Tuesday, 1 October 2019

बारामोटेची विहीर

सह्याद्रीत फिरताना जाणवत की ह्याच्या पोटात अशा असंख्य वास्तू लपलेल्या आहेत आणि त्याची अजून म्हणावी तशी आणि म्हणावी तेवढी माहिती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही. हेच नेमक जाणवलं साताराजवळील लिंब गावातील बारामोटांची विहीर बघताना. सामान्य जमिनीच्या पातळीखाली एखादी एवढी असामान्य आणि विशाल ऐतिहासिक वास्तू असू शकते हे कळल्यावर आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.



सातारा शहरापासून मुंबई-पुण्याकडे यायला लागल्यावर साधारण १२ कि.मी वर आपल्याला लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर कि.मी. वर लिंब गाव लागते. ह्या गावाच्या दक्षिणेला कि.मी. अंतरावर बारामोटेची विहीर वसलेली आहे.
(लिंब फाट्याच्या आधी लागणाऱ्या नागेवाडी  गावातून पण येथे जाता येते).




या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीत श्रीमंत सौ. विरुबाई भोसले ह्यांनी केले. विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती असून ह्या विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावता येऊ शकायच्या आणि त्यामुळे ह्याचे नाव बारा मोटा असलेली विहीर म्हणजेच 'बारामोटेची विहीर' असे पडले. विहिरीतून उपसलेले पाणी मुख्य: आजूबाजूच्या आमराईसाठी वापरण्यात येत असे.



जमिनीपातळीखाली उभारलेल्या महालात ही विहीर आहे.खाली उतरायला चालू करताना समोरच एक शिलालेख दिसतो. काही पायर्या उतरून खाली आले की आपल्याला महालाचा मुख्य दरवाजा बघायला मिळतो. ह्या दरवाज्यावर चक्र लावलेली दिसतात. ह्या दरवाज्याच्या आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती नजरेस पडते. तिकडून पुढे आल्यावर आपण महालात प्रवेश करतो. महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बसवलेली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. सातारचे राजे श्रीमंत . प्रतापसिंह महाराज ह्यांची विहिरीच्या महालात खलबते चालत असा उल्लेख आहे.



बारामोटेची विहीर ही एक अप्रतिम कलाकृती आहे. महालाचे दगडी बांधकाम त्यावेळेच्या स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच लिंब सारख्या लहानश्या गावातही ही ऐतिहासिक विहीर आजही आपले अढळ स्थान टिकवून आहे.

 -- अमोल नेरलेकर


Friday, 6 September 2019

बाप्पा आणि मी...

परवा आला बाप्पा, त्याच्या मखरात जाऊन बसला,
हलकेच जरी हसला तरी अवघडलेला वाटला...
सभोवताली नसता कुणी हलकेच हात केला,
'सोफ्यावर बसू का रे?' हळूच कानात बोलला...
'बस ना बाप्पा त्यात विचारणे काय आहे,
काय हवय सांग तुला, सेवेस हजर आहे... '
'नको रे काही, बघ ही कंबर दुखते फार,
चेपून दे रे थोडी अन थोड्या गप्पा मार...'
मी म्हणालो 'काय झाले रे? कसला एवढा त्रास?'
'अरे गड्या, गर्दी किती ही, गुदमरला रे श्वास...
मिरवणूकीत खड्डे किती रे, किती रे ह्यांची घाई,
कुठे हरवली मंगलगाणी, कुठली ही 'शांताबाई'?
कसले हे कपडे रे त्यांचे, कसे कसे रे नाचले,
डोळ्यांनाही दशा बघवेना, मिटून घ्यावे वाटले...
ट्रॅफिकपोलिसची व्यथा बघताना खरेच आली कीव,
इथे आलो जरा बरे वाटले पण दमून गेला जीव...'
'अरे बाप्पा, असेच आहे हे, वर्षानुवर्षांची गाथा,
कोपऱ्यापासून दंडवत ह्या सार्या टेकवून रे माथा...
समस्यांची ह्या वाढत चालली लांबच लांब रांग,
काय करावे कळत नाही, उपाय जरा सांग..'
'अरे वेड्यांनो, मूर्तीत मला पूजता, ह्यातच चुकते सारे,
अणूरेणूतून ब्रह्माण्डापर्यंत मी विश्व व्यापले सारे...
'देव' म्हणजे मूर्ती नाही, एक भावना आहे,
विश्वातल्या साऱ्यांकडे जी प्रेमातून पाहे..
वाटसरूला आश्रय द्या अन भुकेल्याला घास,
मिळून सारे या तुम्ही त्यात समाधान मला खास...
प्रेमाच्या ओलाव्यात रे माणुसकीचे बीज रोव,
सांगा कधी रे कळणार तुम्हाला माणसांमधला देव?'

