आज ऑफीसमधे सकाळी ११च्या सुमारास जयवंत आणि पंकजसोबत चहा घेत बसलो होतो. नेहमीच्याच गप्पा चालू होत्या. तेवढ्यात समोरून कॅन्टीन बॉय - अजय आला. त्याचा सहकारी 'नरेंद्र' ह्याने नोकरी सोडल्याचे आम्हाला कळले होते आणि त्यात आज अजयने येउन सांगितले की तो त्याच्या गावी - विदर्भात परत जाणार आहे.
मी सहज विचारलं, 'काय रे अजय, नरेंद्र नोकरी का सोडतोय? आणि काय करणार गावी जाऊन?'
त्यावर अजय म्हणाला, 'सर, तो आता त्याच्या आईसोबत राहील गावाला. त्याचा बाप बेवडा आणि त्याच हे तिसर लग्न. नरेंद्रच्या आईकडे त्याच जराही लक्ष नाही. त्याने ह्याला सांगितलय, मुकाट इकडे ये आणि आईला घेऊन सांभाळ. म्हणून चाललय तो…'
दोन क्षण आपण काय उत्तराव हे मला सुचेना; मन खूप विषण्ण झाले. रोज येता जाता आम्ही त्याची दिलखुलास मस्करी करायचो त्या हसर्या आणि निरागस चेहेर्याच्या नरेंद्रच आयुष्य एवढ्या अजीर्ण दु:खांनी, यातनांनी आणि नाईलाजान्नी भरलेल असेल ह्याची कणभरसुद्धा कल्पना नव्हती.
'त्याचा बापूस विहिरी बांधायचं काम करतो, तो पण तेच करेल आता… ' अजय सांगत होता.
खरच, जीवन किती निष्ठूर आहे आणि नियती किती बेलगाम! ती काहींना गंभीर करून तीच ओझं खांद्यावर झेलायला लावेल तर काहीना अगदी सुखात लोळवेल…
ह्याला खरच आईला भेटायचं का? का त्याच्या नाईलाज आहे? का आपला बाप आपल्या आईला काही करेल का ह्याची त्याला भीती वाटतेय? का हेच कारण दाखवून तो नोकरीपासून दूर पळतोय? का नियती त्याला हे करायला भाग पाडतेय? हे तो स्वत:हून करतोय का कोणाच्यातरी सांगण्यावरून? त्याला पुढचे परिणाम दिसत आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात बाजार मांडला. क्षणभर कोणाशी बोलाव आणि काय बोलाव हेच सुचेनास झाल. त्याने डोळ्यांसमोर येउच नये असे वाटत होते; ते दु:खापोटी, करूणेपोटी, रागापोटी की आणखीन कशासाठी ते माहीत नाही…
मन कितीही चांगल असल तरी रोजच्या व्यावहारिक जगात जगायची बुद्धी त्याला मिळू दे अशी मनोमन प्राथर्ना केली. त्याला त्याच जगण भिजलेल्या कापसापरी ओझ न वाटता हवेत उडणार्या रेशीमधाग्यांपरी हलक आणि मुक्तछंदाच वाटू दे असे मनापासून वाटले आणि जाता जाता पाडगांवकरांच्या 'या जन्मावर, या जगण्यावर…शतदा प्रेम करावे…' ह्या ओळी ओठांवर आल्या.
देव करो आणि त्यालासुद्धा ह्या ओळी गुणगुणाव्याशा वाटोत. 'आज' नाही कदाचित, पण निदान 'उद्या'तरी…
-- अमोल नेरलेकर । १२.१२.२०१५