बायकोला पाडव्याला भेट म्हणून
तिला आवडेल अशी
उत्तमातील उत्तम साडी
खरेदी करून बाहेर
पडलो आणि त्या
दिवाळीच्या पूर्वसंध्येला शहराच्या अगदी
मोक्याच्या रस्त्यांमधून कसाबसा जागा
करत परतीची वाट
धरली. तेवढ्यात आठवल की उद्यासाठी पणती
घ्यायची राहिली आणि
जाता जाता घेऊ
अस ठरवलं. अनेक
दुकाने दिवाळीच्या अनेक
गोष्टी विकायला घेऊन
बसले होते, तेवढ्यात
नजर त्यातील एका
दुकानाबाहेर पणत्या आणि
सुगड घेऊन बसलेल्या
ताईंकडे गेली.
'काय ताई, कशा
दिल्या पणत्या ह्या?'
त्या सांगतील त्या
दराने पणत्या घ्यायच्या
अशा उद्देशाने त्यांना
मी विचारल. '६०
ला डझन आणि ३० ला
सहा' त्यांनी लागलीकच
सांगितलं. उघड्या जमीनवर
बसून आणि अगदी
मोजक्याच जागेत आपलं
पोट भरण्यासाठी अपार
कष्ट करणाऱ्या कोणत्याच
व्यक्तीशी दरावरून कधीच घासाघीस
करू नये हे माझं स्पष्ट
मत आहे.
'हं ताई, ह्या
सहा द्या आणि
ह्या रंगीत २ पणत्या, किती झाले?',
'पंचावन्न भाऊ, सुट्टे
द्या काय जरा!'
ताईंनी आपला हिशोब
सांगितला. मी ठरलं
त्याप्रमाणे देऊन मोकळंही
होणार तेवढ्यात त्या
म्हणाल्या 'आज संध्याकाळपासून
एवढीच विक्री झाली
भाऊ, आज तुम्ही
पणत्या घेतल्या म्हणून
आता माझ्या घरी
उद्या पणती लागेल
हो..'
त्यांनी सुट्टे का
मागितले ह्याची प्रचिती
मला त्या क्षणाला
आली आणि क्षणार्धात
त्या शुभ सणाच्या
पूर्वसंध्येला त्या भर
वस्तीतील गजबजलेल्या रस्त्यावरही मन
सुन्न झालं. एकीकडे
मी होतो जो एवढ्या हजारोंचीही
खरेदी करून असमाधानी
होतो तर दुसरीकडे
त्या ताई - ज्या
माझ्या किरकोळ खरेदीमध्येही
त्यांचा सण साजरा
करणार होत्या. मनाची
श्रीमंती पैश्यात मोजता येत
नाही, हेच खरं
!
आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या
जमान्यात आपण सारेच
पैसे वाचवायचा विचार
करतो हे अगदी सत्य आणि
बरोबरसुद्धा. पण आजही
आपण बर्याच लहान
लहान गोष्टींसाठी ऑनलाईन
शॉपिंगवरच अवलंबून राहतो हे
कितपत बरोबर? ह्या
पणत्यांसारखे अनेक असे
छोटे छोटे व्यवसाय
आहेत की ज्यांची
आणि ज्यांच्या घरच्यांची
पोट ही आपण स्वतः त्यांच्या
दुकानात जाऊन आणि
जरी चार पैश्यांनी
एखादी गोष्ट महाग
मिळाली तरी ती घेण्यावर अवलंबून आहेत.
आज दिवाळीसारखा सण
आहे पण एरवीही
त्या दुकानदारांच्या घरात
अनेक असे शुभ प्रसंग आहेत
की ज्यांचे खुशाली
ही आपण दिलखुलास
होऊन त्यांच्या दुकानांत
जाऊन शॉपिंग करण्यामध्ये
आहे. उद्या आपण
जो उद्योग-धंदा
करतो त्याची जागा
ऑनलाईन सॉफ्टवेअरने घेतली
तर आपल्या जगण्यातील
सुखाला किती मोठा
तडा जाऊ शकतो
ह्याची कल्पना न
केलेलीच बरी.
'हे सुगड पण
देऊ का? वीस रुपये फक्त
!' असा त्यांनी विचारलं
तेव्हा मी भानावर
आलो. एव्हाना त्या
नवीन खरेदीच नवचैतन्य
पार निघून गेलं
होत आणि आनंदाचा
क्षण साजरा करण्यासाठी
माणसाला करावी लागणारी धडपड पाहून पार
हतबल झालो होतो.
खरंतर आमच्या घरी
सुगड वापरत नाहीत,
पण माझ्या एक
सुगड घेण्याने जर
त्यांच्या दारी आणखी
एक पणती लागणार
असेल तर मला घरी सुगड
आणण मान्य आहे.
'चला ताई, येतो,
आणि तुमच्या पणत्यांची
आणखीन विक्री नक्की
होईल' अशी आशा त्यांना देऊन निघालो.
दोन पावले चालतोच
नाही तेवढ्यात त्यांचा
समाधानी आवाज आला
- 'हॅप्पी दिवाळी भाऊ!'.
मनाची थोर श्रीमंती
बाळगणार्या त्यांना काही प्रतिक्रिया
द्यायची माझी हिम्मत
झाली नाही, मी
हलकेच हसलो आणि
पुढे निघालो. 'पणती
घ्या हो पणती,
६० ला डझन..'
अस म्हणत त्या
ताई परत त्या
गर्दीत मिसळून गेल्या;
दीपावलीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मनात
आशेची एक पणती तेवली होती
हे मात्र नक्की
!
शुभ दीपावली !!
-- अमोल नेरलेकर, २७ ऑक्टोबर
२०१९