-- अमोल नेरलेकर, ६ सप्टेंबर २०१९

Wednesday, 19 September 2018

जरा रे..

आता पुन्हा नव्याने बोलल्या नजरा जरा रे,
आता कोठे अलगद फिरल्या नजरा जरा रे..

स्वत्वाला पकडून दोघे तो दाह सोसत होतो,
डोळ्यासी भिडता डोळे वळल्या नजरा जरा रे..

पुसता आसवे तुझीही ती रात्र जागली थोडी,
दाटून कंठ आला अन् स्मरल्या नजरा जरा रे..

हलकेच हाक येता शमला वणवा जरासा,
उमजले सारे तरीही उरल्या नजरा जरा रे..

पहाट झाली तेव्हा लागला डोळा जरासा,
तो गोड गारवा येता भुलल्या नजरा जरा रे..

हा रूसवा असे क्षणिक, चिरंतर नाही काही,
जाणीव सोबतीची द्याया पुरल्या नजरा जरा रे..


-- अमोल नेरलेकर | १९ सप्टेंबर २०१८

Sunday, 2 July 2017

'सुखाचा' गजरा

'काय काका, कसा दिला हा गजरा?' गजऱ्याचा भाव माहीत असूनही संवाद चालू करायचा म्हणून मी विचारले.

'१५ रुपये फूट आणि सुट्टा एक पण १५ रुपयाला' काका उत्तरले.

'काका, तुम्ही बनवता ते गजरे खरंच खूप सुंदर असतात. मोगऱ्याची फुले पण खूप चांगल्या प्रतीची असतात आणि सुगंध तर विचारायलाच नको! मी खरंतर इथून ३ किलोमीटर वर राहतो पण गजरा घ्यायला तुमच्याकडेच यावंसं वाटत. काका, तुम्ही बैठकीला जाता का? नाही, कपाळी टिळा बघून विचारावास वाटलं इतकच..' त्यांच्याइथे काही गर्दी नाही म्हणून बोलायला सुरुवात केली.

'हो तर. रोज न चुकता.' ७०-७५ च्या वयातही काकांच्या बोलण्यात ठामपणा होता. 'रोज सकाळी ५ ला उठतो. कल्याण मार्केटला जाऊन फुले घेऊन येतो. मग घरीच गजरे करतो. पूजाअर्चा - न्याहारी करून मग इथे येतो. दुपारी थोडा आराम मग संध्याकाळसाठी परत गजरे बनवतो. संध्याकाळी इथे आणि इथून थोडावेळ बैठक आणि मग घरी. नित्यक्रम कसा छान चाललाय बघा. आता आमच आराम करायचं वय झालाय बघा. ह्या व्यवसायातून दिवसाला ३००-३५० सुटतात. दोन वेळेची भाकरी छान मिळते आणि हे गजरे करताना राम-नाम पण घेणं होत. शेवटी तो सगळ्याचा कर्ता-करविता. तुमच्यासारखे लोक भेटतात, बर वाटत. माणसाला आणखीन काय हवं असत सांगा?'

एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुमची एवढ्या लगेच चांगली ओळख व्हावी आणि त्यानेही तेवढ्याच आपुलकीने तुमच्याशी संवाद साधावा ही खरंच दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्ट आहे. खरंच! एखादी व्यक्ती आयुष्याकडे किती आनंदाने आणि सकारात्मकतेने बघू शकते ह्याची जाणीव झाली. काकांशी बोलण्यात वेळ छान गेला आणि भरवस्तीतल्या किंवा मुख्य रस्त्यावरील वाहतूक, गडबड आणि गोंधळ ह्यांचा त्रास तीळभरपण जाणवला नाही. त्यांच्यातील प्रेम, देवावरील भक्ती आणि एकंदरीतच ठायी असलेली सकारात्मक वृत्ती ते गजऱ्यात गुंफत चाललेल्या प्रत्येक फुलागणिक गुंफली जात होती आणि त्याचे पडसाद त्या गजऱ्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते..जाणवत होते..

