Sunday, 2 July 2017

'सुखाचा' गजरा

'काय काका, कसा दिला हा गजरा?' गजऱ्याचा भाव माहीत असूनही संवाद चालू करायचा म्हणून मी विचारले.

'१५ रुपये फूट आणि सुट्टा एक पण १५ रुपयाला' काका उत्तरले.

'काका, तुम्ही बनवता ते गजरे खरंच खूप सुंदर असतात. मोगऱ्याची फुले पण खूप चांगल्या प्रतीची असतात आणि सुगंध तर विचारायलाच नको! मी खरंतर इथून ३ किलोमीटर वर राहतो पण गजरा घ्यायला तुमच्याकडेच यावंसं वाटत. काका, तुम्ही बैठकीला जाता का? नाही, कपाळी टिळा बघून विचारावास वाटलं इतकच..' त्यांच्याइथे काही गर्दी नाही म्हणून बोलायला सुरुवात केली.

'हो तर. रोज न चुकता.' ७०-७५ च्या वयातही काकांच्या बोलण्यात ठामपणा होता. 'रोज सकाळी ५ ला उठतो. कल्याण मार्केटला जाऊन फुले घेऊन येतो. मग घरीच गजरे करतो. पूजाअर्चा - न्याहारी करून मग इथे येतो. दुपारी थोडा आराम मग संध्याकाळसाठी परत गजरे बनवतो. संध्याकाळी इथे आणि इथून थोडावेळ बैठक आणि मग घरी. नित्यक्रम कसा छान चाललाय बघा. आता आमच आराम करायचं वय झालाय बघा. ह्या व्यवसायातून दिवसाला ३००-३५० सुटतात. दोन वेळेची भाकरी छान मिळते आणि हे गजरे करताना राम-नाम पण घेणं होत. शेवटी तो सगळ्याचा कर्ता-करविता. तुमच्यासारखे लोक भेटतात, बर वाटत. माणसाला आणखीन काय हवं असत सांगा?'

एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुमची एवढ्या लगेच चांगली ओळख व्हावी आणि त्यानेही तेवढ्याच आपुलकीने तुमच्याशी संवाद साधावा ही खरंच दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्ट आहे. खरंच! एखादी व्यक्ती आयुष्याकडे किती आनंदाने आणि सकारात्मकतेने बघू शकते ह्याची जाणीव झाली. काकांशी बोलण्यात वेळ छान गेला आणि भरवस्तीतल्या किंवा मुख्य रस्त्यावरील वाहतूक, गडबड आणि गोंधळ ह्यांचा त्रास तीळभरपण जाणवला नाही. त्यांच्यातील प्रेम, देवावरील भक्ती आणि एकंदरीतच ठायी असलेली सकारात्मक वृत्ती ते गजऱ्यात गुंफत चाललेल्या प्रत्येक फुलागणिक गुंफली जात होती आणि त्याचे पडसाद त्या गजऱ्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते..जाणवत होते..

'काका, आणखीन एक फूट गजरा द्या' मी त्यांना बोललो. त्यांनी लगेच तो बांधूनही दिला. खरंतर हा गजरा मला कुणासाठीच नको होता - ना देवासाठी ना कुणा इतरांसाठी. पण तरीही एक जास्तीचा घेतला - माझ्याजवळ ठेवण्यासाठी. त्यातील मोगर्याला वेगळाच गंध होता...तो 'सुखाचा गजरा' होता... 


-- अमोल नेरलेकर । २ जुलै २०१७