Sunday, 27 September 2015

बाप्पाची आरती...

सुरेश काकांकडला गणपती म्हणजे जणू आमच्या सोसायटीचा मुख्य गणपतीच! दरवर्षी ठरलेली ती ३ फूट उंचीची दगडूशेठ हलवाईची गणपतीची रेखीव, सुबक आणि प्रसन्न मूर्ती. आकाराने आणि दिसायला जरी सारखीच असली तरी बाजूच्या सजावटीमुळे दरवर्षीचा बाप्पा वेगळा - पण तरीही आम्हाला जवळचाच वाटतो.

लहानपणापासून, म्हणजे मी अगदी ६ वर्षाचा असल्यापासून आमच्या सोसायटीत तीन जणांकडे गणपती बसायचे आणि रोजची आरती म्हणजे जणू पर्वणीच! बोंगो, टाळ आणि प्रत्येकाच्या आतून येणार्या त्या आर्त स्वरांनी आरती काय सजायची तुम्हाला सांगतो…कालांतराने तीनाचे दोन गणपती झाले, आम्ही मोठे झालो, प्रत्येकाचे रुटीन बदलले, माणसाच्या आयुष्यातील दगदग वाढली आणि लहानपणापासून आम्हाला भेटणारी 'ती' आरती हळूहळू आमच्यापासून दूर जायला लागली…

आज कित्येक वर्षानी ती आरती पुन्हा नव्याने अनुभवायला मिळाली. ती गर्दी, तो बोंगोचा ठेका आणि त्या लांब लांब स्वरांत म्हणल्या गेलेल्या आरत्या यामुळे अगदी कस प्रसन्न वाटलं. म्हटलं, चला आपल्याकडे नवीन कॅमेरा आहे तेव्हा ह्या क्षणांना साठवून ठेवू आणि अस म्हणत आरतीचे अनेक फोटो काढले; बरेचसे मनासारखेही निघालेही - पण वाटलं फोटो हा फक्त एक नजारा आहे…हे फोटो काढताना त्या प्रत्येक फोटोमागचा तो नाद, ती तरलता, तो आवेश आणि ती प्रेरणा जर टिपता आली तर किती बर होईल नाही?

म्हणजे बघा ना, कॅमेरा एकाच समेवर होणार्या टाळ्यांचा आणि टाळांचा फोटो काढू शकेल - अगदी उत्तमरीत्या, पण त्या शेकडो माणसांमधून निर्माण होणार्या त्या टाळ्यांच्या आवाजाची एकजीवता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
गणपतीच्या आरतीपासून सुरू करत मग शंकराची, देवीची, विठ्ठलाची, ज्ञानेश्वराची, तुकारामांची, दत्ताची आणि सरतेशेवटी दशावताराची आरती होताना त्याचा हातातील तबकासाहीत बाप्पासोबत फोटो येईलही कदाचित, पण त्याची त्याच्या मनातल्या बाप्पासोबातची तल्लीनता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एरवी प्रत्येकाच रुटीन वेगळ, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, प्रोब्लेम्स वेगळे आणि त्या प्रसंगाना सामोरे जायचे मार्गही वेगळे, मग आज सगळ्यांचा एकत्र आरतीसाठी उभे असताना फोटो काढताना वाटलं की ती एकता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एखाद गाण अतिशय शांत स्वरापासून सुरू व्हाव आणि उत्तरोत्तर ती मैफील रंगत जाउन त्याचा शेवट एखाद्या उच्च स्वराशी व्हावा की बास हाच सूर शेवटी येउन भिडणार होता काळजाला अस वाटावं आणि त्यानंतरची ती प्रसन्न शांतता…तसच ह्या आरतीच…तेव्हा जाणवलं 'मंत्रपुष्पांजली' चे फोटो येतीलही कदाचित पण ती मनाच्या आतपर्यंत पोहोचलेली प्रसन्नता त्या फोटोत जाणवणार नाही…

एवढे सगळे विचार करून मी परत त्या आरतीत मिसळलो…एकरूप झालो…'त्याच्या' जयघोषात स्वत्व विसरून गेलो. कदाचित बाप्पापण त्याच्या भक्तांच्या सूरांत एवढा रममाण झाला होता की आशिर्वाद देताना त्याच्या उजव्या हाताची बोटे जरा थरथरून त्यातील दुर्वांची जुडी कधी खाली पडली हे त्याच त्यालाही कळल नाही…

…बस तेवढ फक्त त्यावेळी फोटोत 'टिपायच' माझ राहून गेल !