'काका, आणखीन एक फूट गजरा द्या' मी त्यांना बोललो. त्यांनी लगेच तो बांधूनही दिला. खरंतर हा गजरा मला कुणासाठीच नको होता - ना देवासाठी ना कुणा इतरांसाठी. पण तरीही एक जास्तीचा घेतला - माझ्याजवळ ठेवण्यासाठी. त्यातील मोगर्याला वेगळाच गंध होता...तो 'सुखाचा गजरा' होता... 


-- अमोल नेरलेकर । २ जुलै २०१७

Friday, 30 December 2016

कट्टा

आज ती म्हणाली 'चल कुठेतरी फिरायला जाऊयात की' आणि  बर्याच दिवसांनी आमच्या कट्ट्यावर गेलो; लग्नानंतर पहिल्यांदाच..!

ह्या काट्याचा नेमका पत्ता असा नाही, अक्षांश-रेखांश पण अचूक काढणे कठीण पण आमच्या नात जुळायच्या काळात आम्हाला एकमेकांची रेष अन रेष जाणवून देऊन आमच्या आयुष्यातला अविभाज्य अंश बनलेला हा कट्टा. अगदी सुरुवातीला 'कुठे भेटायचं' असा विचार करता दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून निवडलेला 'कट्टा' आणि आता आवर्जून जाऊन परत 'त्या' क्षणांना अनुभवून पाहण्यासाठी असलेला कट्टा - खरंतर ह्याच सर्व प्रवासाचा समक्ष साक्षीदार असलेला हा कट्टा...!

कट्टा तसा शांत ठिकाणी. फार तर फार अजून ५-७ लोक आजूबाजूला. सकाळी गेलं की सूर्याचं कोवळं ऊन अंगावर लेपत लेपत 'या बसा' म्हणायचा. तेच कधी सूर्यास्ताच्यावेळी गेलं की 'काय मग, आज इथून सूर्यास्त पाहायचाय वाटत' असं म्हणणारा आणि कधी रात्री गेलं की निघताना 'नीट जपून जा हो बाळांनो..रस्त्याला अंधार आहे खूप' असं म्हणून काळजी करणारा हा कट्टा. त्याला मुळात पाहुणचारच खूप आवडत असावा. कधी पक्ष्यांच्या गुंजनातून, कधी वार्याच्या झुळुकीतून तर कधी बासरीच्या सुरांतून त्याने पाहुणचार केल्यावर मन कस तृप्त व्हायचं!!

कट्ट्याने आमची आणि आमच्या नात्याची अनेक रूप पाहिली. आमची पहिली भेट, आमच्यातले कोवळे कोवळे संवाद, एकांतात अनुभवलेले स्पर्श, वाचलेल्या कविता, तिने गजरा माळल्यावर आलेली वाऱ्याची झुळूक, आमचं मौन आणि त्या मौनातूनही होणारा डोळ्यांचा संवाद, आमचा राग, आमची भांडण - ती करून उठून जाणं आणि ती सोडवायला परत तिथेच येणं आणि अशा सार्या गोष्टींना सर्वकाळ साक्षी असलेला हा कट्टा. 

आज बर्याच दिवसांनी पावलं तिथे वळली. गेल्या गेल्याच कट्ट्याने आमचं स्वागत केलं. खरंतर कट्टा तोच, आम्ही माणसंही तीच पण तरीही आजच तिथे जाणं खूप वेगळं वाटलं. आज कट्टा मला घरातल्या कर्त्या पुरुषासारखा वाटला - आपले बाबा किंवा आजोबा असावेत ना तसा! लग्नकार्य पार पडल्यावर दोघांकडल्या वडिलांच्या चेहर्यावर 'समाधान' यावं तस ह्याच्याही चेहर्यावर आलं आणि निघताना सहज मागे वळून 'त्याच्या' अबोल चेहर्याकडे पाहिलं तेव्हा जाणवलं की तो नजरेतून माझ्याशी बोलत होता - 'बाळांनो, सुखी रहा.  नीट जपून जा..रस्त्याला अंधार आहे खूप..'


-- अमोल नेरलेकर 
३० डिसेंबर २०१६ 

Thursday, 28 April 2016

सदा'तरुण'

'मी मिस्टर कुलकर्णी. ९०वे वर्ष चालू आहे. तुम्ही मुंबईचे म्हणालात ना. माझा मोठा मुलगा तिथे असतो - नालासोपाराला. तो पण आता ६४ वर्षांचा झाला. मी तिथे गेलो की आम्ही एकाच ज्येष्ठ नागरिक संघात जातो. मज्जा आहे की नाही, द्या टाळी!' अस म्हणत त्यांनी माझ्या हातावर टाळी दिली. मी मित्राच्या लग्नासाठी पुण्याला गेलो असताना वाटेत - 'अहो जरा मला तुमच्या गाडीवरून तिथे कोपर्यापर्यंत सोडता का?' अस प्रतिकात्मकरित्या डाव्या हाताचा अंगठा 'लिफ्ट'साठी  वर करणारे 'तरुण' आजोबा भेटले.

