यायला मला वेळ मिळाला. त्या तळहाताइतक्या जीवाची नक्की कुठून आणि कशी काळजी घ्यायला सुरुवात हा प्रश्न होता. तिच्याकडे बघून तिला काही दिवसांपासून नीट खायला न मिळाल्याचे दिसत होते आणि म्हणून सुरुवातीचे दोन-तीन दिवस तिला चमच्याने दूध पाजावे लागले. हळूहळू ती स्वत:हून दूध प्यायला लागली. पुढील काही दिवस तिला घराचा, खाण्या-पिण्याच्या वेळेचा, उठण्या-झोपण्याच्या वेळेचा, ते मिळणार्या जागेचा आणि शी-सू करण्याच्या जागेचाही अंदाज येण्यात गेले आणि त्यानंतर जुई आमच्या घरात मुक्तपणे वावरू लागली.
सुरुवातीच्या काळात आईच दूध हा खरतर कुठल्याही पिल्लाचा आहार असतो; जुईला मात्र इथे नशिबाने साथ दिली नव्हती. पण तरीही नेरलेकरांकडच्या पोहे, उपमा, शिरा, इडली, मेदू-वडा, कोकम सरबत, पन्हे, पोळ्या, डोसेपासून दही, बासुंदी आणि श्रीखंडापर्यंत जुई बिनधास्त ताव मारत होती आणि तो तो पदार्थ पचेपर्यंत ढाराढूर झोपा काढत होती. मला नक्की आठवत नाही, पण एक-दोन वेळा मी तिला घोरताना पण ऐकले होते.
जुई घरी रुळत चालली होती. परिणामी, तिच्या खायच्या-प्यायच्या वेळा आणि झोपायच्या जागा आम्हाला पाठ होऊ लागल्या. मित्र, नातेवाइक आणि आप्त-इष्टान मध्ये 'जुई' आणि तिचे फोटो, ती काय करतेय हा उत्साही चर्चेचा आणि नित्यनियमाचा विषय होऊ लागला. घरी येणारे किवा फोन करणारे बहुतांशजण 'अमोल कसा आहेस रे?' किवा 'घरी काय म्हणतात सगळे?' ह्यापेक्षाही 'जुई काय करतेय?' असा प्रश्न विचारू लागले आणि जुई लोकप्रिय झाल्याची आम्हाला पावती मिळाली.
जगातल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्याच्या पिल्लाला जन्मजात मिळणार सौंदर्य आणि गोंडसपणा ह्या बाबतीत मला विधात्याचे खरोखर खूप कौतुक वाटते. ह्या पिल्लांचा गोंडसपणा पाहून प्रत्येकाने त्याच्यावर प्रेम कराव, त्याला जवळ घ्याव, त्याला गोंजाराव अशा भावना मनात येण अगदी साहजिक आणि नैसर्गिक आहे आणि त्यामुळे कुठलाही प्रसंग असो, जुईकडे पाहिलं की क्षणात खूप बर वाटायचं. एकदा असच, माझा आणि बाबांचा किरकोळ वाद झाला असताना कोपर्यातून जुईने डोक वर केलं आणि 'कित्ती आवाज करताय, शांत बसा बघू' अशा भावात आमच्याकडे पाहिलं आणि आमचा वाद क्षणांत मिटला.
मध्यंतरी जुईच्या आजारपणाने डोक वर काढलं आणि काही दिवस आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. अती गोड खाल्यामुळे तिला जंत झाले होते, परिणामी ती अशक्त झाली होती आणि रोज आमच्या कानी येणार 'म्यांsssव' बंद झाले होते. चांगल्या उपचारानंतर ती नीट बरी झाली आणि नंतर रोजच्या ठरलेल्या वेळात 'मला खायला द्या' अशा अर्थाचा तिचा येणारा तार-सप्तकातला आवाज आम्हाला त्याची प्रचीती द्यायला लागला.
