Friday, 6 September 2019

बाप्पा आणि मी...

परवा आला बाप्पा, त्याच्या मखरात जाऊन बसला,
हलकेच जरी हसला तरी अवघडलेला वाटला...
सभोवताली नसता कुणी हलकेच हात केला,
'सोफ्यावर बसू का रे?' हळूच कानात बोलला...
'बस ना बाप्पा त्यात विचारणे काय आहे,
काय हवय सांग तुला, सेवेस हजर आहे... '
'नको रे काही, बघ ही कंबर दुखते फार,
चेपून दे रे थोडी अन थोड्या गप्पा मार...'
मी म्हणालो 'काय झाले रे? कसला एवढा त्रास?'
'अरे गड्या, गर्दी किती ही, गुदमरला रे श्वास...
मिरवणूकीत खड्डे किती रे, किती रे ह्यांची घाई,
कुठे हरवली मंगलगाणी, कुठली ही 'शांताबाई'?
कसले हे कपडे रे त्यांचे, कसे कसे रे नाचले,
डोळ्यांनाही दशा बघवेना, मिटून घ्यावे वाटले...
ट्रॅफिकपोलिसची व्यथा बघताना खरेच आली कीव,
इथे आलो जरा बरे वाटले पण दमून गेला जीव...'
'अरे बाप्पा, असेच आहे हे, वर्षानुवर्षांची गाथा,
कोपऱ्यापासून दंडवत ह्या सार्या टेकवून रे माथा...
समस्यांची ह्या वाढत चालली लांबच लांब रांग,
काय करावे कळत नाही, उपाय जरा सांग..'
'अरे वेड्यांनो, मूर्तीत मला पूजता, ह्यातच चुकते सारे,
अणूरेणूतून ब्रह्माण्डापर्यंत मी विश्व व्यापले सारे...
'देव' म्हणजे मूर्ती नाही, एक भावना आहे,
विश्वातल्या साऱ्यांकडे जी प्रेमातून पाहे..
वाटसरूला आश्रय द्या अन भुकेल्याला घास,
मिळून सारे या तुम्ही त्यात समाधान मला खास...
प्रेमाच्या ओलाव्यात रे माणुसकीचे बीज रोव,
सांगा कधी रे कळणार तुम्हाला माणसांमधला देव?'

-- अमोल नेरलेकर, ६ सप्टेंबर २०१९