'तुमच नाव काय म्हणालात?'

'अमोल नेरलेकर. मी डोंबिवलीला असतो. आजच्या दिवस इथे आलोय.' मी त्यांना माझा थोडक्यात परिचय करून दिला आणि हातातल्या साध्या ४०० रुपयाच्या घड्याळाकडे पाहून मला किती उशीर होतोय हे उगाच दाखवून दिले.

'तुम्हाला उशीर होतोय का? नाहीतर तुम्हाला एक गम्मत सांगितली असती' त्यांनी मला दिलेला एवढा आदर पाहून माझे मलाच नकोसे झाले आणि मी घड्याळावरून माझ्या पठाणीची बाही सरकवली.

'नाही, बोला ना आजोबा. त्यात उशीर काय. एका लग्नाला निघालोय' मी अगदी औपचारिक प्रतिसाद दिला.

'आजोबा नाही रे. सदानंद कुलकर्णी. मित्र मला 'सद्या' म्हणतात. तुम्हीपण म्हणा. बघा आपण १० मिनिटांत केवढे चांगले मित्र झालो.' आजोबा मिश्किलपणे बोलत होते. 'तुम्हाला बटाटेवडा आवडतो का?'

'हो…'

'चला तिकडचा वडा खाऊया. छान गरमागरम असतो. मग तुम्ही लग्नाला जा आणि मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात जातो.' आजोबांची ह्या वयातही खाण्यावर असलेली भक्ती आणि आवड बघून आचंबित झालो.

'मी रेल्वेमध्ये होतो. ४० वर्षे नोकरी केली, आता निवृत्त होऊनही ३० वर्षे होत आली.' अस म्हणत त्यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला आणि टाळी दिली 'अस्सं…!' ह्या एवढ्या उतारवयातही असणारा त्यांचा उत्साह आणि उर्जा वाखाणण्यासारखी होती.

'आजोबा तुम्ही अज्जिबात वाटत नाही हो ९० वर्षांचे! मला तर तुम्ही ७०चे वाटलेलात.' अस बोलल्यावर त्यांना 'सद्या' म्हणून न बोलावल्याचा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. मला उगाच चुकल्यासारखे वाटले.

'अहो हिच तर खरी गम्मत आहे ना नेरलेकर! मस्त जगायचं, मजेत जगायचं, हसत रहायचं आणि मग अस फिट राहता येत. अजूनही मी सकाळी ५:३० ला उठतो. योगासने आणि प्राणायाम करतो, मग बागेतली फूल गोळा करतो. अंगणात चाफा,प्राजक्त, मोगरा आणि तगरीची झाडे आहेत. भरपूर फूल निघतात. आणि मग दोघांसाठी चहा करून घेतो. आमच्या हिला उशिरा उठायची सवय आहे. चहा नाश्ता झाला की पूजा करतो. पोट भरला की कस स्तोत्रेपण खणखणीत म्हणता येतात. देव जागा होतो मग आमचा. मग सायकलीने जाउन घराजवळची काम करतो. अजूनही ३५ वर्षांपूर्वी घेतलेली हार्मोनिअम रोज वाजवतो. दुपारी आराम आणि वाचन करतो आणि संध्याकाळी ५ ते ७ आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळात जातो. जाताना कधी कधी तुमच्यासारख्या उत्साही तरुणांशी भेट होते. गप्पा होतात. मस्त वाटत.'

मला काय बोलावे सुचेना. त्यांचा उत्साह आमच्यासारख्या तरूणांना लाजवेल आणि आम्हाला अनेक गोष्टी करण्याची प्रेरणा देणारा होता.

'सद्या…अरे चल…५ वाजले.' त्यांना कुणीतरी हाक मारली. कदाचित त्यांच्या संघातील त्यांचे मित्र असावेत.
'आलोच रे गण्या एवढा वडा संपवून आलोच.' त्यांनीही प्रतिसाद दिला.

