"डॉक्टर, मग ‘नी रिप्लेसमेंट’ झाल्यावर बाबांना काय काळजी घ्यावी लागेल?" मी घाबरत घाबरत डॉक्टरांना पहिला प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी "तुझं लग्न झालं आहे का? मग जशी नवीन मुलगी घरी पहिल्यांदा आल्यावर तिला तिथे स्थिरसावर व्हायला वेळ लागतो, तसंच काहीस ह्या गुडघ्याचं होणार, पण कालांतराने एकदम सेट होईल" असं सहज उत्तर दिल आणि हा डॉक्टर हा फक्त डॉक्टर नसून रूगणांचा, त्यांच्या घरच्यांचा एक जवळचा मित्र आहे हे माझं ठाम मत झालं ते कायमच !
डॉक्टर सतीश पुराणिक, मुबंईतील अतिशय प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि त्यांच्याकडे आम्ही वडिलांची डाव्या गुडघ्याची 'नी रिप्लेसमेंट' करायचे ठरवले होते. डॉक्टर आमच्या बाबा काकांचे खूप जवळचे स्नेही! पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी झालेल्या संवादातून आणि ह्या सर्व शस्त्रक्रियेचीअगदी मनापासून त्यांनी दिलेल्या माहितीमुळे ही शस्त्रक्रिया एवढी भयावह नाही असा आम्हा सर्वांना धीर आला होता.
ठरल्याप्रमाणे शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी आम्ही रुग्णालयात दाखल झालो. रात्री ११ नंतर बाकी सर्व ठिकाणाच्या भेटी झाल्यावर इथे रुग्णांना भेटायला येणं, त्यानंतर रात्री ३ पर्यंत रुग्णालयातील बाकीची कामे करून सकाळी ८ च्या शस्त्रक्रियेच्या आधी आणखीन २ रुग्णालयाच्या भेटी करून वेळेवर हजर होणं हे सर्व ऐकल्यावर आपण नि:शब्द होतो आणि डॉक्टर मात्र रात्रभर ७-८ तास झोप झालेल्या आमच्यापेक्षाही जास्त फ्रेश आणि प्रसन्न दिसत असतात. एवढी ऊर्जा आणि प्रसन्नता त्यांच्यात कुठून येते हे आमच्यासारखाच अनेकांना नक्की पडलेल कोड असणार. त्यांची आपल्या रुग्णांविषयी असणारी आस्था, त्यांची सर्वेतोपर सोयींसाठी असणारी दक्षता आणि रुग्णाशी एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा मारून त्याचा आजार त्याच्या मनातून काढून टाकण्याची असणारी त्यांची कुशलता हे सर्व पाहिल्यावर आपल्या सभोवती ऊर्जेचा आणि सकारात्मक शक्तींचा एक स्त्रोतच फिरत आहे ह्याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. त्यांची कामावर असणारी प्रचंड निष्ठा, त्या विषयातले अद्वितीय ज्ञान आणि तितक्याच सोप्या भाषेत समोरच्याला कळेल अशा रूपात सांगण्याची तयारी आणि रूगणांची मानसिकता समजून घेऊन त्यांना आपलंस करणारी दिलदारता ह्या साऱ्यांमुळे डॉक्टर फक्त एक प्रसिद्ध डॉक्टर राहत नाहीत तर सर्वोत्तम डॉक्टर-मित्र होतात.
शस्त्रक्रिया उत्तमरीत्या पार पडली आणि त्यादरम्यान चालू असणाऱ्या गप्पांमुळे आणि मराठी भक्तीगीते-भावगीतांमुळे ती मुळात एक शस्त्रक्रिया आहे असे वाटलेच नाही. रुग्णाला कामीत कमी त्रास व्हावा आणि त्याच्या मनात त्या चाललेल्या शस्त्रक्रियेविषयी भय वाटू नये म्हणून तुम्ही योजलेला हा उपाय किती सुंदर आणि अनोखा आहे ! पुढील २-३ दिवसात बाबांच्या गुडघ्याची हालचाल पूर्ववत होऊ लागली आणि आम्ही घरी परतलो. आज शस्त्रक्रियेला १५ दिवस झाले आणि आता खरंच एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली आहे का असा प्रश्न पडावा एवढी प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे, होत आहे.
असं म्हणतात की डॉक्टर हा देव असतो आणि त्यामुळेच कदाचित आत्तापर्यंत अनेक देवळांतून देव फक्त बघितला पण आज खऱ्या अर्थाने देवाचे दर्शन झाले, भेटणे झाले. डॉक्टर तुम्ही फक्त शस्त्रक्रिया केली नाहीत तर अनेक रुग्णांना त्यांच्या पायावर परत एकदा 'उभं' केल आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धात 'ताठ मानेसोबत ताठ गुडघ्यानेही' जगणे किती सोपे आणि सुंदर आहे हे दाखवले आहे. आम्ही सर्व आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभावाने अत्यंत लहान आहोत परंतु आम्हालाही भविष्यात तुमच्याकडून उपचार घेण्याचे भाग्य लाभो अशी आम्हा सर्वांची इचछा आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुम्ही दिर्घायुषी होवो अशी त्या परमेश्वराकडे सदिच्छा व्यक्त करतो.
जीवेत् शरद: शतम् ! अनेक अनेक धन्यवाद !!
-- अमोल अरुण नेरलेकर
३० नोव्हेंबर २०१९