-- अमोल नेरलेकर

Monday, 14 September 2015

Blue OakLeaf Butterfly / शुष्कपर्ण

निसर्गाला प्रत्येक जीवाची काळजी आणि त्यामुळे 'स्वसंरक्षण'ही त्याने दिलेच प्रत्येकाला; फक्त ते आजमावण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मांजरी शेपटी फुगवून, नाग फणा काढून, प्राणी चित्कारून आणि पक्षी निरनिराळे आवाज काढून स्वत:च रक्षण करताना दिसतात, मग ह्याला फुलपाखरे तरी कशी अपवाद राहणार? काल ओवळेकर वाडी मध्ये फिरतना 'शुष्कपर्ण' फुलपाखराने लक्ष वेधून घेतले आणि मग त्याच्या अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. 

आकाशी निळ्या रंगाचे हे फुलपाखरू उडताना सहज लक्ष वेधून घेते. नर आणि मादी आकाराने सारखेच असून पंखविस्तार साधारणत: ८.५ से.मी ते १२ से.मी इतका असतो. वरील पंखांवरील निळ्या रंगाची छटा नरामाध्ये जास्त भडक असते. तसेच त्यावर मोरपंखी, निळा आणि फिकट हिरव्या रंगछटा दिसतात. ह्या फुलपाखरविषयी सगळ्यात अद्भूत गोष्ट म्हणजे त्याच्या पंखांची खालील बाजू! खालील बाजू फिकट चोकलेटी असून ती अगदी हुबेहूब एखाद्या वाळलेल्या पानासारखी दिसते आणि म्हणूनच त्याला मराठीत 'शुष्कपर्ण' असे संबोधले जाते. पानासारखी मधोमध ह्यालाही मुख, जाड देठेसारखा रंग असतो आणि त्यामुळे पंख मिटून बसले असताना आणि दुरून पाहिले की हे जणू वाळलेले पानच आहे असा भास होतो आणि हे भक्ष्य होण्यावाचून टळते. पंखांच्या खालील बाजूस छोटे छोटे पांढरे ठिपके असून महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दोन 'शुष्कपर्णांच्या' खालील पंखांची रंगसंगती (फिकट चोकलेटी रंगाचे प्रमाण, पांढर्या ठिपक्यांचे वितरण) सारखे नसते.




मादी कारवी, नारळाच्या झाडांवर अंडी घालते. ही अंडी एकेक विखुरलेली असून  रंगाने हिरवी आणि आकाराने गोल असतात. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला ५ दिवस लागतात. रंगाने चोकलेटी आणि आकाराने ०.२ से.मी इतकी असून त्यानंतर तिची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवरच होते. अळी ते सुरवन्ट हा प्रवास एकूण २४ ते ३० दिवसांचा असून त्यात ५ ते ६ टप्पे येतात. ६व्या टप्प्यानंतर त्याची लांबी ४.७ से.मी इतकी भरते. नंतर सुरवन्ट ते फुलपाखरू बनण्याचा काळ साधारणत: ९ ते ११ दिवसांचा असून ह्यासकट अंडी ते फुलपाखरू होण्याचा एकून काळ सुमारे ४० ते ४५ दिवस इतका भरतो. 



शुष्कपर्णाची उपजीविका प्रामुख्याने कारवीच्या झाडांवर आणि कुजलेल्या फळांवर होते. तसेच साधारण २३ से ते ३५ से तापमानात हे फुलपाखरू मुक्तसंचार करू शकते. शुष्कपर्णाचा वावर दक्षिण भारतात (मुंबई, नाशिक आणि त्याखालील दक्षिण प्रांत) येथे आढळून येतो आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये ह्याला Blue Oakleaf Butterfly बरोबरच South Indian Blue Oakleaf Butterfly ह्याही नावाने संबोधले जाते. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ ह्यांच्या अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. 

एकूणच, ह्या फुलपाखराला पाहिल्यावर निसर्गात किती विविधता आहे आणि प्रत्येकजण आपापले संरक्षण करायला कसा सामर्थ्यवान आहे ह्याची खात्री पटल्यावाचून रहावत नाही. 

फोटो :
१. अनंत नार्केवार
२. अमोल नेरलेकर

संदर्भ:
१. www.ncbi.nlm.nih.gov
२. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे 
३. www.google.com

-- अमोल नेरलेकर । १४.०९.२०१५  

Wednesday, 2 September 2015

स्वातंत्र्य

शनिवार, १५ ऑगस्ट. दुपारची साधारण १ वाजताची वेळ. दारावरची बेल वाजली.