'हा गणेश जोगळेकर. आमचा मित्र. चला निघतो नाहीतर उशीर होईल. परत भेटूच. आलात पुण्यात की घरी या मी त्या श्री हॉस्पिटल समोरच्या बिल्डींगमध्ये राहतो. तुम्हीपण निघा. मित्राच लग्न म्हणालात ना? मग लवकर जावा आणि मंडपाच्या आजुबाजूला लक्ष द्या. तुम्हाला पण भेटेल तिथे 'एखादी'…नाही का?' अस म्हणत त्यांनी सवयीप्रमाणे मला टाळी दिली.

आजोबा निघून गेले आणि मला उशीर होत आहे हे ही मी दोन क्षण विसरून गेलो. एखाद्याने शरीरासोबत मनानेही ह्या वयात किती तरूण असावे ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. अशा माणसांशी भेटून आपल्यालाच आणखीन प्रेरणा मिळत असते, हे नक्की!

आजोबांना खरी दाद द्यावीशी वाटली. मी ही थोड्या टाळ्या वाजवल्या. ह्यावेळी दोन्ही हात मात्र माझेच होते!


-- अमोल नेरलेकर । २८ एप्रिल २०१६ 

Tuesday, 1 March 2016

आज्जो...

'अग चल पटकन नाहीतर शाळेची बस निघून जाईल…' एक चिमुरडी खांद्यावरच्या दप्तराच ओझ सांभाळत आपल्या सोबत असणार्या मैत्रिणीला सांगत होती. सकाळची ७ ची वेळ असावी आणि मी सुट्टीवर असल्याने सहज सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो.

पूर्ण दिवसाभरापैकी सकाळची वेळ मला सगळ्यात जास्त आवडते. सगळीकडे कस प्रसन्न वातावरण असत. प्रत्येकजण आवरायच्या गडबडीत असला तरी रात्रभर झालेल्या आरामामुळे अधिक उत्साहित असतो. आमच्या घराच्या मागच्या बाजूला बंगल्यांची रांग आहे. सकाळी प्रत्येकाच अंगण झाडलेल असत, रांगोळी काढलेली असते आणि देवघरात झालेल्या पूजेमुळे अवघ वातावरण मंगलमय झालेलं असत. त्यामुळे सुट्टीवर असताना अगदी पहाटे फिरायला जाण्यापेक्षा साधारण ह्या वेळेला फिरायला जाणे मी जास्त पसंत करतो.

'अग्ग किssत्ती वेळ…चल…' त्या चिमुरडीच्या आवाजाने मी भानावर आलो. विद्यार्थी, कामाला जाणारे सर्व, भाजीवाले-फळवाले, छोटी-मोठी कामी करणारे कामगार व कर्मचारी पैकी प्रत्येकजण आपापल्या घाईत आणि धुंदीत होता आणि त्या सार्यांमध्ये अज्जिबात घाई नसलेले, निवांत आणि त्या घाईला बघणारे तीनच जण तेव्हा तिथे होते - मी, जुई आणि कोपर्यावर कट्ट्यावर बसलेला आजोबांचा ग्रुप.

तिची मैत्रीण खाली आली आणि दोघीन्नी बस थांब्याच्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. त्याना एरवीपेक्षा बहुतेक आज जास्त उशीर झाला होता आणि बस तेवढ्यातच येण्याची चिन्हे दिसत होती. वयाने साधारण ७ ते ८ वर्षांच्या, खांद्यावर आपल्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे दप्तर ओझे सांभाळणार्या आणि बस चुकू नये म्हणून अक्षरश: धावत जाणार्या त्यांच्याकडे बघून मला माझ्या मावशीचे वाक्य आठवले - 'आजकालची मुल ना बाई जन्मापासून नुसती धावत आहेत. जरा उसंत म्हणून नाही ह्यांना…'

समोरून बस येताना दिसली आणि दोघींनी ती पकडण्यासाठी पाळायला सुरुवात केली. काही कळायच्या आत त्यातल्या एकीचा पाय अडकला आणि ती पडली. गुडघ्याला चांगल लागल - थोड रक्त यायला लागल. क्षणात काय झालं ह्या भीतीमुळे आणि झालेल्या वेदनेमुळे ती चिमुरडी जीवाच्या आकांताने रडायला लागली.

समोर बसलेल्या आजोबा कट्ट्याने हे दृश्य पाहिलं आणि त्यातले दोन आजोबा मदतीसाठी पुढे सरसावले. एकांनी तिला जवळ घेतल, तिच्या जखमेवर हलकेच फुंकर मारली तर दुसर्यांनी जवळच असलेल्या दुकानातून कापूस, मलम आणि पट्टी आणली. एकांनी तिला आपल्याजवळच चॉकलेट देऊन तिच मन वळवायचा प्रयत्न केला तर दुसर्यांनी जखम पुसून त्यावर मलमपट्टी केली.