जुई घरात छान रुळली होती आणि आमच्या घरचा आणि आयुष्याचा एक भाग बनली होती. रोज निघताना आणि बाहेरून आल्यावर 'जुई' कुठे आहे हा प्रश्न एकमेकांना विचारला जातो. वजन आणि आकाराने ती चांगलीच वाढली होती. बाकी आहार, झोप आणि फिरणं पण ठरल्याप्रमाणे चालू होत. आठवड्यातून एकदा गरम पाण्याने स्पंजिंग करून लाड होत होते. आता तिलापण आमचा दिनक्रम पाठ झाला होता त्यामुळे सकाळी उठेपर्यंत ती आम्हाला अज्जिबात काही बोलत नाही; सकाळचा नाश्ता झाला की पूर्ण अंग चाटून स्वत:ला साफ करून मस्त झोप काढते. दुपारी आमच्या स्वयंपाक घरात येणार्या उन्हाने अंग शेकून घेते. संध्याकाळी खेळ आणि मस्ती चालूच असते आणि मग रात्री आमच्यासोबत टीव्ही बघते आणि नंतर ठरलेल्या जागी ठरलेल्या शालीवर छान झोपते. तिला आता अमोल कधी जातो आणि कधी येतो हे पाठ झाले आहे; म्हणूनच त्या वेळेला ती दाराजवळ वाट बघत उभी राहते आणि आलो की स्वागत करते. बाबा कधी कुठल्या खोलीत बसतात, आराम करतात आणि वाचत बसतात हे तिला माहीत झाले आहे. सकाळी बाबा पूजा करतात तेव्हा त्यांच्या मागे बसून डोळे मिटून, कान ताठ करून ती सर्व स्तोत्रे आणि पोथ्या ऐकते. देवांची नावे माहिती नसूनही त्या देवांची ती निस्सीम भक्त झाली आहे. स्वयंपाक करायला आणि आम्ही घरी नसलो (बाहेरगावी गेलो असल्यास) की तिला मनापासून सांभाळणार्या सीमा काकूंनाही तिचा लळा लागला आहे आणि जुईलाही त्यांची सवय झाली आहे.
कुणी म्हणत जुईमध्ये तू खूप गुंतला आहेस, कुणी म्हणत सगळ वर्णन ऐकून ती तुझी मुलगी असल्यासारखी वाटते. पण खरच, एवढा काळ कधी निघून गेला ते कळलंच नाही. पुढील आठवड्यात जुईला घरी येउन चार महिने होतील. तळहाताएवढा जीव फूटभर लांबीचा कसा झाला ते कळलच नाही. तिचं आमच्यासोबत असण हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि म्हणूनच ती बाहेर गेली किव्वा खूप वेळ डोळ्यांसमोर दिसली नाही तर मनात धस्स होत. अजून कादाचित वर्षभराने ती एवढी मोठी झाली असेल की लाडाने 'चिंगी' म्हणण्याच पण तिच वय निघून गेल असेल. कदाचित तेव्हा तिला सगळे दात आले असतील आणि त्यामुळे कदाचित ती आत्ता एवढी हळूवार चावणार नाही, तेवढी मस्ती करणार नाही. तेव्हा तिचं बाहेर फिरणं वाढल असेल, तिचे मित्र-मैत्रिणी झाल्या असतील आणि तिला मी 'माझ्याजवळ बस ना थोडावेळ' अस म्हणू शकणार नाही. खरच, कधीकधी काळ पुढे सरकूच नये अस वाटत.
अजूनही रात्री झोपायची वेळ झाली की जुई माझ्याजवळ येते. पहिल्यादिवशी जसे कुरवाळले तसे माझ्याकडून गळ्याखाली, मग डोक्यावर आणि नंतर अंगावर कुरवाळून घेते. तिला अंगाई किवा मराठी भाषा कळत नाही पण रात्रीच्यावेळी आमच्या घरी लागणारी भूप, शंकर, कामोद, नंद, केदार आणि चंद्रकंस रागातली गाणी तिला आवडतात. अजूनही तिची झोपायची जागा आणि शाल तीच आहे. तिच्या त्या पोपटी घार्या डोळ्यांत अजूनही आपल्या आईविषयी आणि भावंडांविषयी असणारी आस्था दिसते. ते पाहून मी क्षणभर अस्वस्थ होतो खरा; पण मग तो तळहाताएवढा जीव माझ्या घरी सुखाने नांदत असल्याचे समाधान मला मिळते. ती माझे ते समाधानी डोळे वाचते आणि माझ्या मांडीवर डोक ठेवून खुशाल झोपी जाते. मी पुढील बराच वेळ तिला तसच थोपटत बसतो..रात्र गहिरी होत जाते…
-- अमोल नेरलेकर । ६ फेब्रुवारी २०१६