सुट्टीचा दिवस असल्याने मी बर्यापैकी आळसावलेला होतो आणि त्यात आता सुस्त शरीराला १०-१२ पावलांची हालचाल करायला लागणार ह्या विचाराने चेहर्यावर आठ्या आल्याच. तसाच उठलो, दार उघडल. समोर साधारण ७० वर्षाचे आजोबा एक कुरिअर घेऊन उभे होते.

'अरुण नेरलेकर कोण इकडे? त्यांच कुरिअर आहे' अस म्हणत त्यांनी दाराच्या फटीतून ते कुरिअर आणि त्याची पावती देण्यासाठी सही करायचा असलेला कागद माझ्याकडे सरकवला. मी त्यावर सही करणार इतक्यात माझ्या मागून आवाज आला -

'या आजोबा, बसा. पाणी देऊ का? उन आहे ना बाहेर खूप. या, थोडावेळ बसा म्हणजे बर वाटेल…' बाबा त्या आजोबांशी बोलत होते.

'ते' आजोबा आत आले. बाबांनी त्यांना पाणी दिल. ते बसलेही २ मिनिट आणि नंतर बाबांना धन्यवाद देऊन निघून गेले. अवघ्या ३ ते ४ मिनिटांचा प्रसंग होता तो पण नक्कीच खूप काही विचार करायला लावणारा होता.

 नंतर जेवताना तो विषय निघाला तेव्हा बाबा मला म्हणाले -
'मगाशी आलेले आजोबा पाहिलेस? ७० वर्षांचे आहेत पण वेळ-काळ न पाहता, ऋतू कोणताही असो, त्यांना गेले अनेक महिने मी कुरिअर द्यायला येतात तेव्हा पाहतोय. त्यांच्याशी बोलतो. त्यांचही एक आयुष्य आहे. काही प्रसंग असतील, काही वेदना असतील. काही गोष्टी स्वत: आवडतात म्हणून ते करत असतील पण काही ठिकाणी त्यांचाच नाइलाज असेल म्हणूनही ते त्या करत असतील. दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते आणि प्रत्येक खरी गोष्ट दिसेलच अस नाही. पण आपल्यासमोर येणार्या प्रत्येक व्यक्तीची आपण विचारपूस करायला हवी. त्याला काय हवय-नकोय ते पहायला हव.

आमच्या तरुणपणाचा काळ खरच खूप सुंदर होता. मित्र असोत वा ओफिसमधले सहकारी आणि चाळीतले शेजारी असोत वा घरातले नातेवाइक, माणसाला माणसाविषयी आस्था होती, तळमळ होती आणि माणुसकी होती. त्यावेळी आत्ताइतकी संवादाची प्रगत साधने नसतीलही कदाचित पण माणसाला माणसाविषयी असणार्या भावना सखोल होत्या आणि त्यामुळे हृदयातल हास्य आणि चेहऱ्यावरील स्मित दोन्ही एकच होते. ते दाखवायला आम्हाला कोणत्या स्माईलीज आणि इमोजी लागल्या नाहीत.

तुमचा काळ वेगळा, गरजा वेगळ्या. पर्यायाने जगाशी संपर्कही वाढला तुमचा. पण न जाणे त्या वाढणार्या माणसांच्या संख्येसोबत तुमच्या मनातील राग, द्वेष, असूया, चीड, अहंकार, स्पर्धात्मक भावना ह्या सार्या गोष्टी पण वाढायला लागल्या आहेत आणि ह्याच गोष्टी तुमच्या मूळच्या मनाला आणि त्यातील माणुसकीला पारतंत्र्यात ठेवत आहेत, नेत आहेत. माणसालाच माणसापासून दूर नेत आहेत.

आज स्वतंत्र दिन. आजच्या दिवशीच देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण तुमची मन न जाणे कित्येक वर्षांपासून पारतंत्रात अडकलेली आहेत. त्यांना कधी  मिळणार स्वातंत्र्य? त्यांच्या हक्कासाठी कधी होणार लढाया, मोर्चे आणि सत्याग्रह? एकदा तुमच्या मनाला त्या पारतंत्र्यातून बाहेर काढून तर बघा म्हणजे सोनेरी सूर्यकिरणात फडकणार्या त्या शुभ्र, तेजस्वी ध्वजाची शान म्हणजे नक्की काय असते हे तुम्हाला वेगळ सांगायची आवश्यकता राहणार नाही…'

बाबांच हे बोलण ऐकल्यावर मनात एक वेगळ्याच विचारांची लाट आली जिचा प्रवाह ह्या पारतंत्रात अडकलेल्या मनाला मुक्त करू पाहत होता, त्याला स्वातंत्र्यसूर्य दाखवू पाहत होता…


-- अमोल नेरलेकर । ३१ ऑगस्ट २०१५