'अस पळत नाही जायचं बाळा, बघ अस लागत मग' आजोबा त्या चिमुरडीला सांगत होते.

'हो आज्जो पण बस निघून गेली की मग शाळेत कस जाणार. शाळा दूर आहे खूप आणि घरीपण कुणी नाही सोडायला. आई-बाबा दोघेही कामावर गेले' चिमुरडी आपली व्यथा सांगत होती.

'हो बाळा, पण मग अस पडून त्यांना काळजी कराला लावायची का? घरातल्या आजी-आज्जोला सांगायचं, ते येतील' आजोबा तिला समजावत होते. त्या एकमेकांना एकमेकांची नावे माहीत नव्हती, कुठे राहतात - काय करतात ते माहीत नव्हते पण त्या आजोबांची कळकळ, तळमळ आणि प्रेम त्या चिमुरडीला त्यांच्या थरथरणार्या हाताच्या स्पर्शातून जाणवत  होते हे मात्र नक्की.

'आज्जो, घरी बाकी कुणी नसत ना. आई-बाबा त्यांच आवरून जातात. माझ आवरण्यासाठी रोज एक मावशी येतात आणि आमच पटापट आवरून आम्हाला बसपर्यंत आणून सोडतात. आज त्याना घाई होती म्हणून त्या इथपर्यंत आल्या नाहीत. बघा ना, आज मला त्यांनी टिकली पण लावली नाही.' ती सांगत होती आणि तेवढ्यात त्यांची बस आली. हे सगळ ऐकताना त्या 'आज्जो'ना खूप वाईट वाटत होत.

'घरी आम्ही दोघी जुळ्या बहिणी, आई आणि बाबा असतो. पनवेलचे आजी-आज्जो कधीतरी येतात. आईला ते आवडत नाही अस ती बाबाला सांगत असते.' चिमुरडी बोलत होती. बस आल्याचे तिच्या लक्षातच नव्हते. त्या दोघी बहिणी आहेत हे ही मला तेव्हा समजले.

'आणि मग दुसरे?' आज्जोन्नी विचारल.

'ते आता खूप दूर गेले - देवाकडे. पण आज्जो तुम्ही या ना आमच्याकडे. आम्हाला खूप छान वाटेल. आम्ही खूप दिवसांत गोष्टी ऐकल्या नाहीत. याल ना तुम्ही? तुम्ही मोठे आज्जो आणि तुम्ही छोटे आज्जो' त्या दोन आजोबांकडे बघून ती बोलत होती.

आजोबांना दोन क्षण काय बोलाव सुचेना.

'येऊ ना बाळा, का नाही? पण रोज आम्हाला फिरायला जायचं असत ना, मग कस येणार?' आजोबा विषय टाळत असले तरी आतून खूप दुखावले गेले होते. 'आपण एक काम करू! तुम्ही त्या कोपर्यावर राहता ना? मग रोज ५ मिनिट लवकर आवरा. आम्ही तुम्हाला गेट पाशी घ्यायला येऊ आणि बसपाशी सोडू. तोवर आपली एक गोष्ट पण होईल. चालेल? '

'होsssss!' दोघी एका सुरात बोलल्या. त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 'Thank you आज्जो. ठरलं तर मग - रोज सकाळी एक गोष्ट सांगणार तुम्ही आम्हाला.'

'हो ठरल मग. पण आत्ता चला बघू. बस आली बघा. पटकन जा नाहीतर शाळेला उशीर होईल आणि बाई ओरडतील.' आजोबा म्हणाले. गोष्ट ऐकायला मिळणार ह्या आनंदाने ती झालेलं दुखण कधीच विसरली. दोन्ही आज्जोन्ना मिठी मारून त्या दोघी बस मध्ये चढल्या. दोघींनी त्यांना 'टाटा' केल. आजोबांनी पण त्याला प्रतिसाद दिला.

बसला खरतर उशीर झाला होता पण ड्रायव्हर काही बोलला नाही. कदाचित त्यालापण त्याच्या 'आज्जोंची' आठवण आली असावी. बस निघाली. आज्जोन्नी मफलर डोळ्याला लावला.


-- अमोल नेरलेकर । २ मार्च २०१६